Skip to main content
x

दोशी, बाळकृष्ण विठ्ठलदास

     भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात आधुनिक वास्तुकला प्रस्थापित करण्यात बाळकृष्ण विठ्ठलदास दोशी यांनी फार महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचा जन्म पुण्यात झाला. तेथेच त्यांचे बालपण गेले व शालेय शिक्षणही झाले. त्या वेळच्या अतिशय नावाजलेल्या नूतन मराठी विद्यालयाचे ते विद्यार्थी होते.

     पुढील उच्चशिक्षणासाठी त्यांनी मुंबईच्या सर ज.जी. कला महाविद्यालयामधील वास्तुकलेच्या विभागात प्रवेश घेतला. स्केचिंगमध्ये प्रावीण्य असलेला एक तडफदार विद्यार्थी म्हणून ते ओळखले जाऊ लागले. येथील शिक्षणानंतर इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्स या सर्वमान्य संस्थेची असोशिएटशिप प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी पॅरिसचे जगप्रसिद्ध फ्रेंच आर्किटेक्ट ल कॉर्बुझिए यांच्याकडे जाऊन अनुभव घ्यावयाचे ठरविले. त्या वेळी त्या कार्यालयामध्ये ते पहिलेच भारतीय होते.

     १९५५ साली ते भारतात परतले. ल कॉर्बुझिए यांचे अहमदाबादमध्ये मिल ओनर्स असोसिएशन व शोघन यांचा बंगला हे दोन प्रकल्प व चंदिगड या शहराची रचना व उभारणीचे काम चालू होते. या कामांवर त्यांचे प्रतिनिधी म्हणून ते काम पाहू लागले. अहमदाबादमध्ये स्थायिक झाल्यावर दोशी यांनी ‘वास्तुशिल्प’ नावाच्या संस्थेची स्थापना करून वास्तुकलेच्या व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीच्या कामावर ल कॉर्बुझिए विचारसरणीची छाप दिसून येत होती. पण पुढे गुजरातच्या मातीत परंपरागत उभारलेले पोळ व त्यांतील लाकडाचे अतिशय प्रमाणबद्ध नक्षीकाम असलेल्या हवेल्यांचा अभ्यास सुरू झाला व त्यांच्या कामामध्ये जाणीवपूर्वक बदल दिसू लागला. काळाच्या ओघात होणारे बदल या संदर्भात ते आधुनिकतेबरोबर पुनरुज्जीवनाची सांगड घालत गेले.

     ‘इन्स्टिट्यूट ऑफ इंडॉलॉजी’ १९६२ साली बांधण्यात आली. या त्यांच्या पहिल्या प्रकल्पात वेगळ्या विचारसरणीची कल्पना दिसून आली. अहमदाबादच्या लाकडी हवेलीमधील नक्षीकाम, बाहेर डोकावणारे सज्जे व कौलारू छपरे या पारंपरिक वास्तुचिन्हांचा आधुनिकतेबरोबर त्यांनी उत्तम मेळ जुळवून आणला. त्याचप्रमाणे काँक्रीट व विटांचे नैसर्गिक रंग व पोत यांची अनुपम जुळणी त्यांनी घडवून आणली. पुढे होणाऱ्या वास्तुकलेच्या विकासावर त्यांच्या कामाचा व विचारांचा प्रभाव दिसू लागला.

     त्यानंतर त्यांना वास्तुसंकल्पनेची महत्त्वाची कामे मिळू लागली. त्याच सुमारास अमेरिकेत वास्तुविशारद लुई कान्ट यांचे फार प्रसिद्ध असे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबादचे काम चालू झाले. त्यातसुद्धा दोशी यांचा सहभाग होता.

     बाळकृष्ण दोशी यांनी अनेक वास्तूंची रचना केली आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (पुणे), गांधी लेबर इन्स्टिट्यूट (अहमदाबाद), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (बंगळूर), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (नवी दिल्ली), पुण्याचे सवाई गंधर्व स्मारक, त्याशिवाय अनेक वसाहतींचे व शहर उभारण्याचे प्रकल्प त्यांनी केले आहेत. असंख्य लो कॉस्ट हाउसिंग (इंदूर) व विद्याधर नगर (जयपूर) नगरीचा विस्तारित भाग हे त्यांतील काही महत्त्वाचे प्रकल्प आहेत. दोशी यशस्वी वास्तुविशारद तर आहेतच; पण त्याबरोबर नावाजलेले शहर रचनाकार, एक उत्तम शिक्षक व नामांकित संस्थांच्या वास्तूंची रचना करणारे म्हणून ओळखले जातात. त्यांनी स्कूल ऑफ आर्किटेक्चर, स्कूल ऑफ प्लॅनिंग, सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट अ‍ॅन्ड टेक्नोलॉजी, अहमदाबाद यांसारख्या प्रसिद्ध संस्था प्रस्थापित केल्या आणि त्यांची वास्तुरचनाही केली.

     भारतातील समकालीन वास्तुकलेला विश्वप्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या बोटावर मोजता येणाऱ्या वास्तुविशारदांमध्ये बाळकृष्ण दोशी यांचा समावेश होतो. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यांत १९७६ साली भारत सरकारने त्यांना बहाल केलेला ‘पद्मश्री’ पुरस्कार, अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चरची फेलोशिप, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सचे सुवर्णपदक, असे देशातील व परदेशांतील असंख्य सन्मान आहेत. त्यांनी वास्तुकला व शहररचना या विषयांवर सहा महत्त्वाचे ग्रंथ व देशातील व परदेशांतील नियतकालिकांतून लेख प्रसिद्ध केले आहेत.

     हे अष्टपैलू संकल्पनाकार सतत प्रयोगशील राहिले व उतारवयातही कार्यरत राहिल्यामुळे, ते मनाने व वृत्तीने तरुणच राहिले आहेत. २०१८ मध्ये या जगविख्यात कमानकलातज्ज्ञाला ‘प्रित्जकर’ हा अत्यंत मानाचा पुरस्कार दिला गेला. ‘प्रित्जकर पुरस्कार’ हा वास्तु किंवा कमानकलेतील नोबेल पुरस्कार मानला जातो. अशा या पुरस्कारावर भारतीय नाव कोरले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

चिंतामण गोखले

दोशी, बाळकृष्ण विठ्ठलदास