गाडगीळ, सदाशिव रामचंद्र
सदाशिव रामचंद्र गाडगीळ यांचा जन्म कुरुंदवाड या संस्थानी गावी झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कुरुंदवाडलाच झाले. पुढे त्यांनी बी.ए. व एम.ए. या पदव्या मुंबई विद्यापीठातून घेतल्या. ते १९७३ साली मराठवाडा विद्यापीठातून पीएच.डी. झाले. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. ‘वैदिक यज्ञ, मध्ययुगीन तंत्रसाधना आणि ज्ञानेश्वरप्रणित भक्तियोग’.
नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात त्यांनी १९५० ते १९७७ या काळात मराठीचे प्राध्यापक हे पद भूषविले. १९७३ ते १९७७ ते नांदेडच्या महाविद्यालयात प्राचार्यपदावर रुजू झाले. १९७३ साली विद्यापीठाच्या मानव्य विभागावर ‘डीन’ म्हणून त्यांची निवड झाली.
‘हॅम्लेट (विकार-विलसित) - एक चिकित्सक अभ्यास’ हे पुस्तक १९५२ मध्ये विशेष गाजले. ‘सवाई माधवरावाचा मृत्यू - एक चिकित्सक अभ्यास’ हे पुस्तक १९५३ च्या प्रारंभीच्या लेखनानंतर ‘काव्यशास्त्र प्रदीप’ (१९५५) याची सहावी आवृत्ती निघून त्यांच्या चिकित्सक व खोलवर विचार करण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीने हा ग्रंथ विशेष करून गाजला. आजही त्याकडे विशेषत्वाच्या दृष्टीकोनातून बघितले जाते. या ग्रंथात भारतीय व पाश्चात्त्य साहित्य विचारांचा तौलनिक व चिकित्सक दृष्टीने केलेला अभ्यास मांडलेला आहे.
‘वैदिक यज्ञ, मध्ययुगीन तंत्रसाधना आणि ज्ञानेश्वरांचा भक्तियोग’ याला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची प्रदीर्घ, टोकदार प्रस्तावना लाभलेली आहे. त्यात ते स. रा. गाडगीळांचा व्यासंग व स्वतंत्रतेची प्रज्ञा यांच्या विचारांवर गौरवपूर्ण भाष्य करतात. ‘आधुनिक भारताचे शिल्पकार- पंडित जवाहरलाल नेहरू’ या ग्रंथातून त्यांची खोलवर विचार करण्याची चिकित्सक दृष्टी व अभ्यासपूर्वक विचार करण्याची ताकद दिसून येते.
लोकायत- देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांच्या ‘लोकायत’ या ग्रंथावर आधारित त्यांनी आपल्या प्रदीर्घ चिंतनातून सखोल दृष्टीने ग्रंथ लिहिला.
शोकात्मिकेचे विश्वरूपदर्शन-
‘कवयित्री इंदिरा संत यांचे काव्यसौंदर्य- मराठी काव्यांगणातील इंद्रधनू’ यावरही त्यांनी आपल्या चिकित्सक अभ्यासू वृत्तीने एक समीक्षा ग्रंथ लिहिला.
‘शोकात्म विश्वरूपदर्शन’ (२०००) या ग्रंथात ग्रीक, शेक्सपिअरिअन, इब्सेनिअन शोकात्मिकेचे मूळ स्वरूप, तिची उत्क्रांती, तिच्यातून झालेली निरनिराळी परिवर्तने असे व्यापक क्षेत्र कवेत घेऊन शोकात्मिकेपासूनही आनंद का घेता येतो, या विषयासंबंधी त्यांनी मूलगामी चर्चा केली आहे. या ग्रंथाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातील एक वैशिष्ट्य म्हणजे ‘महाभारत’ या भारतीय महाकाव्यातील शोकात्मतेचे अंतःसूत्र शोधून काढण्याचाही त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे.
पाश्चात्त्य साहित्यातील शोकात्मिकेसंबंधीचा विचार काही महत्त्वपूर्ण शोकांतिकांची निवड करून त्यावर सविस्तर विवेचनात्मक लेखन केले आहे. १) ग्रंथातील शोकात्म विश्वरूपदर्शन, २) शोकात्म नाट्याचे अंतरंग, ३) कॅथॉर्सिस आणि शोकात्मिकेचा भावनात्मक परिणाम, ४) शोकात्म नाट्याचा वाचक, ५) ग्रीक शोकात्म नाटक, ६) ग्रीक शोकात्म नाट्यातील कलात्मक सौंदर्य आणि वैचारिक मौलिकता, सॉफक्लीज, अँटिगनी, राजा इडिपस, यूरीपीडिज, हिप्पोलिटस, ७) शेक्सपीरिअन शोकात्मिका - मॅकबेथ, लिअर, हॅम्लेट, ८) इब्सेन युग, ९) महाभारत १०) शोकात्म विश्वरूपदर्शन अशा दहा प्रकरणांत त्यांनी विभागून केलेले आहे. याही ग्रंथातून त्यांची वैचारिक, अभ्यासू, तौलनिक दृष्टी दिसून येते. सर्वांगीण विवेचन करणारा असा मराठीतला पहिला व अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा ग्रंथ मानला जातो. त्यांना साहित्यातील अनेक महत्त्वाचे ग्रंथ पुरस्कार मिळालेले आहेत.
त्यांच्या अभ्यासू प्रवृत्तीला, सखोल विचारांना, ‘वैदिक यज्ञ, मध्ययुगीन तंत्रसाधना आणि ज्ञानेश्वरांचा भक्तियोग’ याला साहित्य परिषद चिपळूणकर पुरस्कार, राजाजी पुरस्कार, संत वाङ्मय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. शोकात्म विश्वरूप दर्शनालाही रा.श्री.जोग, महाराष्ट्र फाउंडेशन, मराठवाडा पुरस्कार देऊन मानाचे पान मानले आहे. ‘विचारमंथना’लाही लोकहितवादी पुरस्कार मिळाला. शोकात्मिकेचे मूळ स्वरूप, तिची उत्क्रांती, तिच्यात झालेली परिवर्तने असे साहित्यक्षेत्रातील व्यापक क्षेत्र निवडून त्याचा बारकाव्याने अभ्यास करून यातून आपल्याला आनंद कसा घेता येतो? का घेता येतो? याच मूलगामी वैचारिक लेखन करून मराठी साहित्यात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली आहे, असे म्हणावे लागेल.
- रागिणी पुंडलिक