Skip to main content
x

देवधर, प्रसाद मनोहर

        कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील विजयदुर्ग ह्या दोन हजार वस्तीच्या गावामध्ये प्रसाद मनोहर देवधर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील स्थानिक शाळेत शिक्षक होते, परंतु त्यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली व आंबा फळबाग विकसित करण्याकडे पूर्ण लक्ष दिले. देवधर कुटुंबाकडे वंशपरंपरेने आंबाबाग होतीच. त्या बागेत १०० झाडे होती. देवधर यांनी फळबागेचे शास्त्रीय शिक्षण घ्यायचे ठरवले. वाणिज्य शाखेतील पदवी घेतल्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची कृषी पदविकाही प्राप्त केली. त्यांनी बागेचा विस्तार करण्यासाठी नवीन जमीन घेऊन लागवड केली व त्यामध्ये एक हजार आंबा वृक्षांची लागवड केली. एक एकरात साधारणपणे ५० आम्रवृक्ष ह्याप्रमाणे लागवड केली . पाच ते शंभर वर्षे वय असणारे वृक्ष देवधर यांच्या बागेत आहेत. आम्रवृक्षांना नेहमी जून-जुलैमध्ये खत द्यावे लागते. त्यासाठी त्यांचा कल प्रमुख खत म्हणून लिंबोणीची पेंड ह्यावर अधिक राहिला. साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबरपासून झाडाला मोहोर लागायला सुरुवात होते त्यामुळे डिसेंबरमध्ये औषधाची फवारणी करावी लागते. खते, औषधे, निगराणी यासाठी वृक्षामागे सरासरी रु. ५०/- खर्च येतो.

        विजयदुर्गचा आंबा देवगड आंबा म्हणून प्रसिद्ध आहे. बाजारात विजयदुर्गच्या आंब्यास विशेष पसंती आहे व त्याला इतरांपेक्षा जास्त किंमतही मिळते. देवधर ह्यांनी त्यांचा आंबा मुंबई येथील वाशी बाजारात विकण्यावर भर दिला. तसेच बेळगाव, सांगली या ठिकाणीही आंबा विक्रीस पाठवला . मुंबई बाजारपेठेएवढीच नव्या बाजारात किंमत मिळते. पाच-सहा डझनाच्या पेटीस हजार ते दीड हजार रुपये किंमत मिळते. त्यांनी प्रत्यक्ष ग्राहकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करून ग्राहकाची आवडनिवड समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मध्यस्थाला द्याव्या लागणाऱ्या दलालीची बचत होते असे त्यांच्या निदर्शनास आले. मुंबई येथील गोरेगाव उपनगरातदेखील त्यांनी आंबा विक्री केंद्र सुरू केले . देवगड आंबा त्याचा स्वाद,रंग व गोडवा यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी ‘म.य.देवधर’या ब्रँड नावाने आंबा बाजारात आणला .

        देवधर ह्यांचे मुख्यत्वे आंब्याचेच पीक असून ते हापूस आंब्याचीच लागवड . आंबा लागवडीसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जातात. त्यासाठी त्यांना एन.एच.एम. व एन.एच.बी. या निमशासकीय संस्थांकडून अर्थपुरवठा झाला व आसपास एक लाखापेक्षा जास्त आंबा वृक्ष लागवड झाली . सध्याच्या प्रचलित पद्धतीत दर एकरी ५० कलमे लावतात, पण नव्या पद्धतीत दर एकरी १६० कलमे लावली जातात (घनलागवड तंत्र). झाडांची वेळोवेळी छाटणी केली जाते व वृक्ष ५-६ फुटांपेक्षा अधिक वाढू देत नाहीत, त्यामुळे स्त्रियाही फळे तोडू शकतात.

        आंब्याच्या लागवडीसाठी कोय कलमाला त्यांची अधिक पसंती राहिली आहे. एक ते दीड फूट उंचीचे कलम लागवडीसाठी सुयोग्य समजले जाते. कातळ जमिनीत खड्डा करून त्यात मातीची भर घालून कलमे लावली जातात. बागेत सरासरी प्रत्येक झाडापासून तीन पेट्या  फळे मिळतात. प्रत्येक झाडासाठी ५०० रुपये खर्च येतो. त्याचप्रमाणे झाडाच्या मालकाला सात-आठशे रु. द्यावे लागतात. थोडक्यात झाडापासून मिळणाऱ्या आंब्यांच्या तीन पेट्यांपैकी दोन पेट्या खर्चापोटी जातात व एक पेटी मालकाला मिळते. प्रसाद आणि त्यांचे सहकारी यांनी कॅनिंग फॅक्टरी सुरू करण्याची योजना आखली आणि त्यासाठी चार कोटी रुपयांचे भांडवल उभे केले .

- डॉ. निळकंठ गंगाधर बापट

देवधर, प्रसाद मनोहर