Skip to main content
x

धर्माधिकारी, मार्तंड शंकरशास्त्री

चैतन्यानंद सरस्वती, तराणेकर नानामहाराज

नानामहाराज तराणेकर यांचा जन्म होळकरांच्या राज्यातील तराणे या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते. वडील शंकरशास्त्री जोशीपण करीत असून पू. वासुदेवानंद सरस्वतींचे शिष्य होते.

आठव्या वर्षी नानांचे मौजीबंधन झाले आणि त्यांचा ब्रह्मचर्याश्रम सुरू झाला. शास्त्रीबुवांच्या देखरेखीखाली त्रिकालसंध्या, जप अनुष्ठान आणि वेदशाळेतले अध्ययन सुरू झाले. अमरकोश, कौमुदी, व्याकरण इत्यादींचे अध्ययन घरीच झाले. चौथीपर्यंत शिकल्यानंतर शास्त्रीबुवांनी नानांना इंदूरच्या नरहरशास्त्र्यांकडे वेदाभ्यासासाठी पाठवले. तिथे त्यांनी महाकाव्यसंहितापठणआदी गोष्टी आत्मसात केल्या.

मूळरूपाची ओळख करून देणारे, अध्यात्ममार्गावर मार्गदर्शक असे सद्गुरू भेटावे ही तळमळ त्यांच्या उरी होती. त्यासाठी वडिलांनी गुरुचरित्र पारायणाचे अनुष्ठान करण्यास सांगितले. सात सप्ताहांच्या कठोर उपासनेनंतर प.पू. वासुदेवानंद सरस्वती यांचे दर्शन घडले. स्वामींनी त्यांच्या कार्याची दिशा दाखवली. ‘‘अहो, तुम्हां कार्य करणे बहुत । प्रगटायाचे या प्रांतात । समाधीत ना रमणे तुम्ही ॥ दत्त नाम गर्जत गर्जत । जागवावे सुप्त भक्तमानस । भक्ती, ज्ञान, कर्मयोगास । आचरोनिया असावे जी ॥’’ आशीर्वाद देऊन स्वामी अंतर्धान पावले.

गुरुपदेश प्राप्त झाल्यावर त्यांनी तपाची सांगता केली. लौकिक व्यवहारात आवश्यक तेवढेच लक्ष घालून त्यांचे अखंड अनुसंधान सुरू असे.

विविध देवतांच्या शास्त्रशुद्ध उपासना करून त्यांच्या दर्शनाचा लाभ नानांनी या काळात घेतला. सतत तीन वर्षांपर्यंत श्रीगणेश, श्रीराम, श्रीकृष्ण आदी देवतांच्या आराधनेचे व्रत अखंड सुरू होते. नाना अठरा वर्षांचे झाल्यावर इंदूरचे शंकरराव डाकवाले यांची कन्या भीमाबाई हिच्याशी शके १८३६ मध्ये नानांचा विवाह झाला. सासरी भीमाबाईचे नाव बदलून म्हाळसाबाई असे ठेवले गेले. पुढे मातृपितृछत्र हरपल्यावर प्रपंचाची पूर्ण जबाबदारी नानांवर आली. कारण, वडीलबंधू गंगाधरपंत यांचे घरात फारसे लक्ष नसे. ते यात्रा करीत बाहेरच असत.

म्हाळसाबाई यांनी पतिअनुकूल राहून प्रपंचाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी एका मुलाला जन्म दिला. आजोबांचे शंकरहेच नाव बाळाचे ठेवले होते. व्यवहारात हे पुढे भैयासाहेबम्हणून ओळख पावले.

बाळ दोन वर्षांचा असतानाच म्हाळसाबाई देवाघरी गेल्या. आप्तांच्या इच्छेला मान देऊन नानांनी सन १९२४ मध्ये तराण्याच्या श्री. भाले यांच्या कन्येशी नानांनी विवाह केला. प्रथम पत्नीच्या स्मृतीस मान द्यायचा म्हणून तिचेही नाव म्हाळसाच ठेवले. कुसुम नावाच्या मुलीला जन्म देऊन तीन वर्षांत त्याही स्वर्गवासी झाल्या.

