Skip to main content
x

गावडे, प्रभाकर लक्ष्मण

          प्रा. डॉ. प्रभाकर लक्ष्मण गावडे यांचा जन्म नेवासे येथे  झाला. त्यांचे वडील लक्ष्मण रंगनाथ गावडे हे न्यायालयात नोकरीला होते. डॉ. गावडे यांचे माध्यमिक शिक्षण ‘भाऊसाहेब फिरोदिया विद्यालय’ अहमदनगर येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण ‘फर्गसन महाविद्यालय’ व ‘सर परशुरामभाऊ महाविद्यालय’ पुणे येथे झाले. १९५० मध्ये ते बी.टी. झाले. पुणे विद्यापीठातून मराठी व संस्कृत हे विषय घेऊन ते १९५२ मध्ये एम.ए.झाले. १९५६ मध्ये एम.एड झाले. १९६८ मध्ये पुणे विद्यापीठाची पी.एच.डी. ही पदवी संपादन केली. त्यांनी ‘सावरकर ः एक चिकित्सक अभ्यास’ हा प्रबंध या पदवीसाठी सादर केला. या प्रबंधास उत्कृष्ट प्रबंधाबद्दल पुणे विद्यापीठातर्फे ‘न. चि. केळकर पारितोषिक’ व ‘परांजपे पारितोषिक’ मिळाले. (१९७०) तसेच, या ग्रंथास महाराष्ट्र राज्याचा पुरस्कारही मिळाला. (१९७१ - ७२).

     प्रा. डॉ. प्र. ल. गावडे यांनी १९४६ ते १९८२ या प्रदीर्घ कालखंडात अध्यापक, मुख्याध्यापक म्हणून कार्य केले. ‘न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग’, पुणे येथे १९४६ ते ४७ मध्ये ते अध्यापक होते. १९५० ते १९६३ मध्ये ‘नूतन मराठी विद्यालय’ पुणे येथे ते अध्यापक होते. १९६३ ते १९८२ मध्ये ‘सौ. विमलाबाई गरवारे विद्यालयात’ प्रथम उपमुख्याध्यापक व नंतर मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले.

     प्रा. डॉ. प्र. ल. गावडे यांनी पदवी व पदव्युत्तर वर्गांसाठी अध्यापन  केलले आहे.‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे गरवारे कला व शास्त्र महाविद्यालय’, पुणे (१९६९ ते ८२) ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे वाणिज्य महाविद्यालय’ पुणे (१९६८ ते ७२) ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालय’, पुणे (१९७१ ते ७३) आणि ‘पुणे विद्यापीठातील मराठी विभाग’ (१९७६-१९८२) अशा विविध ठिकाणी, विविध स्तरांवर अध्यापन केलेले आहे. त्यांचा अध्यापनाचा विषय ‘मराठी-वाङ्मय’ आहे.

     डॉ. प्र. ल. गावडे यांचे शैक्षणिक प्रशासन सेवेतील कार्यही प्रदीर्घ आणि मौल्यवान आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमध्ये उपकार्यवाह, तीन वर्षे कार्यवाह आणि सहा महिने सल्लागार म्हणून कार्य पाहिले. डॉ. प्र. ल. गावडे यांनी विपुल लेखन केलेले आहे. स्वतंत्र ग्रंथलेखन, संत साहित्यावरील लेखन, शैक्षणिक लेखन, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेखन, शैक्षणिक पुस्तकांचे संपादन, शासकीय पाठ्यपुस्तक-निर्मितीसाठी संपादन, मान्यवर व्यक्ती परिचय-ग्रंथ व लेखन यांचे लेखन, इत्यादी प्रकारचे लेखन त्यांनी केले आहे. याशिवाय त्यांचे अगणित प्रासंगिक लेखन प्रकाशित झालेले आहे. त्याचा आढावा घेणे मूल्यमापन करणे हे एक स्वतंत्र कार्य - संशोधन कार्य आहे.

