Skip to main content
x

डॉ. आंबेडकर, भीमराव रामजी

आंबेडकर, बाबासाहेब

   भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावाने प्रसिद्ध असून त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झाला. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडपासून पाच किलोमीटर अंतरावर असणारे आंबवडे हे होय. घराण्याचे कुलनाव सपकाळ होते. वडील रामजी सपकाळ हे सैन्यदलात सुभेदार होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एका वाक्यात परिचय करून द्यायचा तर असे म्हणता येईल, की ते आधुनिक युगाचे स्मृतिकार होते. त्यांनी तयार केलेल्या स्मृतिनुसार (संविधानानुसार) आपल्या देशाची राजकीय, सामाजिक प्रक्रिया चालू आहे. समाजशास्त्रज्ञ, विचारवंत, प्राध्यापक, अर्थशास्त्रज्ञ, पत्रकार, सामाजिक नेतृत्व अशा विविध पैलूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा अभ्यास करता येतो.

     डॉ. आंबेडकर यांच्या नानाविध पैलूंपैकी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ते धर्मप्रवर्तक होते. सखोल चिंतन आणि प्रदीर्घ अभ्यास यांच्या माध्यमातून ‘मानवाचा कल्याणकारी धम्म’ असणाऱ्या बौद्ध धम्माचा स्वीकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत १४ ऑक्टोबर १९५६ रोजी केला आणि शतकानुशतके जातिभेद,अस्पृश्यता यांच्यामुळे शोषित जीवन जगणाऱ्या समूहाला नवा मार्ग मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शालेय जीवनात गुरुवर्य केळुसकर यांनी गौतम बुद्धांचे चरित्र सप्रेम भेट दिले होते. त्या काळात बाबासाहेबांच्या मनावर तथागतांच्या विचारांचा प्रभाव निर्माण झाला असावा. पुढच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण लढा हा समाजसुधारणेइतकाच धर्मसुधारणेचाही होता. कारण जातिव्यवस्था हा हिंदूधर्माचा अविभाज्य घटक असल्यामुळे माणसा-माणसांमधील भेदांच्या पुरातन तटबंदीला सुरुंग लावणे आवश्यक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचे वर्णन करताना म्हटले आहे की, ‘तत्त्वज्ञानाच्या बाबतीत हिंदू धर्मासारखा दुसरा कोणताही धर्म उच्चकोटीचा नाही; पण व्यवहाराच्या बाबतीत हिंदू धर्मासारखा पशुवत दुसरा कोणताही धर्म नाही.’ तत्त्वज्ञान आणि व्यवहार यांच्यातील हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळीच्या माध्यमातून केला. महाड चवदार तळे सत्याग्रह प्रसंगी त्यांनी सांगितले की, ‘‘ही सभा समतेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी बोलावली आहे.’’ या सभेत त्यांनी हिंदुमात्रांच्या मुक्तीचा जाहीरनामा प्रकाशित केला. अस्पृश्यता, जातिभेद यांना अधिष्ठान देणारी, धार्मिक आधार देणारी मनुस्मृती दहन केली. सतत तीन वर्षे चाललेल्या काळाराम मंदिर प्रवेश आंदोलनातून समानतेचा हक्क मिळवण्याचा प्रयत्न केला.

     हिंदुधर्मात काही सुधारणा होईल म्हणून अखंड चळवळ चालवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तेव्हा विपरीत अनुभवांचा सामना करावा लागला. हिंदू धर्माचार्य आणि सामाजिक नेतृत्व यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनाला आणि प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिला नाही आणि शेवटी येवला येथे १९३५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घोषणा केली, ‘‘मी हिंदू धर्मात जन्मलो; पण हिंदू धर्मात मरणार नाही.’’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या घोषणेनंतर ख्रिश्चन व शीख धर्मांकडून संपर्क करण्यात आला होता. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे एकवीस वर्षे वाट पाहिली आणि तथागतांच्या तत्त्वज्ञानाचा अंगीकार केला. भारतात दुसऱ्यांदा धर्मचक्र प्रवर्तन झाले. १९३५ ते १९५६ या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करत होते. येवला परिषदेनंतर काही आठवड्यांतच पुण्यात एक परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेत नवा धर्म स्थापन करण्याचा कार्यकर्त्यांनी आग्रह केला. डॉ. आंबेडकरांनी त्यांना दाद दिली नाही. ३१ मे १९३६ रोजी मुंबईत दादर येथे धर्मांतर परिषद झाली. या परिषदेत भाषणाचा शेवट करताना ते म्हणाले, ‘‘बुद्धाला शरण जा.’’ या काळात डॉ. आंबेडकर अनेक बौद्ध भिख्खूंना भेटले. ऑक्टोबर १९४८ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘शूद्र कोण होते’ हा ग्रंथ प्रकाशित झाला. त्यात त्यांनी, ‘बौद्धांनी बौद्ध धर्माचा त्याग करण्याच्या ब्राह्मणांच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही, त्यांच्यावर ब्राह्मणांनी अस्पृश्यता लादली’, असा सिद्धान्त मांडला. १९५० मध्ये बुद्ध जयंती जाहीरपणे साजरी केली गेली. त्या वेळी भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘‘समाजाची धारणा करणारा, आधुनिक काळात मार्गदर्शन करू शकणारा, बुद्धिवादावर आधारित एकमेव धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय.’’ २५ जुलै १९५० रोजी वरळीच्या बौद्ध मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण केले तेव्हा त्यांनी घोषणा केली की, ‘‘मी माझं उर्वरित आयुष्य बुद्धाच्या सेवेत आणि बौद्धाच्या प्रचाराच्या कामी व्यतीत करणार आहे.’’