साधकावस्थेच्या या काळात स्वत: अतिशय कर्मठपणे सोवळ्यात पूजा, स्वहस्ते स्वयंपाक, नैवेद्य, अतिथी अभ्यागत यांत कष्ट खूप होत; पण विनातक्रार दिनक्रम सुरू असे. त्यातच एकदा सद्गुरूंनी वामनबुवा ब्रह्मचार्‍याच्या रूपात येऊन व पंधरा दिवस मंदिरात वास्तव्य करून नानांना योग शिकवला व नानांनी विनंती केल्यामुळे त्यातील प्रयोगही करवून घेतले. सद्गुरूंचा स्वप्नदृष्टान्त आणि प्रत्यक्ष मार्गदर्शनासोबतच स्वकष्टाने सतत प्रयत्नरत राहून नानांनी या मार्गात खूप प्रगती केली. नाना साधकावस्थेत असतानाच तीर्थयात्रा करण्याची सद्गुरूंची आज्ञा झाली. दोन्ही लहान मुले कोंडूताईंच्या स्वाधीन करून नाना यात्रेला गेले.

गुरुचरित्रात वर्णन केलेल्या पद्धतीने काशीयात्रा केल्यावर आनंदवनात जाण्याचे कुणीसे सुचविले. तिथे त्यांना प्रत्यक्ष विश्वनाथदर्शन झाले.

मथुरायात्रेत वृंदावनी, यमुनाकाठी श्रीबालमुकुंदाचे गोपबालांसह प्रत्यक्ष दर्शन घडले. गंगोत्री-जमनोत्री यात्रेत सद्गुरूंच्या कृपेमुळे श्रीसच्चिदानंदस्वरूपाच्या प्रवचनाचा अविस्मरणीय लाभ झाला. अत्यंत कठीण नियम असलेली जलेरीप्रकारची नर्मदा परिक्रमा करीत असता प्रत्यक्ष नर्मदेचे दर्शन घडले. याच यात्रेत चिदानंदस्वामींची भेटही झाली.

संतदर्शनाला आवर्जून जाण्याचा नानांचा रिवाजही असे. त्यांना धुनीवाले दादाजी केशवानंद, मौनीबाबा, गुळवणी महाराज, खातखेडकर महाराज, धुंडा महाराज देगलूरकर आदींचा सहवास लाभला. नानांनी साधारणपणे बत्तीस यज्ञांत आचार्यपद भूषवले. वयाच्या साठीनंतर नानांनी आचार्यपदाची जबाबदारी घेणे थांबवले, तरीही त्यांच्या देखरेखीखाली गावोगावी शिष्यपरिवाराच्या सहभागातून अनेकविध यज्ञ करविले. नानांच्या घरीही, नानांच्या देखरेखीखाली महामृत्युंजय यज्ञ, दत्तयाग व गणेशयाग असे काही यज्ञ संपन्न झाले.

