Skip to main content
x

डोळे, नारायण यशवंत

     नारायण यशवंत डोळे यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल, रमणबागेत झाले तर सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. १९४८ मध्ये महाविद्यालयात असताना गांधी हत्येनंतर दंगली उसळल्या, त्यावेळी प्रा. सोनोपंत दांडेकर प्राचार्य होते. आग लावायला आलेल्या जमावाला रोखण्यासाठी सोनोपंत, प्राध्यापक वर्ग व हे सर्व विद्यार्थी सरसावले. प्राचार्य व प्राध्यापकांच्या त्यावेळच्या धडाडीच्या वागणुकीचे उत्तम संस्कार डोळे यांच्यासारख्या विद्यार्थ्यांवर झाले. १९५१ साली अर्थशास्त्रात बी.ए. झाले. १९५३ मध्ये एम.ए.ला राज्यशास्त्र विषय घेऊन पहिला क्रमांक पटकावला.

      १९५७ मध्ये नोकरी करीत त्यांनी पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी संपादन केली. त्याच वर्षी ते नांदेडला आले व तेथून १९६२ मध्ये उदगीरच्या महाविद्यालयात प्रविष्ट होऊन तेथेच राहिले. अध्यापन व अध्ययन ही त्यांची खरी आवड. त्याचसोबत उत्तम प्रशासक म्हणून त्यांनी चौफेर नावलौकिक संपादन केला.

     उदगीरच्या महाविद्यालयाचे नाव महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय होते. परंतु प्राचार्य डोळे यांच्या काळात ते ‘डोळ्यांचे महाविद्यालय’ म्हणून ओळखले जाऊ लागले. वयाच्या ३१ व्या वर्षी डोळे प्राचार्य झाले.

     १९६३ ते १९९० या आपल्या कारकीर्दीत त्यांनी विविध उपक्रम राबवून आपल्या महाविद्यालयाला नामवंत करण्याची प्रशंसनीय कामगिरी केली. विद्यार्थ्याचे प्रेम आणि विश्‍वास हेच खऱ्या शिक्षकाचे भांडवल असते हे त्यांनी सुरवातीपासून ओळखून आपल्या वागणुकीनेच याचे प्रत्यंतर घडविले.

      विद्यार्थीच नसतील तर आपल्या अस्तित्वालाच काही अर्थ नाही असे त्यांना वाटे. प्राचार्य, प्राध्यापक, ग्रंथालय, इमारत, प्रयोगशाळा वगैरे सर्व कशासाठी? विद्यार्थी असतात म्हणूनच ना? हेच तत्व त्यांनी सतत जोपासले. गरीब, ग्रामीण, मागास व दलित विद्यार्थ्यांच्या विकासासाठी त्यांनी भरीव व प्रशंसनीय कार्य केले.

      प्राचार्य डोळे स्वतः वेळेपूर्वी येत. त्यामुळे प्राध्यापक व कार्यालय कर्मचार्‍यांनाही वेळेवर येण्याचे बंधन पाळावे लागे. डोळे यांनी आपल्या कार्यालयाबाहेर पाटी लावून तसे वर्तनही केले. ‘यू आर वेलकम, वॉक इन’ युवकांशी कसे वागावे याचे संस्कार डोळे यांनी राष्ट्र सेवादलात आत्मसात केलेले होते. विद्यार्थ्यांची तक्रार ते तत्परतेने व गंभीरतेने घेत असत. ते स्वतः काही काळ राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष होते आणि छात्रभारती या विद्यार्थी संघटनेचे प्रमुख मार्गदर्शकही होते.

