Skip to main content
x

दळवी, दत्तोबा संभाजी

चित्रकार व कलासंस्था संस्था

कोल्हापुरातील शाहू महाराजांची कृपादृष्टी लाभलेले आबालाल रहिमान यांच्यानंतरचे चित्रकार व दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट या १९३३ मध्ये स्थापन झालेल्या कलाशिक्षणसंस्थेचे संस्थापक म्हणून दत्तोबा संभाजी दळवी ख्यातनाम होते. त्यांचा जन्म देशमुखी असलेल्या घराण्यात झाला. गावे इनाम असणार्‍या या घराण्यात पूर्वी श्रीमंती व वैभव असले तरी दत्तोबांचा जन्म झाला त्या वेळी सर्व वैभव लयास गेले होते. त्यांचे शालेय शिक्षण चौथीपर्यंतच झाले. याच दरम्यान त्यांना चित्रकलेची आवड निर्माण होऊन ते पाटी-पेन्सिलचा उपयोग चित्र काढण्यासाठी करू लागले.

बुरूडगल्लीत त्यांच्या घरासमोरच बाबूराव पेंटरांचे बंधू आनंदराव पेंटर राहत. त्यांच्या सहवासात दळवींची चित्रकलेबद्दलची ओढ वाढली. सुरुवातीच्या काळात ते राजा रविवर्मा व आबालाल रहिमान यांच्या चित्रांवरून अभ्यास करीत. याच काळात ‘ललितकलादर्श’ या नाटक कंपनीसाठी रविवर्मांच्या ‘द्रौपदी वस्त्रहरण’ या चित्रावरून आनंदराव व बाबूराव पेंटर हे बंधू पडदा रंगवीत होते. त्यात दळवींना मदतनीस म्हणून काम करण्यासाठी संधी मिळाली. त्यांची ही आवड बघून १९१० मध्ये त्यांच्या हितचिंतकांनी त्यांना मुंबईस सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये पाठवले. शिक्षणाच्या काळात ते आदर्श विद्यार्थी म्हणून गाजले. याच काळात ते शाहू महाराजांच्या संपर्कात आले. शाहू महाराजांनी दळवींना शिष्यवृत्ती देऊन आपल्या बाले हाउस या इमारतीत त्यांची व्यवस्था केली.

दळवी यांच्या चित्रांना १९१२ च्या दरम्यान बरीच बक्षिसे मिळाली व बडोद्याच्या महाराजांनी त्यांची चित्रे विकत घेतली. दत्तोबा १९१३ मध्ये आर्टमास्टरच्या वर्गात शिकत असताना त्यांच्या वडिलांना अपघात होऊन त्यातच ते निवर्तले. त्यामुळे दळवी कोल्हापुरास परतले व त्यांच्या शिक्षणात खंड पडला.

पेंटिंगशिवाय चरितार्थासाठी इतरही काही कला अवगत असावी, म्हणून शाहू महाराजांनी त्यांना कलकत्त्याला गोंदण्याची कला (टॅटू) शिकण्यासाठी एका जपानी कलाकाराकडे पाठवले. चित्रकलेचे रीतसर शिक्षण घेतलेल्या दळवींनी या कलेत एवढे प्रावीण्य मिळविले, की राजघराण्यातील अनेक स्त्री-पुरुषांनी व सरदार, इनामदार आणि नोकरांनी दळवींकडून हातावर देवदेवतांची चित्रे गोंदवून घेतली. त्या काळी लोकप्रिय असणार्‍या हस्तिदंतावर चित्रे काढण्याच्या कलेत प्रावीण्य मिळवून त्यांनी अर्थार्जनासाठी त्या कलेचा उपयोग केला.

शाहू महाराजांची दळवींवर अत्यंत मर्जी होती व स्वतःसोबत दळवींना ते फिरतीवर घेऊन जात. यातूनच त्यांना इतर संस्थानिकांंची कामे मिळाली. शाहू महाराजांचे ६ मे १९२२ रोजी मुंबईत निधन झाले, तेव्हा दळवी त्यांच्या सोबतच होते. गिरगावातून औषधही त्यांनीच आणले; पण त्याचा उपयोग झाला नाही. महाराजांच्या मृत्यूनंतर त्याच अवस्थेत दळवींनी त्यांचे स्केचकेले होते, अशी नोंद आहे. यानंतर ते कोल्हापुरास परतले. या काळात त्यांनी राजघराण्यातील स्त्रियांंना भरतकामाचे शिक्षण देण्याचे काम केले.