     १९१० ते १९५५ या काळात बुद्ध चरित्र आणि बौद्ध धर्मावर डॉ. आंबेडकरांनी अनेक लेख लिहिले आणि व्याख्याने दिली. डिसेंबर १९५४ मध्ये जागतिक बौद्ध परिषदेच्या रंगून येथील तिसऱ्या अधिवेशनात त्यांनी उत्साहाने भाग घेतला. जानेवारी १९५५ मध्ये त्यांनी देहू रोडला एका बुद्धविहाराचे उदघाटन केले आणि बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना केली. मार्च १९५६ मध्ये त्यांनी ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा आपला ग्रंथ लिहून पूर्ण केला. मे महिन्यात डॉ. आंबेडकर यांनी बी.बी.सी.वर एक प्रकारचे बौद्ध प्रवचन दिले आणि अखेरीस १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे आपल्या लक्षावधी अनुयायांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्मात प्रवेश केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नव्या युगाचे धर्म- प्रवर्तक ठरले. अडीच हजार वर्षांपूर्वी महाकारुणिक तथागताने सांगितलेले तत्त्वज्ञान आणि जीवनपद्धती डॉ. आंंबेडकरांनी स्वीकारली.

     डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर केले असे म्हणता येणार नाही. कारण, त्यांनी इथल्या मातीत जन्मलेला आणि इथल्या संस्कृतीतून विकसित झालेला धम्म स्वीकारला. गोलमेज परिषदेच्या वेळी डॉ. आंबेडकरांनी दलित वर्गांना प्रोटेस्टंट हिंदू किंवा नॉन-कनकॉमिस्ट हिंदू म्हणा अशी मागणी केली होती. त्यांच्या मनात हिंदुधर्माविषयी अढी नव्हती, तर धर्म-तत्त्वज्ञान यात सुधारणेला प्रचंड वाव आहे, अशी त्यांची भूमिका होती. ते म्हणाले होते, ‘‘जर माझ्या मनात द्वेषाची, सुडाची भावना असती, तर पाच वर्षांच्या आत या देशाचे वाटोळे केले असते.’’ 

     डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म स्वीकारून हिंदू संस्कृती न सोडण्याची खबरदारी घेतली आहे. ते म्हणाले होते, ‘‘जो धर्म या देशातील प्राचीन संस्कृतींना धोका देईल किंवा अस्पृश्यांना अराष्ट्रीय बनवील असा धर्म मी केव्हाही स्वीकारणार नाही. कारण, देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून स्वत:च्या नावाची नोंद करून घेण्याची माझी इच्छा नाही.’’ यावरूनच असे सिद्ध होते, की डॉ. आंबेडकरांनी स्वीकारलेला धम्म हा या देशातील संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांच्याशी विसंगत नाही.

    डॉ. आंबेडकरांचे काही टीकाकार म्हणतात, की आंबेडकरांनी उपदेशिलेला धर्म हा बौद्ध धर्म नसून आंबेडकर धर्म आहे. त्यांचा धर्म आवश्यक असेल तेव्हा हत्या करण्यास अनुज्ञा देतो. त्यांचा भारतीयांना अमर संदेश असा आहे की, त्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढले पाहिजे.

     कुप्रथा,रूढी,अंधश्रद्धा,उच्च-नीचता,जातीभेद यांना कंटाळून आणि या शोषणापासून मुक्त होण्यासाठी आंबेडकरांनी तथागताचा धम्म स्वीकारला. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धम्म दीक्षा घेतल्यावर संपूर्ण भारत बौद्धमय करण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली होती; पण धम्मदीक्षेनंतर काही दिवसांतच ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले.

रवींद्र गोळे

डॉ. आंबेडकर, भीमराव रामजी