धारूरकर, विठ्ठलशास्त्री दाजीशास्त्री
विठ्ठलशास्त्री दाजीशास्त्री धारूरकर यांनी सातारचे सुप्रसिद्ध पंडित रामशास्त्री गोडबोले यांच्याकडे व्याकरण, धर्म वगैरे शास्त्रांचे अत्यंत गाढे अध्ययन केले. ते शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन शाखेचे होते.
पंढरपूर येथे विठ्ठलशास्त्री धारूरकर यांनी १८२० मध्ये चार वेद व शास्त्रे यांची पाठशाळा स्थापन केली. ती पाठशाळा ‘धारूरकर वेदशास्त्रशाळा’ या नावाने प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध पंडित भगवानशास्त्री धारूरकर हे त्यांचे चिरंजीव होत. त्यांचे उल्लेखनीय ग्रंथ खालीलप्रमाणे आहेत - १. उपयुक्त धर्मशास्त्रसंग्रह (संस्कृत व मराठी), २. प्रायश्चित्तव्यवहारप्रकाश (संस्कृत व मराठी), ३. श्री पंढरी माहात्म्य (संस्कृत, मराठी, गुजराथी), ४. पंढरीतत्त्वविवेक: (संस्कृत), ५. बाळशिक्षक (मराठी), ६. ज्योतिषरत्नभांडार (अप्रसिद्ध), ७. पंढरपूर येथे सर्वकाल विवाह करण्याचा निर्णय (संस्कृत व मराठी). या ग्रंथातून त्यांनी अतिशय तर्कशुद्ध विवेचन केलेले आढळते.
— संपादित