Skip to main content
x

धर्माधिकारी, दत्तात्रेय जगन्नाथ

दत्ता धर्माधिकारी

शुभ्र खादी आणि डोक्यावर गांधीटोपी  असा  दत्ता धर्माधिकारी  यांचा  वेष असल्यामुळे चित्रपटसृष्टीत गांधीवादी दिग्दर्शक म्हणून त्यांचा उल्लेख केला जात असे. धर्माधिकारी हे कोल्हापूरला प्रभात फिल्म कंपनीमध्ये ‘टाईमकीपर’ म्हणून नोकरीस लागले. पुढे प्रभात कोल्हापूरहून पुण्यात आली, त्या प्रसंगी धर्माधिकारीही कोल्हापूरहून पुण्यास आले. पुण्यात राजा नेने, शांताराम आठवले, अनंत माने, शंकरराव दामले यांच्याशी त्यांची मैत्री जमली.

शांतारामबापू प्रभात सोडून गेल्यावर राजा नेने यांचे प्रभातमधील स्थान बळकट झाले, कारण दामलेमामांचे ते भाचे होते. राजा नेने यांना प्रभातने ‘दहा वाजता’/‘दस बजे’ हा मराठी, हिंदी चित्रपट दिग्दर्शनासाठी दिला. प्रभातच्या पठडीबाहेर जाऊन राजा नेने यांनी महाविद्यालयीन जीवनातील प्रणय घेऊन हा चित्रपट फुलवला होता. चित्रपट बऱ्यापैकी चालला आणि धर्माधिकारी हळूहळू साहाय्यक दिग्दर्शकाच्या भूमिकेत शिरू लागले.

‘रामशास्त्री’च्या चित्रपटनिर्मितीच्या वेळेस प्रभातचे मालक आणि राजा नेने यांच्यात खटके उडून राजा नेने यांना प्रभात बाहेर जावे लागले. त्यांच्याबरोबरच दत्ता धर्माधिकारी, शांताराम आठवले, केशवराव भोळे इत्यादींना कंपनीने नोटीस देऊन ऐन दिवाळीमध्ये घरी बसवले. राजा नेने यांना मोहन स्टुडिओने ‘तारामती’ हा चित्रपट देऊन त्यांचा लवाजमा मुंबईला बोलावून घेतला. दुर्दैवाने ‘तारामती’ चित्रपट पडला आणि राजा नेने यांना पुणे गाठावे लागले. १९४७ साली राजा नेने यांनी ‘शादीसे पहले’ हा चित्रपट पुण्यात निर्माण केला आणि साहाय्यक दिग्दर्शक म्हणून श्रेयनामावलीत धर्माधिकारी यांचे नाव दिसले. पुढे दत्ता धर्माधिकारी यांनी ‘आल्हाद पिक्चर्स’ही स्वत:ची चित्रपट संस्था स्थापन केली. ‘बाळा जो जो रे’, ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’, ‘चिमणी पाखरे’ असे रौप्य महोत्सव पार पाडणारे तीन चित्रपट मराठी प्रेक्षकांना दिले.

धर्माधिकारी यांनी १९५२-५३ साली  पु.ल. देशपांडे यांच्या नाटकावरून ‘महात्मा’ हा चित्रपट हिंदी, मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषांतून निर्माण करण्याचा घाट घातला. ‘महात्मा’ हे अत्यंत गंभीर प्रकृतीचे चित्र होते. त्यात कुठेही प्रेक्षकांचे मनोरंजन होईल असे काहीही नव्हते. असा हा गंभीर प्रकृतीचा चित्रपट पडद्यावर सपशेल कोसळला. त्यामुळे दत्ता धर्माधिकारी यांच्यावर नादारी घेण्याची वेळ आली. पुढे त्यांना मुंबईचे ‘भाग्यवान’, ‘सुदर्शन चक्र’, ‘सावधान’, ‘दीप जलते रहो’ असे हिंदी चित्रपट दिग्दर्शनाठी मिळाले. हे चित्रपट उत्तम धंदा करून गेले, पण धर्माधिकारी यांना त्याचा लाभ मिळाला नाही.

१९६० च्या दरम्यान धर्माधिकारी यांनी ‘लग्नाला जातो मी’, ‘एक धागा सुखाचा’, ‘कलंकशोभा’, ‘क्षण आला भाग्याचा’, ‘सप्तपदी’ यासारखे उत्कृष्ट मराठी चित्रपट प्रेक्षकांना दिले. १९६३ साली मुंबईच्या वाडिया ब्रदर्सने धर्माधिकारी यांना ‘सुभद्राहरण’ हा चित्रपट दिग्दर्शनासाठी दिला आणि वाडियांच्या कोशामध्ये द्रव्याची भर पडली तरी धर्माधिकारी यांना त्याचा फायदा झाला नाही.

१९६४ साली धर्माधिकारी यांनी महादेवशास्त्री जोशी यांच्या कथेवरून ‘वैशाखवणवा’ हा सदाबहार मराठी चित्रपट प्रेक्षकांना बहाल केला. त्यानंतरचे त्यांचे चित्रपट होते ‘सतीचं वाण’, ‘नस्ती उठाठेव’, ‘धाकटी मेहुणी’ आणि ‘सतीची पुण्याई’ या चित्रपटांमध्ये खास असे काही नव्हते.

हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले.

- द.भा. सामंत

धर्माधिकारी, दत्तात्रेय जगन्नाथ