Skip to main content
x

एकबोटे, माणिक श्रीकृष्ण

        माणिक श्रीकृष्ण एकबोटे यांचा जन्म राजस्थानातील कोटा या गावी झाला. त्यांचे वडील श्रीकृष्ण हरी एकबोटे कोटा येथील शासकीय महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. माणिक एकबोटे हे पंधरा वर्षांचे असताना त्यांचे  पितृछत्र हरपले. 

     माणिक एकबोटे यांचे  प्राथमिक शिक्षण कोटा येथील न्यू हायस्कूलमध्ये झाले. १९५७ साली ते दहावी उत्तीर्ण झाले, तर १९५९ साली ते इंटरची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांचे अभियांत्रिकी शिक्षण मुंबईच्या व्ही.जे.टी.आय. येथे  झाले.  १९६२ साली त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीतून बी.ई.ची पदवी घेतली. त्यावेळी त्यांचा क्रमांक विद्यापीठात दुसरा आला होता. त्यानंतर त्यांनी १९६२ ते १९६४ या कालावधीत बंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्था या जगप्रसिद्ध संस्थेतून अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आणि १९६४ साली त्यांनी रुरकेला येथील पोलाद कारखान्यात साहाय्यक आरेखन अभियंता म्हणून कामाला सुरुवात केली. याच दरम्यान त्यांनी १९६५ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची अभियांत्रिकीची परीक्षा दिली आणि संपूर्ण भारतातून ते दहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांची भारतीय रेल्वेच्या अभियांत्रिकी सेवेमध्ये निवड झाली.

       प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना जानेवारी १९६९ साली अहमदाबाद ते कांडला या नवीन रेल्वेमार्गाच्या निर्मितीच्या कामावर साहाय्यक अभियंता म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर १९७१ साली गुजरात येथे विद्युत मंडळासाठी कोळसा वाहून नेण्याच्या कामावरचा बांधण्यात येणार्‍या रेल्वेमार्ग कामावर कार्यकारी अभियंतापदावर बढती देण्यात आली. विद्युत मंडळासाठी ने-आण करणार्‍या रेल्वेमार्गातील अडथळे दूर करून कारखान्यापर्यंतचा रेल्वेचा मार्ग बनवण्यात आला. त्यामुळे विद्युतनिर्मिती केंद्रावर लागणार्‍या कोळशाच्या गाड्या जाणे शक्य झाले. यानंतर त्यांना १९७३ साली भारतीय रेल्वे अनुसंधान, अभिकल्प व मानक संगठन लखनऊत साहाय्यक संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले. रेल्वेमार्गातील पुलांच्या मजबुतीच्या दृष्टीने एकबोटे यांनी या संशोधन काळात एक संहिता तयार केली.

      १९८२ ते १९८९ या कालावधीत ते चर्चगेट येथील रेल्वेच्या कार्यालयात उपमुख्य अभियंता व मुख्य अभियंता या पदावर असताना लोहमार्गची  देखभाल आधुनिकीरणाचे काम त्यांच्याकडे आले. त्या वेळी त्यांनी लोहमार्गाच्या व्यवस्थापनाचे पूर्णत: संगणकीकरण केले. त्यामुळे सर्व अहवाल अद्ययावत राहू लागले आणि सर्व इत्थंभूत माहिती मिळून लोहमार्गाच्या कामातील गुणवत्ता वाढली. याच विभागात १९९५ साली एकबोटे यांना मुख्य ट्रॅक अभियंता या पदांवर काम करावयाचा अनुभव मिळाला व असताना त्यांना पश्‍चिम रेल्वे च्या पूर्ण रेल्वे ट्रॅकचे काम देण्यात आले. या वेळी मुंबईच्या उपनगरी रेल्वेत लाकडी रूळपट्ट्या (स्लीपर्स) होते व  त्यांच्या देखभालीत बर्‍याच अडचणी येत कधीकधी रेल्वेमार्ग बंद पडण्याचे प्रकार घडता व त्यामुळे लोकल उशिराने  येत असत. पर्यायाने जनतेची गैरसोय होत असे.  सर्व रूळपट्ट्या काँक्रिटच्या करण्याचे काम सुरू केले व ते २-३ वर्षांत पूर्ण झाले. क्राँक्रिटच्या रूळपट्ट्यांच्या वापरामुळे रेल्वेमार्ग बंद पडण्याचे प्रकार घडणे थांबले.

      १९९३ साली त्यांची हुबळी येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या  कार्यकालात हुबळीच्या पूर्ण डिविजनचे गेज परिवर्तन (मीटर गेज ते ब्रॉड गेज १९९३-९५ ह्या काळात झाले.) त्या कामामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.

       ११ डिसेंबर १९९३ रोजी पुण्यातील फुरसुंगी येथील रेल्वे रूळ ओलांडणार्‍या एका सहल बसला सह्याद्री एक्स्प्रेसच्या धडकेने अपघात झाल्यामुळे त्या बसमधील ४० चिमुरड्या शाळकरी मुलांना आपल्या प्राणास मुकावे लागले. या वेळी एकबोटे यांनी ताबडतोब हुबळी येथून पुण्याला जाऊन परिस्थिती हाताळली होती.  मृतांच्या नातेवाइकांना  योग्य आर्थिक मदतही मिळवून दिली होती. १९९८ ते २००१ ह्या काळात एकबोटे हे पश्‍चिम रेल्वेत मुख्य अभियंता या जबाबदार पदावर होते व त्या काळात पश्‍चिम रेल्वेची अभियांत्रिकी विभागात चांगली प्रगती झाली. २६ जानेवारी २००१ला झालेल्या गुजरातचा भूकंपात रेल्वेच्या संपत्तीचे (ट्रॅक, कॉलनीतील घरे)  प्रचंड नुकसान झाले होते; पण सर्व अडचणींवर मात करुन लगेच अठ्ठेचाळीस तासात रहदारी परत सुरू करण्यात आली होती. पश्‍चिम रेल्वेला  या बद्दल त्याकाळी  पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कडून प्रशस्तिपत्र मिळाले होते. २००१ ते २००३ या कालावधीत रेल्वे बीड (रेल्वे मंत्रालय) येथे अपर सदस्य या अतिशय जबाबदारीच्या व महत्त्वाच्या पदावरून २००३ साली ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी मोनार्क सर्व्हेअर्स या कंपनीमध्ये मार्गदर्शक म्हणून काम केले. सध्या कामातून पूर्णत: निवृत्त होऊन ते पुण्यात स्थायिक झालेले आहेत.

      - दत्ता कानवटे

एकबोटे, माणिक श्रीकृष्ण