कोल्हापुरामध्ये ‘पॅलेस थिएटर’ बांधण्यात आले. त्याचा पडदा रंगवण्याचे कामही दळवींना मिळाले. याशिवाय कोल्हापुरात सुरू झालेल्या चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी कलादिग्दर्शनाचे काम केले. ते १९१६ ते १९२६ या काळात ते स्टूडिओ चालवत होते. पुण्यात १९२२ मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते शिवस्मारकाचा पायाभरणी समारंभ झाला, त्या वेळी दळवींनी सजावटीसाठी चित्रे रंगवली होती. त्यांतील काही चित्रे पुण्याच्या चित्रशाळा प्रेसने शिळाप्रेसवर छापली होती. त्यांनी १९२२ मध्ये भगवानदास गोवर्धनदास यांच्यासाठी भगवद्गीतेवर आधारित चित्रे रंगवली. ‘किर्लोस्कर’, ‘मनोहर’ या मासिकांसाठी त्यांनी हास्यचित्रेही काढली.

दत्तोबा दळवींनी १९३३ मध्ये ‘दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट’ या कलाशिक्षणसंस्थेची स्थापना केली व पुढील आयुष्य कलाशिक्षणालाच वाहिले. संस्थेचा व्याप सांभाळणे व विद्यार्थी तयार करण्याच्या कार्यात त्यांचे स्वतःच्या चित्रनिर्मितीकडे दुर्लक्ष झाल्याचे आढळते.

दळवींची चित्रे पाहताना त्यांनी चित्रकलेच्या विविध प्रकारांमध्ये चित्रनिर्मिती केल्याचे आढळते. त्यांच्या चित्रशैलीवर धुरंधर व तासकर या त्यांच्या जे.जे. स्कूलमधील शिक्षकांचा प्रभाव होता. या चित्रांमधून त्यांचा निसर्ग, वास्तू यांचा अभ्यास दिसून येतो. याशिवाय त्यांचा मानवी शरीराचा अभ्यास व त्यातून निर्माण होणारी व्यक्तिचित्रे, प्रसंगचित्रे व हास्यचित्रेही त्यांनी काढली आहेत. निसर्गचित्रे बघता त्यांतील ‘मोका गेट’ हे सुरुवातीच्या काळातील निसर्गचित्र त्यातील वैशिष्ट्यांमुळे एक उत्कृष्ट चित्र ठरते. त्यातील रचना, अपारदर्शक जलरंगाच्या हाताळणीतून निर्माण झालेले गूढरम्य वातावरण व छायाप्रकाशाचा वापर वैशिष्ट्यपूर्ण आहे. आकाशाचा निळसर रंग, त्यामुळे उंच दरवाजावर असणारी कौलारू माडी, त्याखालचा दरवाजा व उघड्या दरवाजातून दिसणारे गल्लीचे दृश्य यांतील शीत व उष्ण रंगांच्या वापरातून हे नाट्य अधिकच खुलते व मनावर ठसते ती या मोका दरवाजाची भव्यता आणि गूढरम्य वातावरण!

व्यक्तिचित्रांत ‘ब्लॅक ब्यूटी’ हे १९१८ मधील एका वृद्धाचे चित्र व त्यानंतरच्या काळातील १९३०-३५ च्या दरम्यानचे ‘सेल्फ पोटर्र्ेट’ त्यांच्या व्यक्तिचित्रणावरील तांत्रिक प्रभुत्वाची साक्ष देतात. केवळ ९’’× ६’’ आकाराचे ‘ब्लॅक ब्यूटी’ हे चित्र, पांढरे मुंडासे, अंगरखा घातलेल्या सावळ्या रंगाच्या सुरकुत्यांनी भरलेल्या वृद्धाचे आहे. त्यातून काळसर रंगाच्या विविध छटांचा, पांढरा कागद सोडत केलेला वापर व चित्रातील चेहर्‍यावरील ब्रशचे नाजूक फटकारे हस्तिदंतावरील चित्र रंगवण्याच्या तंत्राशी जवळीक दाखवतात. याउलट ७’’× ५’’ आकाराचे ‘सेल्फ पोर्ट्रेट’ जलरंगाचा प्रवाही वापर करत व एकावर एक थर देत साकार होते. याशिवाय त्यांनी शिवाजी महाराज व संत तुकाराम भेट व हिरकणी यांसारखी ऐतिहासिक विषयांवरील चित्रेही रंगविली आहेत.