कर्म, भक्ती व ज्ञानयोगाचे आचरण करून सुप्त भक्तमानस जागवण्याचे व दत्तप्रेमाने भारण्याचे कार्य त्यांनी अव्याहतपणे, आयुष्यभर केले. जात, धर्म किंवा गरीब-श्रीमंत असे कुठलेही भेद न मानता त्यांनी सर्वच लोकांचा शिष्य म्हणून स्वीकार केला. त्यामुळेच तर भक्ताला ज्या मार्गाची आवड असेल, त्याला अनुरूप असा मार्ग, त्याच्या आवडीच्या दैवताची उपासना नाना सांगत म्हणून योगप्रेमी को योगी दिखते । ज्ञानप्रेमी को ज्ञानी दिखते । भक्तिप्रेमी को दिखते भक्त । लीला आपकी यह अद्भुत ॥ जैन, मुस्लीम धर्मियांनीदेखील नानांचा उपदेश घेतला. त्यांना नाना जैनमंत्र किंवा कुराणाधिष्ठित उपासना सांगत. नानांना सर्व धर्मांचे मुळातून ज्ञान असल्याने हे शक्य होई आणि भक्तांचे पूर्ण समाधान होत असे. अनुग्रहातून मंत्र देऊन, उपासना देऊन शिष्याला आध्यात्मिक प्रगतीविषयक मार्गदर्शन करीत असताना व्यावहारिक गोष्टीही त्याला सांभाळता याव्यात म्हणून सहवासातील शिष्यांना मुख्यत्वे स्वत:च्या आचरणातून आणि क्वचित सहज संभाषणात्मक उपदेशातून ते वेळोवेळी मार्गदर्शन करीत.

नानांची महती जाणून इतर क्षेत्रांतील थोर व्यक्ती त्यांच्या विषयांतील नानांचे ज्ञान पाहून नानांपुढे नतमस्तक होत. श्री. सुरेंद्र राव हे प्रथितयश गायक एकदा नानांसमोर थत्ते यांच्या घरी बैठकीला आले. पण भोवतीच्या मंडळींत कुणी संगीताचे जाणकार नसल्याचे लक्षात आल्यावर नाराज झाले. सुरेंद्र राव म्हणाले, ‘‘महाराज, आता आपल्याला काय ऐकवू?’’ असे विचारले असता नाना शांतपणे म्हणाले, ‘‘आम्हांला सरस्वती राग ऐकण्याची इच्छा आहे. तो ऐकवलात तर आम्हांला खूप आनंद होईल.’’ हे वाक्य ऐकून नानांच्या संगीतातील ज्ञानाविषयी त्यांना अचंबा वाटला.

पंडित कुमार गंधर्व यांनी नानांचे शिष्यत्व पत्करले. संगीतातील गुरूखेरीज दुसरे गुरू करणार नाही हे विचार असलेले पंडितजी शिष्यत्व पत्करल्यावर दर भाऊबीजेच्या रात्री नानांसाठीच बैठक करू लागले. याचप्रमाणे दाजी भाटवडेकर, थिरकवा साहेब, पं. सी.आर. व्यास, श्रीकांत जिचकार आदींनी नानांचे शिष्यत्व पत्करले. भक्तांच्या हाकेला धावून जाण्याचा गुरुमाउलीचा स्वभावच असतो. श्रवणमात्रे (स्मरणमात्रे) धावसी अन् पावसी शरणागता । असा अनुभव नानाभक्तांना नित्यच येत असतो. मार्तंड महिमामध्ये असे अनुभव ग्रंथित केले आहेत. अत्यंत शांत, प्रसन्न, हसरी, बालसुलभ निरागस भाव ल्यालेली, शुचिर्भूत आणि सोज्ज्वळ, शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या, निजानंदात निमग्न असलेल्या नानामूर्तीचे दर्शन घडताच भक्त आश्वस्त होत असत.

नाना १६ एप्रिल १९९३ रोजी, चैत्र वद्य दशमीला, शिवाजीनगर, नागपूर मुक्कामी सद्गुरुस्वरूपी विलीन झाले. त्यांच्या स्मृत्यर्थ त्या ठिकाणी आता चैतन्यपीठ’  स्थापन झाले आहे.

प्रा. नीलिमा रानवडकर

 

संदर्भ
१.प्रा. पागे, वि.म.; ‘मार्तंड महिमा’; सद्भक्ती प्रकाशन, इंदूर; १९७०.

२.डॉ. तराणेकर, प्रदीप शंकर; ‘कवडसा’,
धर्माधिकारी, मार्तंड शंकरशास्त्री