Skip to main content
x

डिस्कळकर, दत्तात्रेय बाळकृष्ण

     दत्तात्रेय बाळकृष्ण डिस्कळकर यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण सातारा येथेच झाले. नंतर त्यांनी १९१६ साली इंदूर येथील होळकर महाविद्यालयामधून बी.ए. ही पदवी प्राप्त केली. १९१९ साली त्यांनी अलाहाबाद विद्यापीठांतर्गत बनारस येथील क्वीन्स कॉलेजमधून एम.ए. ही पदवी प्राप्त केली. या पदवीसाठी त्यांनी संस्कृत, पुराभिलेख विद्या, पुरालिपीशास्त्र हे विषय प्राधान्याने निवडले होते. यासाठी त्यांना डॉ. राधाकुमुद मुकर्जी यांचे मार्गदर्शन लाभले होते. एम.ए. पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी राजकोट येथील वॅटसन म्युझियम येथे क्युरेटर (संग्रहालय व्यवस्थापक) म्हणून नोकरीस सुरुवात केली.

     संस्कृत, इतिहास, संस्कृती या विषयांमध्ये त्यांना विशेष रुची आणि प्रावीण्य असल्यामुळे त्यांनी तेथील ८०० अभिलेखांचा अभ्यास केला. तसेच सौराष्ट्रात अन्यत्र विखुरलेल्या अभिलेखांचा अभ्यास केला. त्या अभ्यासामुळे त्यांनी काठेवाडच्या पुराभिलेखांवर अनेक शोधनिबंध लिहिले. पुढे १९४१ साली त्यांनी या सर्व लेखांचे ‘इन्स्क्रिप्शन्स ऑफ काठेवाड’ या नावाने एक पुस्तक प्रसिद्ध केले. कर्नाटक पब्लिशिंग हाऊस त्याचे प्रकाशक होते.

     सौराष्ट्रच्या आणि काठेवाडच्या मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासासाठी हे एक प्रमाणित आणि मूलभूत असे संशोधन मानले जाते. तसेच ‘सिलेक्शन्स फ्रॉम संस्कृत इन्स्क्रिप्शन्स’ हे भारतातील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमास उपयुक्त असे आणखी एक पुस्तक १९२५-२६ मध्ये लिहिले. हे पुस्तक त्यांनी दोन भागांमध्ये प्रसिद्ध केले. याही पुस्तकाची विद्वानांनी प्रशंसा केली. ‘पुराभिलेख विद्या’ या विषयासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून हे पुस्तक अजूनही अभ्यासले जाते.

     यानंतर प्रा. डिस्कळकर यांनी राजकोट सोडले आणि ते मथुरेला गेले. त्यानंतर सातारा या आपल्या मूळ गावी परत आले. सातारा ऐतिहासिक संग्रहालयात क्युरेटर म्हणून ते नोकरी करू लागले. त्यानंतर ते पुन्हा इंदूर येथील ‘नररत्न संग्रहालय’ या ठिकाणी नोकरीस रुजू झाले. नंतर ग्वाल्हेर येथील ‘ग्वाल्हेर म्युझियम’मध्ये नोकरी करू लागले.

     १९४९ साली ते असिस्टंट डायरेक्टर ऑफ आर्किऑलॉजी (मध्य प्रदेश) म्हणून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते पुणे येथे राहू लागले. पुणे येथील विद्यापीठात मानद प्राध्यापक म्हणून काम पाहू लागले. नागपूर विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ या विद्यापीठांमध्ये ‘प्राचीन भारतीय संस्कृती’ या विषयाचे बी.ए.साठी, एम.ए.साठी परीक्षक म्हणून ते काम पाहत असत. काही वर्षे त्यांनी भांडारकर ओरिएन्टल रिसर्च इन्स्टिट्यूट येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्राध्यापक म्हणून काम केले. भांडारकर ओरिएन्टल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या महाभारत प्रकल्पासाठीसुद्धा त्यांनी काम केले. पुण्यातीलच भारत इतिहास संशोधन मंडळ या संस्थेशीसुद्धा ते निगडित होते.

     त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात ते अनेक नियतकालिकांमध्ये संशोधनपर लिखाण करीत असत, तसेच नियतकालिकांचे संपादन करीत असत. उदा. ‘जर्नल ऑफ इंडियन हिस्ट्री’ (त्रिवेंद्रम), ‘एपिग्रफिका इंडिका’, ‘जर्नल ऑफ रॉयल एशियाटिक सोसायटी’, मुुंबई, ‘जर्नल ऑफ ओरिएन्टल इन्स्टिट्यूट’ (बडोदा) इत्यादी.