      विद्यार्थ्यांचे मनोगत, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी प्राचार्य डोळे यांनी पालक - प्राध्यापक योजना सुरू केली. प्राध्यापकांच्या बैठकीत विचार करून प्रत्येक प्राध्यापकाकडे २५ विद्यार्थी सोपविले. प्राध्यापकांनी नीटनेटके रहावे, आपली गुणवत्ता वाढवीत रहावे, डॉक्टरेट मिळवावी, वर्गात उभे राहून शिकवावे, विद्यार्थी - प्रवेशाचे वेळी त्यांना कोणत्या शाखेत जावे, कोणते विषय निवडावे, भावी नोकरीची संधी, त्याचा कल व गुणवत्ता पाहून व्यक्तिशः मार्गदर्शन करणे सुरु केले. डोळे स्वतः सकाळी ८ ते १ आणि दुपारी ३ ते ५.३० महाविद्यालयामध्ये असत. विद्यार्थ्यांना रागवायचे असल्यास जाहीर टीका करायची नाही तर आपल्या कार्यालयात एकट्याला बोलावून ते समजावून सांगत असत. प्राध्यापकांनी ग्रंथालयाचा उपयोग करावा, फक्त अभ्यासक्रम पूर्ण करण्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न करावा असे ते वारंवार सांगत असत. 

      मुलींना सायकल चालवता येत नसे म्हणून शिकण्यासाठी त्यांनी १०-१२ सायकली भाड्याने आणून ठेवल्या व सूचना लावली. हौशी प्राध्यापकाची योजना करून कॉलेजच्या मैदानात रिकाम्या तासाला शिकविण्याची व्यवस्था केली. मुलांपैकी गरीब, दलित, ग्रामीण मुले अनवाणी येत. त्यांना स्वतःच्या खिशातले पैसे देऊन चप्पल विकत घ्याव्या यासाठी त्यांनी मदत केली. महाविद्यालयाचे ग्रंथालय अत्यंत समृद्ध करून मुलांना घरी पुस्तके देण्याची सोय केली. पाठ्यपुस्तके, शिष्यवृत्तीचे पैसे त्यांना मिळावे म्हणून वेळोवेळी त्यांनी मुलांची सोय पाहिली. विद्यार्थी कल्याण मंडळाच्या निवडणुकांमध्ये गैरप्रकार कधी झाले नाहीत.  विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यासाठी केंद्र प्रमुख म्हणून प्राचार्याचे नाव असे. त्याला मानधन मिळे. प्राचार्यांनी प्राध्यापकांच्या बैठकीत या कामाचे सर्वानुमते वाटप केले व चांगला पायंडा पाडला.

     मुलांना स्थानांतर प्रमाणपत्र (ट्रान्स्फर सर्टिफिकेट) मिळण्यास खूप अडचण होत असे. डोळे यांनी विद्यार्थ्यांना बिनदिक्कत महाविद्यालयामध्ये प्रवेश देणे सुरू केले व त्याचे टी.सी. मार्क मेमो महाविद्यालयातर्फे मागवून घेतले. शाळा मुलांची अडवणूक करीत व मुलांना प्रवेशाला फार अडचण होई. डोळे यांच्या या कृतीने मुलांना दिलासा मिळाला. शिष्यवृत्तीधारक मुलांना प्रवेश घेतल्याबरोबर तीन महिन्यांची शिष्यवृत्ती देणे डोळे यांनी सुरू केले. त्यामुळे मुलांच्या राहण्याजेवण्याची व्यवस्था होत असे. गरीब मुलांना कमी खर्चात रहाता यावे म्हणून महाविद्यालयाच्या नावे त्यांनी गावात काही वाडे भाड्याने घेेतले व तेथे वसतिगृह चालविले.

       महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सामूहिक भोजनाचा कार्यक्रम ते आग्रहाने ठेवीत. त्यामुळे जातीधर्माच्या, स्पृश्य-अस्पृश्यतेच्या भिंती मोडून एकत्र जेवायला बसता येई व आपसात जवळीक निर्माण होई. पैशाअभावी परीक्षेला बसता येत नाही असा एकही विद्यार्थी महाविद्यालयामध्ये असता कामा नये याची ते कटाक्षाने काळजी घेत. वर्गावर्गात जाऊन चौकशी करीत.

