Skip to main content
x

एकबोटे, रामचंद्र भगवंत

          रामचंद्र भगवंत एकबोटे यांचा जन्म वाशिम (विदर्भ) येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण वाशिम व अकोला येथेच झाले. ते १९२२ मध्ये मॅट्रिक झाले. त्यानंतर त्यांनी नागपूर येथील शेतकी महाविद्यालयातून एल.एजी. (ऑनर्स) ही पदवी परीक्षा (नंतरच्या बी.एस्सी. कृषी समकक्ष) प्रथम श्रेणीत प्राप्त केली.

          त्यांनी किंग अ‍ॅवार्ड मेमोरियल शिष्यवृत्तीद्वारे इंपेरियल अ‍ॅग्रिकल्चर रीसर्च इन्स्टिट्यूट, पूसा येथे जेनेटिक्स, प्लॅन्ट ब्रीडिंग व स्टॅटिस्टिक्स या विषयांचा सखोल अभ्यास केला. तसेच, ‘निरनिराळ्या पिकात मिळणारा संकर जोम’ याविषयी निबंध लिहिला. यासाठी त्यांना वूड हाऊस मेमोरियल प्राइझ देण्यात आले. पुढील दोन वर्षांत त्यांनी एम.एस्सी. समकक्ष असो. आय.ए.आर.आय. ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांची नेमणूक शेती संशोधन केंद्र, कर्नाल येथे झाली. काही काळानंतर आय.ए.आर.आय., नवी दिल्ली येथे त्यांची बदली झाली. या संस्थेत त्यांनी गहू, हरभरा, तांदूळ या पिकांवर संशोधन केले. हरभर्‍यातील नैसर्गिक पानांचा आकार व त्याहूनही लहान आकाराची असलेली पाने यांचा रोपपैदास व कोशिका आनुवंशिकशास्त्राद्वारे संशोधन करून प्रबंध लिहिला व एम.एस्सी. (कृषी) ही पदवी प्राप्त केली.

          सन १९४१ मध्ये त्या वेळच्या यू.पी.एस.सी. परीक्षेद्वारे पावरखेडा (मध्य प्रदेश) येथे गहू विशेषज्ञ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली व तेथूनच ते १९६० साली निवृत्त झाले. या काळात त्यांनी गव्हाच्या उन्नत व तांबेरा प्रतिबंधक जाती निर्माण करून, या रोगाने होणार्‍या प्रचंड नुकसानीपासून शेतकर्‍यांना वाचवले. त्यांनी 'हायब्रीड ६५' ही गव्हाची जात बागायतीसाठी, तर 'हायब्रीड ११' व 'हायब्रीड ३८' या जाती कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रसारित केल्या. या जाती मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांसाठी प्रसारित करण्यात आल्या. त्यामुळे गव्हाचे उत्पादन वाढून त्याचा लाभ शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर झाला.

          त्यांनी आपले संशोधन जरनल ऑफ अ‍ॅग्रि. सायन्स, जनरल ऑफ जेनेटिक्स अँड प्लॅन्ट ब्रीडिंग, अ‍ॅग्रि. जनरल ऑफ इंडिया यांसारख्या उच्च संशोधन पत्रिकांत प्रसिद्ध केले. ते कित्येक वर्षे आय.सी.ए.आर.चे वनस्पती विभागाचे सदस्य होते. त्यांच्या हाताखाली अनेक विद्यार्थ्यांनी पीएच.डी.चा अभ्यासक्रम पूर्ण केला. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी नियोजन आयोगात ज्येष्ठ संशोधक म्हणून काम केले. तसेच, निवृत्त संशोधक योजनेखाली टोमॅटो व वाटाण्याच्या कॅनिंगसाठी योग्य जाती निर्माण करण्याचे कार्य नागपूर कृषी महाविद्यालयात केले. जबलपूर येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने त्यांना त्यांच्या संशोधन कार्याचा सन्मान म्हणून मानद पीएच.डी. (१९७३) बहाल केली. 

- संपादित

एकबोटे, रामचंद्र भगवंत