Skip to main content
x

देवस्थळी, गोविंद विनायक

     गोविंद विनायक देवस्थळी यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील धामापूर या गावी झाला. त्यांचे शिक्षण मुंबईमध्ये झाले. मुंबईतील सेंट झेवियर्स आणि विल्सन महाविद्यालयातून त्यांनी बी.ए.पर्यंत शिक्षण घेतले आणि मुंबई विद्यापीठातूनच एम.ए. आणि पीएच.डी.ची पदवी प्राप्त केली. एम.ए.चे शिक्षण घेत असताना त्यांना मुंबई विद्यापीठाचे वेदान्त पारितोषिक मिळाले होते.

     काही काळ मुंबईतील शाळेत काम केल्यानंतर त्यांनी नाशिक येथील एच.पी.टी. महाविद्यालयात २७ वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर १९६४ ते १९६९ या काळात पुणे विद्यापीठातील संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रात प्राध्यापक म्हणून काम केले. १९६९ ते १९७३ या काळात यु.जी.सी.च्या सेवानिवृत्त शिक्षकांसाठी असलेल्या योजनेखाली देवस्थळी यांनी पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्य केले, त्याचप्रमाणे डेक्कन महाविद्यालयातील संस्कृत शब्दकोश प्रकल्पात संपादक म्हणून आणि त्यानंतर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातील पदव्युत्तर विभागात प्राध्यापक म्हणून शेवटपर्यंत संशोधनाचे कार्य केले.

     डॉ. देवस्थळी यांचे संशोधन कार्य विविध स्वरूपाचे आहे. त्यांपैकी Mimamia the Vakyasastra of Ancient India ; मुंबई १९६९ हा त्यांचा संशोधन प्रबंध आहे. तसेच, १९६५ मध्ये पुणे विद्यापीठातील भाऊ दाजी अष्टेकर व्याख्यानमालेतील ‘रिलिजन अ‍ॅण्ड मायथॉलॉजी ऑफ द ब्राह्मणाज’, पुणे, १९६५ हा ग्रंथही महत्त्वाचा आहे. तसेच, ‘अनुबंधाज ऑफ पाणिनी’; पुणे, १९६९ हा ग्रंथही प्रसिद्ध आहे. डॉ. गोविंद देवस्थळी यांचे संपादन क्षेत्रातील कार्य विशेष उल्लेख करण्यायोग्य आहे. यामध्ये ‘डिस्क्रिप्टिव्ह कॅटलॉग ऑफ संस्कृत अ‍ॅण्ड प्राकृत मॅन्युस्क्रिप्ट्स’ याचे त्यांनी मुंबईमध्ये १९४४ साली संपादन केले. Phitsutras of Shantav पुणे, १९६७;Sarasiddhant Kaumudi; पुणे, १९६८; Vedvikruti Laksana Sangrah(सहकार्याने); पुणे १९७८ यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. याशिवाय विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी उपयोगी पडतील अशा प्रकारच्या काही कार्याचा उल्लेख करणे योग्य ठरेल. यामध्ये १९३६ मध्ये मुंबईत ‘पॉकेट डिक्शनरी ऑफ संस्कृत-इंग्लिश’; मुंबई, १९३६; Introduction to Mudraraksasa; मुंबई, १९४८;Introduction to Mrcchakatika; मुंबई, १९५१; वेणीसंहाराची संपादित आवृत्ती, मुंबई १९५३ हे कार्य महत्त्वाचे आहे. याखेरीज ‘स्वरमंजिरी’; पुणे, १९६५ आणि ‘शृंगाररसमंडण; पुणे, १९७६ हे संपादित ग्रंथही महत्त्वाचे आहेत.  ‘Oriental Thought’ तसेच  ‘ Indian Antiquity’(Third Series) या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी काही वर्षे केले.

     डॉ. देवस्थळींच्या संकीर्ण लेखांमध्ये अनेक शोधनिबंध, तसेच अन्य संकीर्ण लेखनाचा उल्लेख करता येईल. संकीर्ण लेखनामध्ये भारतीय विद्याभवनातर्फे प्रसिद्ध झालेल्या ‘द हिस्टरी अ‍ॅण्ड कल्चर ऑफ द इंडियन पीपल’ या ग्रंथातील काही भाग, मराठी तत्त्वज्ञान कोशातील काही भाग आणि धर्मकोश यांतील काही भाग महत्त्वाचा आहे. डॉ. देवस्थळी अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या कार्यकारी मंडळात, तसेच भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या नियामक मंडळात आणि कार्यकारी मंडळात होते. अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेतील अभिजात संस्कृत विभागाचे १९५६ मध्ये आणि १९७६ मध्ये वैदिक विभागाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते.

     — गणेश थिटे

देवस्थळी, गोविंद विनायक