Skip to main content
x

ढवळीकर, मधुकर केशव

     मधुकर केशव ढवळीकर हे अशा निष्ठावंत पुरातत्त्वज्ञांपैकी आहेत ज्यांनी आयुष्यभर पुरातत्त्वज्ञ म्हणून काम केलेच शिवाय त्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी अनेक जणांना तयार केले. डॉ. ढवळीकर हे १९५३मध्ये ऑर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये रुजू झाले. १९६७ मध्ये ते पुण्यातील डेक्कन महाविद्यालयामध्ये ऑर्किओलॉजीचे रीडर झाले. १९८० मध्ये ते ऑर्किओलॉजीचे प्राध्यापक झाले आणि १९८३मध्ये ते डेक्कन महाविद्यालयाचे सहाय्यक संचालक व १९८५ मध्ये संचालक झाले. ते पद त्यांनी १९९०मध्ये निवृत्त होईपर्यंत भूषवले. पीएच. डी. पदवीसाठी मार्गदर्शक म्हणूनही ढवळीकर यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले आहे.

     या कालावधीमध्ये त्यांनी मध्य, पश्चिम आणि दक्षिण भारतामध्ये- विशेषत: इतिहासपूर्व स्थळांचे उत्खनन केले. त्या कामांपैकी ‘इनामगाव’ येथील उत्खननासाठी त्यांनी वापरलेली पद्धत आणि उत्खननात सापडलेल्या अवशेषांची लावलेली समर्पक संगती यांसाठी त्यांची फार प्रशंसा झाली होती.

    भारत सरकारतर्फे १९९१ मध्ये इजिप्तला जे सांस्कृतिक प्रतिनिधी मंडळ गेले होते, त्याचे डॉ.ढवळीकर सदस्य होते. कला आणि पुरातत्त्व या विषयांवर त्यांनी आत्तापर्यंत वीसपेक्षा अधिक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांपैकी काहींची शीर्षके अशी आहेत.Ajanta - A Cultural Study- अजंठा - एका संस्कृतीचा शोध,  Sanchi- सांची, Ellora- वेरूळ, Environment and Culture- पर्यावरण आणि संस्कृती,  Satvahana Art- सातवाहनकालीन कला, First Farmers of the Deccan Cultured Imperialism- पश्चिम भारतातील सिंधुसंस्कृतीच्या खुणा, A Harappan Emporium on West Coast- कुंतासी- पश्चिम किनार्‍यावरील हरप्पाकालीन व्यापारीपेठ,  Indian Protohistory- इतिहासकाळपूर्वीचा भारत,  Historical Archeology of India— भारतातील इतिहाससंबंधी पुरातत्त्व,Ganesha-The God of Asia,The Aryans-Myth and Archeology, महाराष्ट्राची कुळकथा,कोणे एके काळी सिंधु संस्कृती.

     २०११ साली भारत सरकारने ‘पद्मश्री’ सन्मानाने ढवळीकर यांच्या संशोधनाचा गौरव केला आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने सन्माननीय डी. लिट. पदवी देऊन २०१५ साली त्यांचा यथोचित सत्कार केला आहे.

र. वि. नातू / आर्या जोशी

संदर्भ
१.https://www.thehindu.com/news/President-presents-first-set-of-Padma-awards/article14962471.ece

२.https://www.loksatta.com/lekha-news/article-on-historian-and-archaeologist-dr-madhukar-keshav-dhavalikar-1655283/
ढवळीकर, मधुकर केशव