Skip to main content
x

दळवी, जयवंत द्वारकानाथ

ठणठणपाळ

     जयवंत दळवी यांचा जन्म गोव्यातील हडफडे गावी झाला. दळवी वेंगुर्ल्यापासून आठ-नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या समुद्रकिनार्‍यावरील आरवली गावचे. जवळच्या शिरोडे गावी त्यांनी पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतले. नंतर ते मुंबईला आले आणि घरच्या दडपणामुळे मॅट्रिक झाल्यावर मुंबईच्या व्ही.जे.टी.आय.मध्ये टेक्स्टाइल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा घेण्यासाठी अभ्यास करू लागले. पण डिप्लोमा अर्धवट टाकून मुंबईच्या ‘प्रभात’ दैनिकात ते रुजू झाले. तेथून ते ‘लोकमान्य’मध्ये गेले. एम.ए.साठी त्यांनी ‘इमोशन अ‍ॅन्ड इमॅजिनेशन अ‍ॅन्ड देअर प्लेस इन लिटरेचर’ या विषयावर संशोधन करून प्रबंध सादर केला. अमेरिकन सरकारच्या मुंबई येथील माहिती खात्यात (युसिस) त्यांनी नोकरी स्वीकारली. लेखनासाठी पूर्ण वेळ मिळावा म्हणून त्यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी १९७५ साली स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.

बालपणी त्यांच्यावर राष्ट्र सेवा दलाचे संस्कार झाले होते. श्रमदान मोहिमेत ते उत्साहाने भाग घेत. त्यांची पहिली कथा ‘दातार मास्तर’ १९४८मध्ये ‘नवा काळ’ दैनिकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांच्या लेखणीला बहर आला आणि विविध साहित्य प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले. ‘गहिवर’ (१९५६), ‘एदीन’ (१९५८), ‘रुक्मिणी’ (१९६५), ‘स्पर्श’ (१९७४) आदी १५ कथासंग्रह; ‘चक्र’ (१९६३), ‘स्वगत’ (१९६८), ‘महानंदा’ (१९७०), ‘अथांग’ (१९७७), ‘अल्बम’ (१९८३) आदी २१ कादंबर्‍या; ‘संध्याछाया’ (१९७४), ‘बॅरिस्टर’ (१९७७), ‘सूर्यास्त’ (१९७८), ‘महासागर’ (१९८०), ‘पुरुष’ (१९८३), ‘नातीगोती’ (१९९१) आदी १९ नाटके दळवींनी लिहिली आणि त्यातील बहुतेक पुस्तके गाजली. ‘लोक आणि लौकिक’ हे प्रवासवर्णन आणि ‘सारे प्रवासी घडीचे’ हे कोकणातील विलक्षण व्यक्तींचे आणि त्यांच्या जगावेगळ्या कर्तृत्वाचे, विक्षिप्तपणाचे चित्रण करणारे विनोदी पुस्तक वाचकप्रिय ठरले.

दळवींची ‘चक्र’ ही पहिलीच कादंबरी मराठी कादंबरीच्या अनुभव क्षेत्राची कक्षा वाढविणारी आणि प्रादेशिकतेची कोंडी फोडणारी अगदी वेगळ्या विषयावरची कादंबरी म्हणून वाखाणली गेली. मुंबईतील झोपडपट्टीमधील गलिच्छ जीवन, तेथे वस्ती करणार्‍यांचे उघडे-नागडे आयुष्य चितारताना पत्रकारितेच्या काळात आलेले जिवंत अनुभव दळवींना उपयोगी ठरले. बकाल परिसरात पशुतुल्य आयुष्य जगणार्‍या तेथील व्यक्तींच्या स्वप्नांचा, जीवनमूल्यांचा वेध दळवी घेतात. मध्यमवर्गीयांना सर्वस्वी अपरिचित असलेल्या चित्रविचित्र संघर्षाचे प्रत्ययकारी चित्रण ते करतात. कादंबरीला कथानक नाही, पण त्यातील व्यक्तिचित्रे महत्त्वाची आहेत आणि ती दळवींनी प्रभावीपणे उभी केली आहेत. मराठीतील एक अभूतपूर्व कादंबरी म्हणून ‘चक्र’चा उल्लेख केला जातो.