रेखाटनातील दळवींच्या प्रभुत्वाची साक्ष त्यांच्या रेखाटनांमधून, तसेच हास्यचित्रांमधूनही व्यक्त होते. दळवींचे जे.जे.तील वर्गमित्र व्यंगचित्रकार व किर्लोस्कर मासिकाचे संस्थापक शंकरराव किर्लोस्कर यांच्या आग्रहावरून मानवी जीवनातील विसंगती व त्यातून निर्माण होणारा विनोद यांवर भाष्य करीत दळवींनी ‘किर्लोस्कर’ व ‘मनोहर’साठी हास्यचित्रे काढली. या चित्रांमधून त्यांचे मानवी जीवन व स्वभावांचा अभ्यास आणि हसवणारे भाष्य आढळते. किर्लोस्करच्या १९३४ मधील दिवाळी अंकातील हास्यचित्रात ‘वटपौर्णिमे’चे दृश्य आहे. त्यात वटपूजा करणार्‍या स्त्रिया पार्श्‍वभागी दिसतात. पुढील भागात एक अतिविशाल महिला दिसत असून तिचा किरकोळ शरीरयष्टीचा संतापलेला पती, पाठीवरच्या लहान मुलासह, तिचा पदर पकडून तिला दम देत असल्याचे दिसते. या महिलेचा अतिविशाल आकार, दम देणार्‍या नवर्‍याची किरकोळ देहयष्टी यांतून निर्माण होणारा विरोधाभास, व विसंगती प्रेक्षकाला मानवी जीवनातील वास्तवाची जाणीव करून देते. तेवढ्यात उजव्या बाजूचे वाक्य नजरेस पडते, ‘जन्मोजन्मी मीच पती मिळण्याबद्दल वर मागितलास की काय तू?’ आणि वाचकाच्या चेहर्‍यावर उत्स्फूर्त हास्य उमटते.

दळवींची एकूण चित्रनिर्मिती बघता, ते सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकले तो काळ व त्या काळातील चित्रकलेचे आदर्श यांतून ते आयुष्यभर बाहेर पडू शकले नाहीत हे लक्षात येते. त्या काळात दृश्यकलेत देशात व परदेशांत होणारे प्रयोग, विविध प्रवाह, पुनरुज्जीवनवादी कलाचळवळ व नंतरच्या काळातील आधुनिक काळातील विचारप्रवाह यांपासून ते अलिप्त असल्याचे जाणवते. त्यांच्या मर्यादा व बलस्थानांसोबतच लहान आकारातील चित्रे हे त्यांचे वैशिष्ट्य लक्षात येते आणि मनात प्रश्‍न उभा राहतो, की त्यांनी चित्रे लहान आकारातच का काढली असावीत? पण कोल्हापुरातील त्यांच्या समकालीन चित्रकारांची चित्रे बघितल्यावर असे लक्षात येते, की या काळातील चित्रकारांनी, गुरुस्थानी असणार्‍या आबालाल रहिमान यांनी लहान आकारातील चित्रे काढली त्याचेच अंधानुकरण केले असून, पुढील काळातही ते सुरूच राहिले. पण  आबालाल यांच्या चित्रातील प्रगल्भ आविष्कार, हाताळणीतील वैविध्य, प्रयोगशीलता, उत्स्फूर्तता व कलात्मकता यांची उंची हे चित्रकार गाठू शकले नाहीत.

दत्तोबा दळवींच्या संदर्भात असे म्हणता येईल, की शिक्षणसंस्था सुरू करून त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला आणि त्यांच्या कलानिर्मितीला मर्यादा पडल्या. म्हणूनच त्यांचे समकालीन कलावंत व समाजसुधारक भाई माधवराव बागल यांनी लिहून ठेवले आहे की,‘दळवी जर शिक्षण क्षेत्रात न जाता कलावंत म्हणून जगले असते, तर महाराष्ट्रातल्या कलावंतांच्या पहिल्या श्रेणीत गेले असते.’

‘दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट’ ही संस्था कोल्हापुरामध्ये चित्रकलेचे शिक्षण देणारी अग्रगण्य संस्था आहे. आयुष्याच्या अखेरपर्यंत दळवी या संस्थेच्या उत्कर्षासाठी झटले.

- सुहास बहुळकर

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].