Skip to main content
x

धर्माधिकारी, चंद्रशेखर शंकर

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी यांचा जन्म रायपूर येथे वकिलीची परंपरा असलेल्या कुटुंबात झाला. प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक आणि गांधीवादी विचारवंत आचार्य दादा धर्माधिकारी हे न्या. धर्माधिकारी यांचे वडील होत.

न्या.धर्माधिकारी यांचे शालेय शिक्षण वर्धा येथील नवभारत विद्यालयात आणि महाविद्यालयीन शिक्षण नागपूरचे एस.बी.सिटी कॉलेज आणि नोशेर महाविद्यालय येथे झाले. १९४९मध्ये त्यांनी बी.ए.ची पदवी संपादन केली. नंतर नागपूर विद्यापीठातून १९५२मध्ये एम.ए. आणि विद्यापीठ कायदा महाविद्यालयातून १९५४मध्ये एलएल.बी.या पदव्या त्यांनी संपादन केल्या. दोन वर्षे जिल्हा न्यायालयात वकिली केल्यानंतर दि.२५ ऑक्टोबर १९५६ रोजी ते तेव्हाच्या नागपूर उच्च न्यायालयात अ‍ॅडव्होकेट म्हणून रुजू झाले. दि.२१ जुलै १९५८ रोजी ते मुंबई उच्च न्यायालयात आणि दि.२० जुलै १९५९ रोजी सर्वोच्च न्यायालयात अ‍ॅडव्होकेट म्हणून रुजू झाले.

ऑगस्ट १९६५मध्ये धर्माधिकारी यांची नागपूर येथे सहायक सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. नंतर ऑक्टोबर १९७०मध्ये त्यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठाचे अतिरिक्त सरकारी वकील म्हणून झाली. १३जुलै१९७२ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. २४नोव्हेंबर१९७२ रोजी ते उच्च न्यायालयाचे कायम न्यायाधीश झाले. १९नोव्हेंबर१९८९ रोजी ते पदावरून निवृत्त झाले.

उच्च न्यायालयातील आपल्या कारकिर्दीत न्या.धर्माधिकारी यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले. यामध्ये आणीबाणी लागू असतानाच्या काळातील नागरिकांचा जगण्याचा हक्क, स्त्रियांचे हक्क, मनोरुग्णांचे, कैद्यांचे व आदिवासी मुलांचे हक्क इ. विविध प्रश्नांवरील किंवा मुद्द्यांवरील निकालांचा उल्लेख करता येईल.

त्यांच्यासमोर त्या वेळी अतिशय गाजलेले आणि महत्त्वाचे दोन फौजदारी खटलेही आले. त्यातील पहिला खटला म्हणजे पुण्याचे जोशी-अभ्यंकर हत्याकांड. या हत्याकांडातील आरोपींना पुण्याच्या सत्र न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध त्यांनी केलेले अपील न्या.धर्माधिकारी आणि न्या.विजय कोतवाल यांच्या खंडपीठासमोर चालले. न्यायमूर्तींनी फाशीची शिक्षा कायम केली आणि नंतर ती सर्वोच्च न्यायालयानेही कायम केली. या आरोपींनी राष्ट्रपतींकडे केलेला दयेचा अर्जही फेटाळला गेला. दुसरा खटला म्हणजे चंद्रकला लोटलीकर खून खटला. यात रत्नागिरीच्या सत्र न्यायालयाच्या निकालाविरुद्ध सरकारने केलेले अपील न्या. धर्माधिकारी आणि न्या. अगरवाल यांनी मंजूर केले आणि आरोपींना शिक्षा दिली.

न्या.धर्माधिकारी यांनी काही काळ मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक सरन्यायाधीश म्हणून काम पाहिले.

मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर न्या.धर्माधिकारी यांचे प्रभुत्व होते. या तिन्ही भाषांतील त्यांचे वक्तृत्व सारखेच प्रभावी होते आणि तिन्ही भाषांत त्यांनी घटना व कायदा आणि त्याशिवाय अन्य विविध विषयांवर सोळा पुस्तके आणि अनेक लेख लिहिले आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत. तसेच त्यांना पद्मभूषण पुरस्कारासह अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले . न्यायाधीश होण्यापूर्वीच्या काळात त्यांचा नागपुरातील अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांशी निकटचा संबंध होता. त्या काळात राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे ते दीर्घकाळ अध्यक्ष होते. आजही तीसहून अधिक शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विशेषत: गांधीवादी संस्थांशी त्यांचा, पदाधिकारी, विश्वस्त किंवा सदस्य या नात्याने संबंध आहे. शेवटच्या काळात त्यांचे वास्तव्य मुंबईला होते.

- शरच्चंद्र पानसे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].