Skip to main content
x

डिसूझा, जोसेफ बेन

           जोसेफ बेन डिसूझा यांचा जन्म एका कॅथलिक कुटुंबात झाला. वडील जॉन आणि आई लिडवाइन यांच्या संस्कारांच्या छायेत ते वाढले. जन्माच्या वेळी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे वातावरण असल्यामुळे देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. दोन भाऊ व एक बहीण असा त्यांचा परिवार होता.

डिसूझा यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईतील सेंट झेविअर्स हायस्कूलमध्ये झाले. १९४४ साली त्यांनी सेंट झेविअर्स महाविद्यालयामधून गणित या विषयात पदवी घेऊन शिक्षण पूर्ण केले. पुढे १९५५ साली ते उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेले. तेथील सिरॅक्यूझ विद्यापीठामधून लोकसेवा व्यवस्थापन या विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण संपादन केले. तसेच १९५६मध्ये पुन्हा हार्वर्ड विद्यापीठ, केंब्रिज येथून लोकसेवा व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर अभ्यास पूर्ण केला.

डिसूझा यांनी देशसेवा करण्याच्या प्रेरणेतून १९४४मध्ये भारतीय नौसेनेत प्रवेश घेतला; पण त्यांना  भारतीय प्रशासनात काम करण्याची विशेष इच्छा झाल्यामुळे पुढे त्यांनी भारतीय नौसेना सोडून प्रशासकीय सेवेत प्रवेश केला.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४७मध्ये ते प्रशासकीय सेवेत रुजू झाले. त्यांनी फाळणीच्यावेळी पंजाबमध्ये निर्वासितांसाठी मदतकार्य केले. डिसूझा यांच्या कार्याचे भौगोलिक कार्यक्षेत्र बिहार, महाराष्ट्र, नवी दिल्ली इ. ठिकाणी होते. त्यांनी केवळ भारतातच नव्हे, तर पूर्व पाकिस्तानातील निर्वासितांच्या पुनर्वसनाचेदेखील काम संचालकपदी राहून केले.

१९५०मध्ये ते अलिबाग येथे जिल्हाधिकारी होते. त्यानंतर १९६४मध्ये औरंगाबाद येथे ते आयुक्त पदावर कार्यरत होते.

स.गो.बर्वे यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव डिसूझांसाठी संस्मरणीय ठरला. बर्वे यांची न्याय्य वर्तणूक, सचोटी व कार्याला वाहून घेण्याची वृत्ती यांमुळे ते भारावून गेले.

१९६६ ते १९६९मध्ये त्यांनी बी.ई.एस.टी.चे महाव्यवस्थापक म्हणून काम पाहिले. १९६९मध्ये ते बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त होते.

१९७० ते १९७४ या काळात त्यांनी नवी मुंबई प्रकल्पात सिडकोचे व्यवस्थापन निदेशक म्हणून काम पाहिले. तसेच नवी दिल्ली येथील हुडको प्रकल्पातदेखील ते व्यवस्थापन निदेशक पदावर कार्यरत होते. त्यांनी प्रशासनातील अनेक जबाबदाऱ्या अत्यंत चोखपणे निभावल्या. त्यांच्यातील कार्यक्षमता आणि प्रामाणिकपणा या गुणवैशिष्ट्यांसाठी ते प्रसिद्ध होते.

दिल्ली, आग्रा व भोपाळ येथील स्वस्त गृहनिर्माण योजना राबविण्यात डिसूझा यांचा महत्त्वाचा वाटा होता. १९७९ मध्ये डिसूझा हे प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या सेवाकाळात त्यांना अमेरिकेत सिरॅक्यूझ विद्यापीठाकडून आदर्श माजी विद्यार्थी पुरस्कारमिळाला होता.

डिसूझा हे कॅथलिक पंथाचे होते; पण त्यांची कोणत्याही धर्माशी वैचारिक बांधीलकी नव्हती. त्यांच्या ह्या वैशिष्ट्यासाठी १९९४ मध्ये त्यांना राजीव गांधी निधर्मवाद पुरस्काराने गौरविले गेले. निवृत्तीनंतर १९८१ ते २००१ मध्ये ते महाराष्ट्र शासनाच्या मुंबई विकास प्रकल्पांच्या परीक्षण समितीचे सदस्य होते. १९७९ ते १९८२ या काळात डिसूझा हे हैदराबाद येथील अ‍ॅडमिनिस्ट्रेशन स्टाफ कॉलेज ऑफ इंडियायेथे प्राचार्य होते. तसेच १९८२ ते १९८५ या काळात त्यांनी वर्ल्ड बँकेत नागरी व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम केले. त्यानंतर ते पुन्हा भारतात परतले. १९९२ मध्ये मुंबईतील जसलोक रुग्णालय येथे ते मुख्य अधिकारी पदावर होते.

२००२ मध्ये प्रकाशित झालेले त्यांचे नो ट्रंपेट्स नॉर ब्यूगल्स : रेक्लेशन्स ऑफ अ‍ॅन अनरिपेन्टट बाबूहे आत्मचरित्र त्यांच्या विविधांगी कर्तृत्वावर प्रकाश टाकते. त्याचाच एस.ए. वीरकर यांनी ना जलसा ना जल्लोषया नावाने मराठी अनुवाद केला आहे.

१९९७ ते २००७ या काळात ते मुंबई येथील नागरी निवाराया स्वस्त गृहनिर्माण योजनेत मुख्याधिकारी होते. आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्यरत होते.

- अनघा फासे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].