धर्मे, जगन्नाथ पंढरी
जगन्नाथ पंढरी धर्मे यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील बोर्डी येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी तंत्रज्ञान शाखेची पदवी घेतली . काही तरी नवीन करण्याच्या जिज्ञासेपोटी त्यांनी वनौषधी लागवडीचा अभ्यास केला. त्यांचा कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या प्रमुखांशी संपर्क आला. त्यामुळे त्यांनी वनस्पती लागवडीचा ध्यास घेतला व स्वतःच्या शेतावर १९९३ पासून औषधी वनस्पतींच्या लागवडीला जोमाने सुरुवात करून व्यापारी तत्त्वावर लागवड केली. त्यांनी १९९७ मध्ये केंद्रीय औषधी सुगंधी वनौषधी संस्थेच्या दर दोन वर्षांनी होणाऱ्या कार्यशाळांना औषधी वनस्पती उत्पादक म्हणून हजेरी लावली.
धर्मे यांनी सफेद मुसळी लागवडीच्या पद्धती विकसित केल्या व वाणाचे संकलन केले. त्यांनी सफेद मुसळीचे ९ वाण आपल्या शेतात लावले. सफेद मुसळी हे वनौषधी वाण जमिनीच्या खाली वाढते. या मुसळीचे रताळ्यासारखे कंद असतात. ते बाहेर काढल्यानंतर त्याला वाळवून त्याची भुकटी केली जाते. ती भुकटी औषधी म्हणून अतिशय उपयुक्त आहे.
धर्मे यांनी आपल्या शेतीमध्ये मुसळीव्यतिरिक्त हळदीचे ३६ वाण, आल्याचे ६ वाण संग्रहित करून आपल्या शेतीवर लावले. त्यांनी सफेद मुसळीचा ‘बोर्डी सिलेक्शन’ हा वाण विकसित केला. तसेच त्यांनी शतावरी, सर्पगंधा, अश्वगंधा व तुळस अशा इतर औषधी वनस्पतीही शेतात लावल्या. अशा अपारंपरिक पिकांची लागवड करणारे शेतकरी बोटावर मोजण्याइतकेच असल्यामुळे धर्मे यांना या पिकांमधून चांगले उत्पन्न मिळाले . धर्मे यांनी अकोट जिल्ह्यामध्ये वनौषधी उत्पादक शेतकऱ्यांची संघटना (अॅरोमॅटिक व मेडिसिनल इस्टेट नावाची संस्था) स्थापन केली. ते या संघटनेचे अध्यक्ष राहिले आहेत. या संघटनेचा हेतू वनौषधींचा प्रचार व प्रसार करणे होता. धर्मे स्वतः तांत्रिक मार्गदर्शन करतात व कंदाची किंवा बियाणांची विक्री करून सर्व शेतकऱ्यांना मदत करतात. धर्मे यांनी १५० एकरावर सफेद मुसळीची लागवड केली व बोर्डी परिसरात १५०० एकरांपर्यंत मुसळी लागवडीची वाढ झालेली आहे. धर्मे यांच्यासोबत त्यांची २ मुलेही औषधी वनस्पती लागवड व व्यापारी तत्त्वावर वाहतूक व विक्री करतात. धर्मे यांचे मुसळीसारख्या अपारंपरिक पिकाचे विकासकार्य प्रशंसनीय आहे.