     ‘सावरकर ः एक चिकित्सक अभ्यास’ हा त्यांनी पी.एच.डी. साठी लिहिलेला प्रबंध-ग्रंथ होय. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वाङ्मयाचा साक्षेपाने, विस्तृत मूलग्राही अभ्यास करून, संशोधन करून सिद्ध केलेला हा ग्रंथ होय. सचेतन सावरकर विचार म्हणजे प्रस्तुत ग्रंथ होय. डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली, वैचारिक शिस्तीत साकार झालेल्या या संशोधनपर ग्रंथास अनेक पारितोषिके मिळाली आहेत.

     ‘कवी यशवंत - काव्यरसग्रहण’ व ‘सावरकरांचे साहित्यविचार’ ही स्वतंत्र पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. 'अजिंक्यतारा' या ना.ह.आपटे यांच्या कादंबरीचे संपादन त्यांनी केले आहे. संतसाहित्य हा डॉ. प्र. ल. गावडे यांच्या संशोधनाचा चिंतनाचा विषय आहे. ‘श्री तुकाराम गाथा’, ‘ज्ञानेश्‍वरी’, ‘श्री ज्ञानेश्‍वर वाङ्मय सूची’ व ‘श्रीनामदेवकृत श्री ज्ञानेश्‍वर समाधी अभंग’ या संपादित पुस्तकांचे प्रकाशन ‘श्री ज्ञानेश्‍वरमहाराज संस्थान, आळंदी’ यांनी केले आहे. ‘संजीवन’ हा संपादित ग्रंथ श्री ज्ञानेश्‍वरमहाराज संजीवनसमाधी सप्तशताब्दीनिमित्ताने प्रकाशित झालेला आहे. ‘शारदीयेचे चंद्रकळे’ हे पुस्तक आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्रकाशन आहे. प्राज्ञ पाठशाळा, वाई, ‘विश्‍वकोश’ ग्रंथलेखनात अभ्यागत संपादक म्हणून ते सहभागी झालेले आहेत.

     शिक्षणक्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव, सखोल चिंतन, व्यासंग, संशोधन यातून विपुल ग्रंथनिर्मिती झालेली असून ती शिक्षणक्षेत्रातील अध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षण विषयाचे मार्गदर्शक व शासनाचे अधिकारी या सर्वांनाच मार्गदर्शक ठरणारी आहे. 'माध्यमिक शिक्षण-विचार, आचार, व्यवहार’ हे त्यांचे स्वतंत्र पुस्तक आहे. इ.स.१९८५ ते १९८९ या काळात त्यांनी जे शिक्षण विषयक स्फुट लेखन केले त्यातील निवडक लेखांचा संग्रह आहे. त्यांनी ‘विचार प्राथमिक शिक्षणाचा’ हा ग्रंथ प्राथमिक शिक्षणासंबंधी चिंतनासाठी वाहिलेला आहे.

     प्रा. प्र. ल. गावडे यांनी माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी (इ.१० वी - एस.एस.सी.) प्रदीर्घ काल अध्यापन केले आहे. त्यांनी या संदर्भात अत्यंत उत्कटतेने, विद्यार्थ्यांवरील प्रेमाने, डोळसपणाने अनेक उपक्रम केले, प्रयोग केले. केवळ आपल्याच शाळेतल्या नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांचे ते सर्वच विषयांचे अध्यापक झाले. इतकेच नव्हे तर अध्यापकांचेही अध्यापक झाले. या संदर्भातील त्यांचे लेखन, चिंतन, मार्गदर्शन अत्यंत गुणवत्ताप्रेरक आहे. गेली २५ वर्षे त्यांनी दै. केसरी पुणे मधील ‘दहावीचा अभ्यास’ या सदरात सातत्याने लेखन व त्या सदराचे संपादन केले. ‘दहावी अभ्यास-तंत्र आणि मंत्र’ या पुस्तकाचे त्यांनी लेखन केले.

