Skip to main content
x

धारप, नारायण गोपाळ

     नारायण गोपाळ धारप यांचा जन्म पुण्यात झाला. रसायनशास्त्रात त्यांनी मुंबई विद्यापीठाची बी.एस्सी. पदवी मिळवली. यानंतर त्यांनी रसायन तंत्रज्ञानात बी.एस्सी. (टेक) केले. मग त्यांनी भारतात आणि आफ्रिकेत नोकऱ्या केल्या. आफ्रिकेतून परत आल्यावर त्यांनी नागपूर येथे व्यवसाय सुरू केला; पण त्यात त्यांना अपेक्षित असे यश मिळाले नाही. मग नागपूरचा गाशा गुंडाळून ते पुण्याला आले. पुण्यात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि बदली होऊन आलेल्या नोकरदारांना त्यांनी तात्पुरत्या निवासासाठी लागणाऱ्या पलंग, टेबल, खुर्च्या, कपाटे यांसारख्या गोष्टी भाड्याने देण्याच्या सामानाचे दुकान सुरू केले आणि हा व्यवसाय त्यांनी अखेरपर्यंत केला.

     व्यवसाय म्हणून नोकरी करणे किंवा दुकान चालवणे या गोष्टी धारपांनी पोटासाठी केल्या; पण त्यांची खरी आवड होती लिखाणाची. नागपूरला असतानाच त्यांनी विज्ञानकथा लिहायला सुरुवात केली. ही गोष्ट १९५० सालाच्या दरम्यानची. त्या वेळी विज्ञानकथा म्हणजे काय हे लोकांना माहीत नव्हते; कारण मुळात विज्ञानावरच फारसे लिखाण त्या वेळी प्रसिद्ध होत नसे. विज्ञान फारसे अवगत नसल्याने त्यावर आधारित कथांना वाचक मिळणे दुरापास्त होते. धारपांनी आयुष्यात एकूण १५ विज्ञान कादंबऱ्या, तीन विज्ञानकथा संग्रह आणि पाच सामाजिक कादंबऱ्या प्रसिद्ध केल्या. विज्ञान साहित्याला आणि सामाजिक कादंबऱ्यांना वाचकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही हे पाहून धारप भयकथा आणि गूढकथांकडे वळले आणि हा बाज धारपांच्या स्वभावाला जुळला आणि वाचकांनाही आवडला. यामुळे लेखक आणि वाचक अशी एक तार जुळून आली.

     गूढ कादंबऱ्या आणि कथासंग्रह मिळून धारपांनी पुस्तकांची शंभरी गाठली. चंद्रविलास, नवे दैवत, मृत्युद्वार, पारंब्यांचे जग, साठे फायकस, फायकसची अखेर, ऐसी रत्ने मेळवीन, कपटी कलंदर अशी त्यांच्या लोकप्रिय कादंबऱ्यांची नावे आहेत. जयदेव, कृष्णचंद्र, चक्रवर्ती चेतन, अशोक समर्थ अशी त्यांच्या या रहस्यकथांतील नायकांची नावे आहेत. धारपांनी दरमहा एक, अशा रहस्यकथा लिहायचा प्रयत्न केला; पण तो त्यांना मानवला नाही आणि तो प्रयोग त्यांनी थांबवला. धारपांच्या बहुतेक विज्ञानकथा या परदेशी विज्ञानकथांवर आधारित अशा बेतलेल्या असत. परग्रहावरील आयुष्य हा त्यांचा एक आवडता विषय होता. धारपांनी वनस्पती विचार करू शकतात, त्या बुद्धिमान असतात, या विषयावर तीन कादंबऱ्या लिहिल्या आहेत.

     धारप १९५० सालापासून लिहीत होते. त्या वेळी मराठीत विज्ञानकथा लिहिणारे कोणी नव्हते. धारप खऱ्या अर्थाने गूढ आणि भयकथांत स्थिरावले. त्यामुळे धारप लिहीत असलेल्या भय आणि गूढकथा म्हणजेच विज्ञानकथा, असा वाचकांचा समज फार वर्षे होता, तो १९७०च्या दशकात अस्सल विज्ञानकथा छापून येईपर्यंत.धारप यांचे निधन पुण्यात वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी झाले.

-  प्रा. निरंजन घाटे 

 - अ.पां. देशपांडे

धारप, नारायण गोपाळ