दळवींच्या सर्वच लेखनात विकार-वासनांच्या आवर्तात भोवंडून जाणारी माणसे पदोपदी भेटतात. दळवींचे बालपण तीस-चाळीस माणसांच्या एकत्र कुटुंबात गेले. जुन्या परंपरा प्राणपणाने जपणारे ते कुटुंब होते. कुटुंबाचा लवाजमा मोठा होता. त्यात विकेशा विधवा होत्या, वेडगळ व्यक्ती होत्या, वेगवेगळ्या वृत्तींची-विकारांची माणसे होती. संस्कारक्षम वयात दळवींचा संपर्क अशा माणसांशी आला. मध्यरात्री माजघरातून बाहेर येणारे दबलेले उसासे आणि हुंदके त्यांनी ऐकले, वेडसर माणसांचा आयुष्यक्रम त्यांनी न्याहाळला. माणसाच्या आयुष्यातील भोगवट्याचे, अतृप्त वासनांचे, सुख-दुःखांचे दशावतार त्यांच्या कथा, कादंबरी, नाटक यांत दिसतात. आदिम कामेच्छांचे अस्वस्थ करणारे चित्र त्यांच्या साहित्यात आढळते. वेडी, अर्धवट पात्रे त्यांच्या साहित्यकृतींतून डोकावतात. माणसाचे उघडे-नागडे दुःख, व्यावहारिक जीवनाच्या धबडग्यात त्याची होणारी कोंडी आणि त्यातून अपरिहार्यपणे माणसाच्या वाट्याला येणारे एकाकीपण यांचा मन सुन्न करणारा आविष्कार त्यांच्या ‘संध्याछाया’, ‘सूर्यास्त’, यांसारख्या नाटकांत झालेला दिसतो. ‘चक्र’, ‘स्वगत’, ‘धर्मानंद’, ‘अल्बम’ यांसारख्या कादंबर्‍यांत आणि ‘बॅरिस्टर’, ‘पुरुष’, ‘महासागर’, ‘लग्न’ यांसारखा नाटकांत त्यांनी लैंगिक वासनेतून निर्माण होणार्‍या विकृतीच्या, वासनेच्या तळाशी असलेल्या क्रूर प्रवृत्ती यांची धगधगती चित्रे रंगविलेली आहेत. दळवींच्या सर्वच लेखनात सहजपणा आहे, वाचकांना खिळवून ठेवण्याची ताकद आहे.

वाट्याला आलेल्या विलक्षण, व्यामिश्र अनुभवांनी अंतर्यामी उदास असणार्‍या माणसांच्या व्यथा-वेदनांचे खिन्न करणारे चित्रण करणार्‍या या प्रतिभावंताने एक मुखवटा धारण केला होता. त्याचे नाव ‘ठणठणपाळ’! लौकिक जगात दिसणारे दळवींचे रूप प्रसन्न, विनोदी, मिस्कील बोलणारे, चेष्टा करणारे, दुसर्‍यांच्या विनोदाला खळखळून हसून दाद देणारे असे होते. ‘सारे प्रवासी घडीचे’मध्ये अस्सल कोकणी माणसांची व्यक्तिचित्रे दळवींनी रंगवली. वरून भोळीभाबडी वाटणारी पण मोठी बिलंदर माणसे दळवींनी या पुस्तकात उभी केली आहेत. ‘ठणठणपाळ’ हे टोपणनाव धारण करून ‘ललित’ मासिकात त्यांनी ‘घटका गेली पळे गेली’ हे सदर वीस वर्षे चालविले. अत्यंत मार्मिक आणि तरल विनोदाचा वस्तुपाठच त्यांनी जाणत्या वाचकांसमोर ठेवला. मराठी वाङ्मयातील, वाङ्मयसमीक्षेतील आणि एकंदर वाङ्मयव्यवहारातील अनिष्ट, अर्थशून्य आणि वाङ्मयविकासाला मारक ठरणार्‍या अनेकविध प्रवृत्तींचे फुगे त्यांनी हसत-हसत फोडून टाकले. ‘ठणठणपाळ’-विषयी ज्ञानपीठकार विंदा करंदीकर यांनी म्हटले आहे, ‘ठणठणपाळच्या भूमिकेतून दळवींनी केलेल्या लिखाणाला व कार्याला तोड नाही. इतकी जागरूकता, इतके शहाणपण, इतका जिव्हाळा आणि इतका परखडपणा मराठी समीक्षात्मक विभागाला अजूनपर्यंत भेटलेला नव्हता.’ गंभीर कथालेखनाबरोबर दळवींनी विनोदी लेख व कथा लिहिल्या. फॅन्टसीच्या दिशेने जाणार्‍या विक्षिप्त कथा लिहिल्या. मात्र ‘विनोदी लेखक’ म्हणून आपल्यावर शिक्का पडावा, असे त्यांना कधीच वाटले नाही. सर्वसाधारणपणे लेखन गंभीर हवे आणि अधूनमधून विनोद यायला हवा हे पथ्य त्यांनी नेहमीच पाळले.

दळवी माणसांत रमणारे असले, तरी वृत्तीने एकाकी होते. महाराष्ट्र शासनाचे, नाट्य परिषदेचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. पण गर्दीपासून ते दूर राहिले. सार्वजनिक सभांत त्यांनी सक्रिय भाग घेतला नाही. सभा संमेलने टाळली. ‘अखिल भारतीय साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद त्यांनी नाकारले. दळवी चतुरस्र प्रतिभेचे लेखक होते. मराठी साहित्याला त्यांनी केलेले योगदान फार महत्त्वाचे आहे.

- डॉ. सुभाष भेण्डे

दळवी, जयवंत द्वारकानाथ