Skip to main content
x

दक्षिणदास, दिवाकर गणपती

        दिवाकर गणपती दक्षिणदास यांचा जन्म त्या काळच्या मध्य भारतातील दामोह जिल्ह्यात हत्ता नावाच्या लहान खेडेगावातील एका वेदशास्त्र संपन्न कुटुंबात झाला. दिवाकर दक्षिणदास यांच्या बालपणी घरची परिस्थिती गरिबीची होती. त्यांचे शालेय व माध्यमिक शिक्षण त्यांच्या हत्ता या लहान खेडेगावातच  झाले. त्याच शाळेतून मॅट्रिक झाल्यानंतर दक्षिणदास यांनी कृषी महाविद्यालय, नागपूर येथे प्रवेश घेतला. सरकारी शिष्यवृत्ती आणि गोखले यांचे आश्रित म्हणून त्यांनी सुरुवातीची काही वर्षे काढली. प्रथम वर्ष परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना सरकारी शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी १९३९मध्ये कृषी महाविद्यालयातून पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊन कृषी खात्यात नोकरीस सुरुवात केली. त्यांना १९४७मध्ये मध्य प्रदेश सरकारने पदव्युत्तर शिक्षणाकरता नवी दिल्ली येथील भा.कृ.अ.सं. येथे पाठवले.

        दक्षिणदास यांना दोन वर्षांच्या कालावधीनंतर १९४९मध्ये असो.आय.ए.आर.आय. ही पदवी मिळाली. त्यांना १९५५मध्ये कोलंबो योजनेप्रमाणे न्यूझीलंड देशात पीएच.डी.करता पाठवण्यात आले. १९५७मध्ये पीएच.डी. पदवी मिळाल्यानंतर त्यांनी कृषी महाविद्यालय, नागपूर येथे कृषिविद्या विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

        महाराष्ट्र राज्याची १९६०मध्ये स्थापना झाली आणि डॉ. दक्षिणदास यांची ऊस-विशेषज्ञ म्हणून नेमणूक झाली. त्या काळी को ७४० या नवीन उसाच्या जातीचा प्रचार त्यांनी केला. ऊस-विशेषज्ञ म्हणून त्यांचा डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशनबरोबर निकटचा संबंध आला. या काळात महाराष्ट्रात साखर कारखान्यांच्या स्थापनेला सुरुवात झाली होती. या सर्व विकासात डॉ. दक्षिणदास यांनी महत्त्वाचा वाटा उचलला.

        १९६४मध्ये मुख्य ऊस विकास अधिकारी म्हणून नवीन पद निर्माण केले गेले आणि हे पद प्रथमतः डॉ. दक्षिणदास यांनी भूषवले. त्यांचा ऊस संशोधन व विकासकामातील अनुभव पाहून त्यांना नायजेरियात प्रतिनियुक्तीवर पाठवले. तेथे साखर कारखाना स्थापण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. पुढे गोवा राज्यात साखर कारखाना स्थापण्यात त्यांचा सल्ला मोलाचा ठरला. निवृत्तीनंतर १९७५ ते १९७७ या काळात त्यांनी डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट  (हल्लीची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट) येथे कृषिविद्यावेत्ता म्हणून कार्य केले. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे १९३२पासून ऊस संशोधन केंद्र कार्यान्वित झालेले आहे. ऊस पिकाला व त्यायोगे साखर कारखानदारीला ऊर्जितावस्था देण्यात या केंद्राने केलेले कार्य फार महत्त्वपूर्ण आहे. या केंद्रावर ऊस-विशेषज्ञ म्हणून दिवाकर गणपती दक्षिणदास यांनी कार्य केले आहे.

        - डॉ. नारायण कृष्णाजी उमराणी

दक्षिणदास, दिवाकर गणपती