Skip to main content
x

ढेरे, रामचंद्र चिंतामण

रा.चिं ढेरे

     रामचंद्र चिंतामण ढेरे यांचा जन्म पुण्यातील निगडी येथे झाला. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. त्यांच्या वृद्ध आजी भागीरथी काशीनाथ पुंडले यांनी त्यांचा सांभाळ केला. गावात खाजगी शाळेत त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यांचे चुलत आजोबा कृष्णाजीपंत पुंडले यांच्या आग्रहामुळे ते १९४४ साली पुण्याला आले. रामचंद्र चिंतामण ढेरे यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे त्यांच्यावर आलेली संकटे, बिकट परिस्थिती आणि त्यावर त्यांनी जिद्दीने केलेली मात यांची मालिकाच होती.

रात्रीच्या शाळेत जाऊन त्यांना आपले शिक्षण पूर्ण करावे लागले. १९५० साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी हिंदीच्या व मराठीच्या अनेक परीक्षा दिल्या. ग्रंथालय शास्त्र आणि एस.टी.सी. या पदविका प्राप्त केल्या. कधी चहाच्या गोदामात, तर कधी पुठ्ठ्यांची खोकी बनवण्याच्या कारखान्यात, कधी मुद्रितशोधक म्हणून तर कधी विद्यालयात ग्रंथपाल म्हणून काम करीत त्यांना पुढचे शिक्षण घ्यावे लागले. १९६३मध्ये ते बाहेरून बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. तांत्रिक कारणांमुळे त्यांच्या एम.ए.च्या टर्म्स नामंजूर करण्यात आल्या. १९७५ मध्ये एम.ए.शिवाय संशोधन करून त्यांनी पीएच.डी. प्राप्त केली.

जून १९६५ ते ऑगस्ट १९६६ या कालावधीत त्यांनी भारतीय संस्कृतीकोश मंडळात उपसंपादक म्हणून काम पाहिले. डेक्कन महाविद्यालयामध्ये विद्यापीठ अनुदान मंडळातर्फे १९७६ ते १९७८ या काळात ‘बालग्रह : एक दैवतशास्त्रीय अभ्यास’ हा शोधप्रकल्प त्यांनी पूर्ण केला. पुढे जून १९७९पासून पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात विद्यापीठ अनुदान मंडळातर्फे ‘श्री विठ्ठल दैवत, संप्रदाय आणि साहित्य’ या शोधप्रकल्पाला प्रारंभ करून तो पूर्ण केला. त्यांना पुणे विद्यापीठाने १९८० साली डी.लिट. पदवी प्रदान केली.

‘उद्धरेत आत्मनात्मानम्’ याला अनुसरून डॉ. ढेरे यांनी आपला आपण अभ्यास करून स्वत:चा व्यासंग वाढवला. संशोधनासाठीही त्यांनी कोणत्याही संस्थेचे साहाय्य घेतले नाही.

रा.चिं. ढेरे यांनी पूर्ण वेळ लेखन कार्यासाठी आणि संशोधनाला वाहून घेतलेले आहे. त्यांचे विशाल अध्ययनक्षेत्र स्तिमित करणारे आहे. विविधांगी आणि विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासापासून ते लोकसाहित्यापर्यंतच्या सर्व क्षेत्रांत त्यांची शोधप्रतिभा सहजतेने विहार करते आणि त्यातून नवनवे पैलू शोधण्याचा प्रयत्न करते. वेगवेगळ्या पातळ्यांवरून त्यांनी केलेले संशोधन त्यांच्या बहुश्रुततेची आणि चिकित्सक दृष्टीची साक्ष घडवते. त्यांनी प्राचीन मराठी साहित्यकृतींची विपुल संपादने केली. ‘नरेंद्रांचे रुक्मिणी स्वयंवर’ (१९६५), ‘श्रीकृष्णचरित्र’ (१९७३), ‘महिकावतीची बखर’ (१९७३), ‘शिवदिग्विजय’ (१९७५), ‘मुरारी मल्लाची बालक्रीडा’ (१९७७), ‘सुभद्रा स्वयंवर’ (१९८७), ही त्यातील काही प्रमुख संपादने आहेत. ही संपादने विवेचक प्रस्तावना, प्रमाणसंहिता व स्पष्टीकरणात्मक टीका यांनी ती संपन्न आहेत. ‘विविधा’ (१९६७), ‘गंगाजली’ (१९७२), ‘शोधशिल्प’ (१९७७) यातून त्यांचे अनेक स्फुट शोधनिबंध आले आहेत. आपल्या काही ग्रंथांतून त्यांनी संतचरित्राचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. हे चरित्रग्रंथ केवळ परिचयात्मक नसून नवी दृष्टी प्रदान करतात.