     त्यांनी अनेक शोधनिबंध वाचले आणि प्रसिद्ध केले. ओरिएन्टल कॉन्फरन्स, हिस्ट्री कॉन्फरन्स, सायन्स काँग्रेस या संस्थांमध्ये कॉन्फरन्ससाठी त्यांना आमंत्रित केले जात असे आणि ते त्यात सहभागी होत असत. शोधनिबंध वाचत असत, बीजभाषण देत असत, इंग्रजी, मराठी, गुजराती व हिंदी भाषांमध्ये त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले होते. शोधनिबंधांमध्ये त्यांनी अनेक विषय हाताळलेले दिसतात. उदा. ‘गुजरात आणि गुजरातचे शेजारी’, ‘अहमदाबादची उत्पत्ती’, ‘लोदाईची उत्पत्ती’, ‘कळवन प्लेट्स’ ‘मुरादशहाचे नाणे’, ‘गुप्तवंशाची सोन्याची नाणी’ (होळकर स्टेट, बममाळा), ‘वल्लभी येथील बुद्धिस्ट मोनॅस्ट्री’, ‘लखनौ येथील वेधशाळेची स्थापना’, ‘परमार राजांचा कालक्रम’, ‘अहिल्याबाई होळकर’, ‘साऊथ इंडियन इन्स्क्रिप्शन्स’, ‘पार्सीस इन् इंडिया’, ‘गुजरातना धार्मिक इतिहासनी रूपरेषा’, ‘गुजरातना उत्कीर्ण लेखोनु पर्यालोचन’, ‘सोमेश्वर देव और कीर्तीकौमुदी के संबंध में स्फुट टिप्पणियाँ’ इत्यादी अनेक विषयांवर त्यांनी भरपूर लेखन केले. इंग्रजीत ११८, मराठीत ३८, गुजरातीत २०, हिंदीत ३ इतके शोधनिबंध त्यांनी लिहिले आणि प्रकाशित केले. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकात ‘मराठा हिस्ट्री’ विषयांवर त्यांचे लेख प्रसिद्ध झाले होते.

     त्यांना अनेक शैक्षणिक पुरस्कारही मिळाले होते. सुरुवातीच्या काळात मुंबई विद्यापीठाची संशोधन वृत्ती त्यांना मिळाली. इंडियन एपिग्रफी या विषयात त्यांनी जे काम केले, ते या संशोधनवृत्ती मार्फतच. १९५२-५३ मध्ये मुंबई विद्यापीठाने त्यांना पं. भगवानलाल इंद्रजी व्याख्यानमालेसाठी निमंत्रित केले होते. त्यानंतर त्यांची ही व्याख्याने पुस्तकरूपात प्रसिद्ध झाली. कन्नड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे त्यांनी ‘बुद्धिस्ट अँड जैन एपिग्राफी’ या विषयावर महत्त्वाची व्याख्याने दिली. त्यांची विद्वत्ता जाणून पुणे विद्यापीठाने त्यांना संशोधन वृत्ती बहाल केली. या संशोधनवृत्ती अंतर्गत त्यांनी ‘संस्कृत अँड प्राकृत पोएट्स नोन फ्रॉम इन्स्क्रिप्शन्स’ हा प्रकल्प हाती घेतला. पुणे विद्यापीठाने न.चिं. केळकर स्मृती व्याख्यानमालेसाठी १९६२ साली प्रा. डिस्कळकर यांना आमंत्रित केले. त्या वेळी त्यांनी ‘अ‍ॅन्शिएंट हिस्ट्री अँड सिव्हिलायझेशन ऑफ महाराष्ट्र’ हा विषय निवडला होता. त्याच वर्षी मुंबई विद्यापीठानेही त्यांना ‘ठक्कर वासनजी’ व्याख्यानासाठी आमंत्रित केले. त्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली, पण अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचे अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने इंडॉलॉजी आणि एपिग्राफी या विषयांची हानी झाली असेच म्हणावे लागेल. केंद्रीय मंत्री हुमाँयुन कबीर यांनी ‘आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ या संस्थेच्या एका सभेत त्यांच्या निधनाची नोंद घेतली. ऑक्स्फर्ड विद्यापीठातील इतिहासाचे प्रोफेसर एडवर्ड थॉम्पसन यांनीही त्यांच्या संशोधनाबद्दल गौरवोद्गार काढले.

     डॉ. ब्यूल्हर, डॉ. भगवानलाल इंद्रजी यांनी गुजरातमध्ये केलेल्या उत्खननानंतर प्रा. द.बा. डिस्कळकर यांनीच गुजरातच्या इतिहास संशोधनामध्ये भरीव कार्य केले असे म्हणता येईल.

     द.बा. डिस्कळकर यांची ग्रंथसंपदा—

     १) ‘सिलेक्शन फ्रॉम संस्कृत इन्स्क्रिप्शन्स’, (I,II), १९२५., २) ‘हिस्टॉरिकल पेपर्स ऑफ सिंदियाज ऑफ ग्वाल्हेर’, ३) ‘मिसलेनियस इन्स्क्रिप्शन्स ऑफ काठेवाड’ (कर्नाटक प. हाऊस), ४) ‘हँडबुक ऑफ इंदौर म्युझियम’, ५) ‘मॅग्निफिसंट महेश्वर’, (डायरेक्टर ऑफ इन्फर्मेशन, होळकर स्टेट), ६) ‘महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास व संस्कृती’ (पुणे विद्यापीठ), ७) ‘मटेरिअल्स यूज्ड फॉर इंडियन एपिग्राफिकल रेकॉडर्स’ (BORI).

     दत्तात्रेय बाळकृष्ण डिस्कळकर यांची संस्कृत आणि प्राकृत पोएट्स नोन फ्रॉम इन्स्क्रिप्शन्स कलेक्शन्स ऑफ रिसर्च पेपर्स ऑन इंडॉलॉजी ही अप्रकाशित पुस्तके आहेत.

डॉ. कल्पना रायरीकर

डिस्कळकर, दत्तात्रेय बाळकृष्ण