Skip to main content
x

दीक्षित, भालचंद्र बाबाजी

      भालचंद्र बाबाजी दीक्षित यांचा जन्म अमरावती येथे झाला. ते पुढे फिजिओलॉजिस्ट, फार्माकॉलॉजिस्ट, उत्तम शिक्षक आणि शिस्तप्रिय अनुशासक म्हणून नावाजले गेले. घरची वकिली करण्याची परंपरा सोडून वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी प्रवेश केल्यामुळेच स्वतंत्र भारतात वैद्यकीय शिक्षणाचा मजबूत पाया उभारला गेला. डॉ.दीक्षित यांनी १९२५ साली मुंबईस्थित ग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालयामधून एम.बी.बी.एस. पदवी मिळविली. त्यानंतरच्या चाळीस वर्षांत त्यांच्या आयुष्याचे ठळक दोन टप्पे दिसून येतात. पहिली वीस वर्षे एक उत्तम शास्त्रज्ञ, तर नंतरची वीस वर्षे एक उत्तम मानवतावादी, प्रेमळ, विद्यार्थिप्रिय शिक्षक आणि अनुशासक म्हणून ते नावाजले गेले.

    डॉ. दीक्षितांच्या संशोधनाची सुरुवात १९२६ साली कोलकाता येथील ‘स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन’ येथे झाली. तेथे त्यांनी प्रा. चोप्रा यांच्याबरोबर संशोधनात भाग घेऊन मलेरियाविरोधी ‘सुडोएफेडिन’ या औषधाचे हृदय आणि रक्ताभिसरण संस्थेवरील परिणामाचे मूलभूत तत्त्व शोधून काढले. ही औषधी भारतात मिळणाऱ्या एफेडा या वनस्पतीपासून मिळविली होती, हे या संशोधनाचे वैशिष्ट्य होय. तसेच, मॉर्फिनऐवजी नारकोटीन हेही तेवढेच उपयुक्त आणि निर्धोक आहे हे त्यांनी सप्रयोग सिद्ध केले. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर वरील सर्व संशोधन त्यांनी अवघ्या तीन वर्षांत पूर्ण तर केलेच, शिवाय १९२७ साली ‘डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला.

     १९३० साली त्यांची नेमणूक विशाखापट्टणम येथील वैद्यकीय महाविद्यालयात ‘फार्माकॉलॉजी’चे प्राध्यापक म्हणून झाली. तेथे त्यांनी चौलमुग्रा तेलातील कुष्ठरोगविरोधी घटक सर्वांत प्रथम शोधून काढले. तसेच, संशोधन करून ‘पर्टेन’ नावाचे औषध मज्जारज्जूंमध्ये भूल देण्यासाठी निर्धोक व परिणामकारक आहे हे सप्रयोग दाखवून दिले. परंतु १९३१ साली चेन्नई विभागाचे मूळ रहिवासी नसल्याच्या क्षुल्लक कारणामुळे त्यांना नोकरीस मुकावे लागले. १९३१ साली ‘रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स’ या संस्थेचे सभासदत्व मिळवण्यासाठी ते एडिंबरोला गेले. तेथे ते प्रा. क्लार्क यांच्याकडे फार्माकॉलॉजी विभागात रुजू झाले. बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व यांच्या बळावर त्यांची नेमणूक शरीरविज्ञानशास्त्र विभागात सहाय्यक पदावर झाली. सततच्या अभ्यासू वृत्तीमुळे डॉ. दीक्षितांनी १९३३ साली ‘एम.आर.सी.पी.’ व नंतर ‘पीएच.डी.’ संपादन केली.

     एडिंबरोला डॉ.दीक्षितांनी ‘असेटायिल कोलीन’ या मज्जातंतूवरील संदेशवाहकावर जे संशोधन केले, त्याचे महत्त्व आजतागायत अबाधित आहे. त्यामुळे ते एक ‘अभिजात संशोधन’ गणले जाते. आपले संशोधन सतत चालू ठेवून त्यांनी हृदयाची अनियमितता व हायपोथॅलॅमस ग्रंथीचा परस्पर संबंध अभ्यासला. कॅफीनचे आणि बारबिटोनचे हृदयाच्या अनियमिततेवरील परिणाम सिद्ध केले.

