Skip to main content
x

गांधी-शापोरजी, रुस्तुम खुशरो

     रुस्तुम खुशरो शापोरजी गांधी यांचा जन्म मध्यप्रदेशातील जबलपूर येथे झाला. १ मे १९४५ पासून त्यांनी भारतीय नौसेनेत सेवेस सुरुवात केली.

     १९७१ च्या भारत-पाक युद्धात कॅप्टन रुस्तुम गांधी यांच्याकडे नौसेनेच्या पश्चिम विभागातील ताफ्याचे फ्लॅग कॅप्टन म्हणून जबाबदारी होती. शत्रूच्या पाणबुड्या आणि वायुसेनेकडून मोठा धोका होता. परंतु गांधी यांनी धोक्याची पर्वा न करता त्यांनी पश्चिम विभागातील तुकड्यांचे अत्यंत स्फूर्तीने नेतृत्व केले आणि कराची बंदराकडे जाणार्‍या सर्व मार्गांवरील दबाव कायम ठेवला.

     कराची बंदराच्या परिसरात या तुकड्यांनी केलेल्या हल्ल्यांमुळे एकाही जहाजाला बंदरात प्रवेश करणे शक्य झाले नाही. अशा प्रकारे नौसेनेची कारवाई यशस्वी करण्यात कॅप्टन रुस्तुम गांधी यांनी मोलाची कामगिरी बजावली.

    आपल्या मोहिमांदरम्यान कॅप्टन रुस्तुम गांधी यांनी धाडस, निष्ठा आणि नेतृत्वगुणांचे सर्वोच्च प्रदर्शन घडविले. या कामगिरीबद्दल त्यांना डिसेंबर १९७१ मध्येे ‘वीरचक्र’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.नोकरीच्या उर्वरित काळात ‘परमविशिष्ट सेवा पदक’ देऊनही त्यांचा गौरव करण्यात आला. 

    २०१४ साली वयाच्या नव्वदाव्या वर्षी नेव्हीनगर, कुलाबा मुंबईमध्ये त्यांचे निधन झाले. 

- रूपाली गोवंडे

गांधी-शापोरजी, रुस्तुम खुशरो