देवल, मिलिंद कृष्णाजी
भारतीय गोवंशाला वैभव प्राप्त करून देण्यासाठी गोसाक्षरतेच्या माध्यमातून कार्यरत मिलिंद कृष्णाजी देवल हे बँक क्षेत्रात अधिकारी . लहानपणीच पशुधनाची गोडी लागल्यामुळे बालपण, शिक्षण, व्यवसाय या काळात देवल यांनी गोधन संगोपन, संवर्धन आणि विकास याबाबत गोसेवा सतत सुरू ठेवली. वाणिज्य शाखेचे पदवीधर असणाऱ्या देवल यांना घरी गोपालनाच्या प्रात्यक्षिकाचे सगळे धडे मिळाले. महाविद्यालयीन शिक्षणात राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत त्यांनी १९७७ ते १९८२ दरम्यान दत्तक ग्रामात पशुचिकित्सा शिबिरे, लसीकरण मोहीम आणि पशुसंगोपन मार्गदर्शनात हिरिरीने सहभाग नोंदवला.
पश्चिम महाराष्ट्रात जोमाने सुरू झालेली दूध महापूर योजना, संकरित गोपैदास आणि कृत्रिम रेतन पद्धती डोळसपणे पडताळण्याचा अनुभव त्यांना तरुण वयात मिळाला. पशुसंगोपन आणि पशुविज्ञानाचे कोणतेही शिक्षण नसताना वाचन, चिंतन, सूक्ष्म अभ्यास आणि प्रत्यक्ष अनुभवातून देवल यांनी कोकणात पशुवंश जोपासण्यासाठी सतत २० वर्षे गोविज्ञान चळवळ राबवली . ‘माझे गीर गाय’ हे पुस्तक प्रथम साहित्य या ठाण्याच्या ग्रामीण विकास संस्थेतर्फे छापले जाऊन ३००० पशुप्रेमींपर्यंत मोफत वितरित करण्यात आले . भारतीय वंशाच्या इतर ३० जातींबाबत त्यांनी विपुल माहिती संकलित केली असून नियमित प्रकाशनाचे कार्य सुरू ठेवले .
देवल यांचा २००९मध्ये कर्नाटकातील शिमोगा येथे प.पू. शंकराचार्यांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या गोसेवा कार्याची योग्य दखल घेण्यात आली. मुंबईच्या भारतीय समाज विकास अकादमीतर्फे २०१०चा राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप पुरस्कार आणि गुणिजन पुरस्कार त्यांना लाभला . गोवंशप्रेमी संमेलन २०११, देवराई संस्था आणि इतर सामाजिक प्रतिष्ठानांतर्फे त्यांना गौरवले गेले आहे. त्यांना राष्ट्रीय सेवा योजनेत ‘आदर्श विद्यार्थी’ म्हणून गौरवले. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे २०११मध्ये देशी गोवंश संमेलन आयोजित करण्यात देवल यांचा सहभाग होता. गोसंवर्धनासाठी मोठे प्रयत्न आवश्यक असल्याची जाणीव आणि तळमळ राज्यातील पशुप्रेमींमध्ये निर्माण करण्यासाठी देवल यांनी मोलाचे योगदान दिले.