     डॉ. दीक्षित १९३४ साली भारतात परतले. येथे आल्यावर त्यांची नेमणूक मुंबई येथील ‘हाफकिन इन्स्टिट्यूट’मध्ये झाली. तेथे त्यांनी आपले अ‍ॅसेटायिल कोलीनवरचे संशोधन चालू ठेवले, तसेच मलेरिया व प्लेग या रोगांवरील औषधांचे संशोधन केले. हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी सर्पविषाचा अभ्यास करण्यासाठी एका सर्पालयाची स्थापना केली.

     १९४६ साली तरुणवयात त्यांची नेमणूक पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि शरीररसायनशास्त्राच्या प्राध्यापकपदी झाली. तेथे त्यांच्यापुढे वैद्यकीय पदवीसाठी अभ्यासक्रम, आराखडा तयार करण्याचे आव्हान होते. १९५१ साली त्यांच्यावर राज्यातील वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवेची जबाबदारी टाकण्यात आली. त्यांची मुंबई राज्याचे ‘सर्जन जनरल’ म्हणून नेमणूक झाली.

     १९५६ साली भारत सरकारने अत्युत्तम वैद्यकीय सेवा, उत्तम वैद्यकीय शिक्षक आणि संशोधक देशात निर्माण करण्यासाठी दिल्ली येथे एक संस्था स्थापन करण्याचे ठरविले. त्या संस्थेच्या पहिल्याच संचालकपदासाठी डॉ. दीक्षितांना आमंत्रित करण्यात आले, ती संस्था म्हणजे ‘ऑल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ (ए.आय.आय.एम.एस.) होय.

     डॉ. दीक्षितांपुढे देशाची गरज ओळखून अत्याधुनिक वैद्यकीय शिक्षण व सेवा देण्याचे उद्दिष्ट होते. त्यासाठी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले. त्याचा डॉ. दीक्षितांनी योग्य उपयोग करून ‘ए.आय.आय.एम.एस.’ला अत्युच्च दर्जा प्राप्त करून दिला. डॉ. दीक्षितांच्या अथक प्रयत्नांनी आणि यशस्वी पुढाकारामुळे जगाच्या विविध भागांत कार्यरत असणारे वैद्यकीय संशोधक या नावीन्यपूर्ण संस्थेसाठी एकत्र आले आणि ए.आय.आय.एम.एस. (एम्स) ही संस्था अत्युत्तम बनविण्याच्या कामी रुजू झाले.

     डॉ. दीक्षितांनी प्रशासक म्हणून एक उत्तम व स्वच्छ प्रतिमा निर्माण केली. त्यांनी कोणत्याही अतिरिक्त बेकायदेशीर व्यवहाराला मज्जाव केला. कोणत्याही समस्येच्या मुळाशी जाऊन योग्य आणि समाधानकारक मार्ग काढताना ते कोणाचाही मुलाहिजा बाळगत नसत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या कार्यपद्धतीत ते अत्यंत परखडपणे आणि थोडक्यात शेरे अथवा सूचना फाइलीवर देत असत. ते एखाद्या केसच्या, घटनेच्या संदर्भात जे काय सत्य असेल, ते त्याच्या तोंडावर सांगत आणि तोच शेरा फाईलवर लिहीत. एखाद्याने चूक केल्यास ते रागावून ओरडत; पण क्षणार्धात त्यांचा राग निवळत असे. प्रत्येक घटना, प्रत्येक फाईल ते स्वत:च्या पद्धतीने नव्याने, निरपेक्षपणे बघत. त्यावर मागील घटनांचा परिणाम होऊ देत नसत. त्यामुळे ते न्यायी प्रशासक म्हणून गणले जात. त्यांचे निर्णय व्यक्तिनिष्ठ नसून तत्त्वनिष्ठ असत; त्याचमुळे एखाद्याचे मागणे त्यांनी अमान्य केले, तरी त्याच्या मताचा आदर आणि मान ते ठेवत असत.

     विषयाचे सखोल ज्ञान, प्रायोगिक कौशल्य, शिकवण्याची असामान्य हातोटी, खेळाविषयी आत्यंतिक प्रेम त्यामुळे ते युवाविद्यार्थ्यांसह सर्वत्र लोकप्रिय होते. ते विद्यापीठीय स्तरावरचे हॉकी, टेनिस आणि बॅडमिंटन खेळाडू होते. त्यांना परदेशातून निरनिराळी आमंत्रणे येऊनही ती नाकारून, ते आपल्या देशाला कार्यभूमी मानून, शेवटपर्यंत देशसेवा करत राहिले.

मृणालिनी साठे

दीक्षित, भालचंद्र बाबाजी