       गावी गेलेल्या मुलांना निरोप पाठवून बोलावून घेत. अनुसुचित जातीजमातीच्या मुलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून प्रा. गवळी यांच्या सूचनेवरून डोळे यांनी ‘आंबेडकर डिबेटिंग असोसिएशन’ ची स्थापना केली व तिच्या वतीने वर्षभर वक्तृत्व स्पर्धा ठेऊन ढाल, पेले, रोख बक्षिसे देणे सुरू केले. बैलपोळा, पंचमी, अशा सणांना उपस्थिती नाममात्र असे. प्राचार्यांनी पंचमीपूर्वी महाविद्यालयाच्या आवारातील चिंचेच्या झाडांना दोरखंड बांधून तीन झोके तयार केले.

     मुलेमुली आनंदली. गरीब मुलांना शहरी खेळ परवडत नसत. डोळे यांनी मोकळ्या तासाला विटीदांडूचा खेळ खेळण्यास मुलांना प्रोत्साहन दिले. १९६८ साली त्यांनी प्राध्यापकांची एक गृहनिर्माण संस्था स्थापन केली. १९८० मध्ये उदय सहकारी सोसायटीतील ३०-३६ जणांची सोय झाली.

     महाविद्यालयाच्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी डोळे त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष देत. संस्कार व्हावे, महाविद्यालयाचे वातावरण रम्य व्हावे म्हणून त्यांनी सकाळी ७.३० ते ८ पर्यंत देशभक्तीपर, भावगीते, शास्त्रीयसंगीत, भजने, वाद्यसंगीत अशा स्वरूपाच्या ध्वनिमुद्रिका लावण्याचा उपक्रम केला. मुलामुलींना ही योजना आवडली. सकाळच्या प्रसन्नतेत त्यामुळे भर पडली.

     दरवर्षी १४ ऑगस्टला रात्री ९ ते १२ देशभक्तीपर गीतांच्या स्पर्धा सुरू केल्या. सर्व शाळा, महाविद्यालयांना आमंत्रण असे. या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयचे समृद्ध ग्रंथालय पाहून प्रसिद्ध समीक्षक वा.ल. कुलकर्णींनी त्यांचे कौतुक केले. फाटलेल्या पुस्तकांची वेळीच बांधणी व्हावे म्हणून डोळे यांनी ग्रंथालयातच पुस्तक बांधणी विभाग सुरू केला. त्यांच्या महाविद्यालयाला राज्यशास्त्र, मराठी, अर्थशास्त्र या विषयांसाठी पीएच.डी. परीक्षेसाठी संशोधन केंद्र म्हणून मान्यता मिळाली.

     सहकाऱ्यांच्या सहकार्याने प्राचार्य डोळे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची शिबिरे घेतली. चांगला प्रतिसाद मिळाला. उदगीरपासून ३२ कि.मी. दूर अशा दुर्गम भागात मरसांगवी येथे १९८७-८८ मध्ये पहिले शिबिर घेतले. सर्वजण चालत गेले. राजीव गांधीना पत्र लिहून या दुर्गम भागात पोचण्यासाठी रस्ता  व एस.टी. बसची सोय उपलब्ध करून दिली.

     १९६९ साली त्यांनी गावात मध्यवर्ती ठिकाणी महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय सुरू करून महाविद्यालयामध्ये यणारी वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके संध्याकाळी साडेपाच ते दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत ठेवण्याची व्यवस्था केली. ज्या मुलींना ई.बी.सी. प्रमाणपत्र आणता येत नाही त्यांना महाविद्यालयाची फी माफ असा निर्णय घेणारी या महाविद्यालयाची संस्था ही मराठवाड्यात पहिली संस्था होती. व्याख्यानांच्या निमित्ताने प्रा. डोळे महाराष्ट्रभर व बाहेरही फिरले. मराठवाडा विद्यापीठाच्या कलाशाखेचे ते काही काळ अधिष्ठाता होते.

    - वि. ग. जोशी

डोळे, नारायण यशवंत