मराठी वाङ्मयाला प्रेरक ठरणाऱ्या  व महाराष्ट्राची सांस्कृतिक जडणघडण करणाऱ्या वेगवेगळ्या संप्रदायांचा अर्थपूर्ण अभ्यास हाही त्यांच्या संशोधनाचा एक विषय आहे. ‘नाथ संप्रदायाचा इतिहास’ (१९५९), ‘दत्त संप्रदायाचा इतिहास’ (१९६४), ‘प्राचीन मराठीच्या नवधारा’ (१९७२), ‘चक्रपाणी’ (१९७७), ‘श्रीविठ्ठल : एक महासमन्वय’ (१९८४) हे त्यापैकी महत्त्वाचे ग्रंथ. त्यातील ‘चक्रपाणी’ हा त्यांच्या अभ्यासाचा व संशोधन पद्धतीचा उत्तम नमुना होय. षटस्थळ या विसोबा खेचरांच्या नवीन उपलब्ध ग्रंथातील गुरुपरंपरेचे निमित्त करून त्यांनी चक्रधरांच्या जीवनावर एक नवा प्रकाशझोत टाकला आहे. चक्रधर-चांगदेव राऊळ व हरिनाथ यांचे एकत्व प्रतिपादन करताना व षटस्थलामधील गुरुपरंपरेचे संबंध उकलून दाखवताना त्यांनी महानुभावी यांच्या पारंपरिक श्रद्धांना धक्का दिला आहे. त्यांच्या संशोधनपर ग्रंथांतून त्यांचा सखोल व्यासंग आणि दीर्घकालीन चिंतन प्रकट झालेले आहे. रसिकतेचा आणि अंगभूत लालित्याचा स्पर्श त्यांच्या लेखनशैलीला आहे. संशोधनाद्वारे नवा अन्वयार्थ लावण्याची हातोटी त्यांच्या लेखनात आहे. ‘लज्जागौरी : आदिमातेच्या स्वरूपावर प्रकाश व उपासनेवर नवा प्रकाश’, ‘श्रीविठ्ठल : एक महासमन्वय’, ‘महाराष्ट्राचा देव्हारा’, ‘संतसाहित्य’ आणि ‘लोकसाहित्य’ असे विद्वन्मान्य ग्रंथ ढेरे यांनी लिहिले आहेत.

‘शिखर शिंगणापूरचा श्रीशंभूमहाराज’ या ग्रंथात शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आणि त्यांच्या सिसोदिया कुळाच्या अज्ञात पार्श्‍वभूमीवर आंतरज्ञानशास्त्रीय दृष्टीने अभ्यास करून इतिहासाची पुनर्मांडणी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे.

संशोधन कसे करावे, याबद्दलचे तंत्रशुद्ध शिक्षण डॉ. ढेरे यांनी कुठेही घेतले नव्हते, तरीही त्यांच्या संशोधन कार्यावर महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, धर्मानंद कोसंबी, सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, व्ही. एस. अगरवाल व राजवाडे यांच्या कार्यपद्धतीची छाप आढळते.

डॉ. ढेरे यांना प्राप्त झालेले पुरस्कार/सन्मान : ‘श्रीविठ्ठल : एक महासमन्वय’ या ग्रंथासाठी १९८७ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार, संगीत नाटक अकॅडमीचे Life Time Achievement Award, महाराष्ट्र सरकारचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार, अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा  Life Time Achievement Award, एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईतर्फे मानद फेलोशिप व २००६-२००९ सालासाठीचे कॅम्पबेल स्मृती सुवर्ण पुरस्कार, २०१० साली त्रिदल फौंडेशनचा 'पुण्यभूषण पुरस्कार' तसेच पुणे महानगरपालिकेतर्फे  २०१३ साली महर्षी वाल्मिकी पुरस्कार.

संपादित / आर्या जोशी

ढेरे, रामचंद्र चिंतामण