Skip to main content
x

देवल, कृष्णाजी बल्लाळ

कृष्णाजी बल्लाळ देवल यांचा जन्म सांगलीजवळच्या हरिपूर येथे झाला. त्यांचे वडील बळवंत ऊर्फ बल्लाळ देवल हे सरकारी कारकून होते. रामचंद्र देवल (संगीत नाटकांत काम करणारे) व गोविंद देवल (नाट्याचार्य म्हणून प्रसिद्ध असलेले) ही कृष्णाजी देवल यांची दोन लहान भावंडे होत. माता-पित्यांचा १८६७ साली मृत्यू झाल्याने बेळगावी सरदार्स विद्यालयामधून नुकतेच मॅट्रिक झालेल्या कृष्णाजींवर संसाराची जबाबदारी पडली. कृष्णाजींनी सरकारी नोकरी पत्करली व बढती मिळवत ते मामलेदार पदापर्यंत पोहोेचले. १८९६ साली ते रत्नागिरीस उपजिल्हाधिकारी बनले. त्यांना ‘रावबहादूर’ हा किताबही इंग्रज सरकारने दिला. १९०४ साली ते या फिरतीच्या नोकरीतून निवृत्त झाले व सांगलीस स्वतःच्या वाड्यात स्थायिक झाले.

त्यांचे बाह्यांग प्रभावी व आकर्षक नसल्याने त्यांची बरीच कुचेष्टा झाली; मात्र ते स्वभावाने अत्यंत शांत, सात्त्विक, गंभीर होते. आपल्या दोन्ही भावांचे शिक्षण करणे, लग्न लावणे व संसार सांभाळणे अशा जबाबदार्‍या त्यांनी निगुतीने पार पाडल्या. त्यांनी १८६८ पासून मृत्यूपर्यंत संगीताचा व्यासंग केला. बेळगाव येथे त्यांनी सतारीचा रियाज केला. त्यांना चांगले स्वरज्ञान होते व संस्कृत भाषेचा अभ्यास असल्याने त्यांनी संगीतविषयक संस्कृत ग्रंथांचे अध्ययन केले. रत्नागिरी येथे घरातच त्यांनी तंबोरे, सतारी, इ. वाद्ये बनवण्याचा प्रयत्न केला.

त्यांनी स्वतः नारळाच्या करवंटीपासून बनवलेला एक छोटा तंबोरा त्यांची भाची, गायिका व नाटककार हिराबाई पेडणेकर यांना दिला. तो नंतर हिराबाईंनी आपली मैत्रीण, श्रेष्ठ गायिका अंजनीबाई मालपेकर यांना दिला होता असा उल्लेख मिळतो. एक संगीतरसिक व व्यक्ती म्हणूनही देवल हे उदार व कनवाळू होते. त्यांच्या घरी ते अनेक कलाकारांना आश्रय देत. उस्ताद रहिमत खाँ यांना सांगलीत ते स्वतःच्या घरीच आश्रय देत. वासुदेवबुवा जोशी यांचा पुत्र भैया हा अखेरच्या काळात काहीसा भ्रमिष्ट झाला असताना त्याला आश्रय देऊन त्याच्याकडील दुर्मिळ विद्येची तालीम त्यांनी बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांना मिळवून देण्याची सोय केली. कीर्तनकार रघुनाथ जोशींचा मुलगा विष्णू याची त्यांनी बडोद्यास स्वखर्चाने सोय करून त्याला  नासर खाँ पखवाजियाची तालीम मिळवून दिली. अन्य शास्त्रकलांतील अभ्यासकांनाही ते मदत करत असत.

‘जर्नल ऑफ द रॉयल सोसायटी ऑफ आटर्स’, लंडन या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या नियतकालिकाच्या २७ मार्च १८८५ च्या अंकात अलेक्झांडर जॉन एलिस याने लिहिलेला ‘ऑन द म्युझिकल स्केल्स ऑफ व्हेरियस नेशन्स’ हा लेख कृष्णाजी देवलांच्या वाचनात आला. त्यात भारतीय संगीतातील स्वरसप्तकावरची ‘स्वैर, नियमहीन’ अशी बेतुकी टीका वाचून ते अस्वस्थ झाले व त्यांनी या अनाठायी टीकेस उत्तम उत्तर लेखाद्वारेच देण्याचे ठरवले. मग १८८६ ते १९०८ अशी २२ वर्षे त्यांनी भारतीय स्वरश्रुती व्यवस्था यांच्या संशोधनात व्यतीत केली. त्यांनी भरत, शार्ङ्गदेव, सोमनाथ व अहोबल अशा प्राचीन, मध्ययुगीन शास्त्रकारांचे ग्रंथ अभ्यासले. अण्णा घारपुरे, मंगेशराव तेलंग, भवानराव पिंगळे यांसारख्या तत्कालीन अभ्यासकांशी त्यांनी विचारविनिमय केला. श्रुतिशास्त्रास भौतिकशास्त्राच्या प्रयोगांची जोड देण्याचाही प्रयत्न केला. त्यांचा १९०२ पासून अब्दुल करीम खाँ साहेबांशी परिचय झाला व ग्रंथिक श्रुतिशास्त्राचा प्रत्यक्ष सांगीतिक व्यवहार यांची जोड त्यांना घालता आली. प्राचीन २२ श्रुतींपेक्षा अधिक, २४ श्रुती सध्याच्या सांगीतिक व्यवहारात असल्याचा त्यांनी निष्कर्ष काढला.

आधी १९०८ साली एक पुस्तिका व नंतर १९१० साली ‘हिंदू म्युझिकल स्केल अ‍ॅण्ड ट्वेन्टिटू श्रुतीज्’ या ग्रंथात रावबहादूर देवलांनी आपले श्रुतिशास्त्र विषयक संशोधन प्रसिद्ध केले. त्यांनी १९१८ पर्यंत सप्रयोग व्याख्यानांचे दौरे काढून आपला श्रुतिसिद्धान्त महाराष्ट्रभर मांडला. सातारा येथील न्यायाधीश ई. क्लेमन्ट्स यांनी ‘इंट्रोडक्शन टू दी स्टडी ऑफ इंडियन म्युझिक’ या ग्रंथात देवलांच्या संशोधनाची प्रशंसा केली. क्लेमन्ट्स यांच्याशी देवलांचा परिचय हा परस्परांच्या कार्यास पोषक ठरला. क्लेमन्ट्सनी देवलांचे संशोधन लंडनपर्यंत पोहोचवले.

देवल व क्लेमन्ट्स या जोडीने १८६२ साली स्थापन झालेल्या ‘फिलहार्मोनिक सोसायटी’चे जून १९१२ साली ‘फिलहार्मोनिक सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया’ या नावाने पुनरुज्जीवन केले. क्लेमन्ट्स यांनी देवलमतानुसार स्वरजुळणी केलेले, सूक्ष्म स्वरांतरे वाजू शकतील असे तीन ऑर्गन ‘मूर अ‍ॅण्ड मूर’ या युरोपियन कंपनीकडून मागवले व या ऑर्गनवरील प्रात्यक्षिकासह देवल व क्लेमन्ट्स आपली श्रुतिविषयक व्याख्याने देऊ लागले. (या श्रुति-ऑर्गनमध्येच नंतर आचरेकरांनी केलेल्या श्रुतिमंजूषेचे मूळ आहे.)

त्यांनी ‘रागाज ऑफ हिंदुस्थान’ व ‘ट्यूनिंग ऑफ सितार’ ही पुस्तके पाश्चात्त्य स्टाफ स्वरलेखन पद्धतीनुसार प्रसिद्ध केली. कृष्णाजी देवलांनी ‘आर्य संगीतशास्त्राची उपपत्ती व भारतीय गायन पद्धतीची मूलतत्त्वे’, इ. तीन मराठी पुस्तकेही लिहिली होती. (देवल-क्लेमन्ट्स यांच्या या श्रुतिसिद्धान्ताच्या मांडणीमुळे या विषयावर बरीच चर्चा सुरू झाली व नंतर कृ.ग. मुळे, गं.भि. आचरेकर, ओंकारनाथ ठाकूर, इ. अनेकांनी श्रुतिसिद्धान्तात भर घातली.)

अब्दुल करीम खाँ यांचे १९१४ नंतर देवलांशी मतभेद होऊ लागले व भातखंड्यांनी देवलांचे सिद्धान्त अमान्य केले. क्लेमन्ट्स १९२८ साली निवृत्त होऊन इंग्लंडला परतले. देवलांच्या विरोधकांनी त्यांच्या मतांचा बराच अपप्रचार केला. अखेरीच्या काळात देवल काहीसे एकाकी पडले व सांगली येथे त्यांचा मृत्यू झाला. मात्र, आधुनिक काळात श्रुतिशास्त्रास भौतिकशास्त्रीय प्रयोगांची जोड देणारा भारतातील एक शास्त्रकार म्हणून रावबहादूर देवलांचे योगदान नक्कीच महत्त्वपूर्ण आहे.

        — चैतन्य कुंटे

देवल, कृष्णाजी बल्लाळ