     शालेय शिक्षण, विद्यार्थी यांच्यासाठी त्यांनी लेखन - संपादन कार्य केलेले आहे. ‘साहित्यविहार’ (इ. ९ वी, १० वी सहसंपादन) ‘कथाकौस्तुभ’ (इ.८ वी, ९ वी सहसंपादन) ही पुस्तके त्यांनी संपादित केली.‘शालेय मराठी व्याकरण’ (८ वी, ९ वी) या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले. ‘माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ’प्रकाशित मराठी भाषेच्या इ. ९ वी, ११ वी च्या पाठ्यपुस्तकांचे सहसंपादन त्यांनी केले. नू. म. वि. विद्यालय, पुणे या संस्थेच्या ‘नूमविय’ नियतकालिकांचे संपादन त्यांनी केले. ‘लो. टिळक विशेषांक’ (१९५६) ‘स्वातंत्र्यसमर विशेषांक’ (१९५७), ‘अमृतमहोत्सव विशेषांक’ (१९५८) या विशेषांकांचा विशेष उल्लेख करता येईल.

     डॉ. प्र. ल. गावडे हे एक विचारवंत व वक्ते म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेतच. त्यांनी काही प्रसिद्ध व्याख्यानमालेतून व्याख्याने दिली अशा व्याख्यानमालांचा उल्लेख करता येईल.१) मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर, मुंबई २) वसंत व्याख्यानमाला पुणे, वाई, मिरज, नाशिक ३) सावरकर साहित्य व्याख्यानमाला - पंढरपूर, धुळे, पोर्टब्लेअर (अंदमान), कराड, निगडी, मुंबई, नगर. ५) साहित्य संघ, गिरगाव, मुंबई ६)  लोकहितवादी व्याख्यानमाला - नाशिक, ७) बृहन् महाराष्ट्र उज्जयनी, इंदूर ८) गीतारहस्य जयंती व्याख्यानमाला - पुणे. विविध संस्थांच्या कार्यात डॉ. प्र. ल. गावडे  सहभागी होत आले आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीचे सदस्य, कोषाध्यक्ष व महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या संपादन मंडळाचे सदस्य, परिषदेच्या ग्रंथसमीक्षक समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

     मराठीतील उत्कृष्ट ग्रंथांना राज्यपुरस्कार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या ग्रंथ समीक्षक समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. (१९७६) पुणे विद्यापीठातील मराठी विभागात संशोधन मार्गदर्शक रिसर्च गाईड म्हणून काम पाहिले आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (पुणे) विविध समित्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

    महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा (कार्यकारिणी सदस्य), मराठी अध्यापक संघ (अध्यक्ष), पूना स्कूल अ‍ॅथलेटिक असोसिएशन (अध्यक्ष) गरवारे शालेय भजन दिंडी समिती (अध्यक्ष) पुणे जिल्हा व शहर मुख्याध्यापक संघ (कार्यकारिणी सदस्य), ‘कामायनी’ मतिमंद मुलांची संस्था (कार्यकारिणी सदस्य), ज्ञान प्रबोधिनी (उपाध्यक्ष), स्वाध्याय महाविद्यालय (संस्थापक सदस्य), सेवासदन सोसायटी (कार्यकारी मंडळ सदस्य), विद्यार्थी साहाय्यक समिती (सल्लागार मंडळ, समिती) इ. संस्थांशी डॉ. प्र. ल. गावडे यांचा निकटचा संबंध आहे. संस्थांमधील निरपेक्ष, निरालस परिश्रमांमुळे व मार्गदर्शनामुळे सार्वजनिक जीवनातील सहभागाचा एक आगळा आदर्श डॉ. प्र. ल. गावडे सरांनी निर्माण केला आहे. ‘श्री ज्ञानेश्‍वरमहाराज संस्थान आळंदी’ या संस्थेचे विश्‍वस्त व प्रमुख विश्‍वस्त म्हणून सेवा कार्य करण्याचा बहुमान डॉ. प्र. ल. गावडे यांना लाभला. (१९८६ - ९४)

     विविध  चर्चासत्रातील अभ्यासपूर्ण सहभागामुळे त्या त्या चर्चासत्रांना एक वैचारिक उंची प्राप्त करून देण्याचे कार्य डॉ. प्र. ल. गावडे यांनी केलेले आहे. ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या अधिवेशनातील चर्चासत्रांत सहभाग (पुणे- १९७९ व पुणे १९९०) मुख्याध्यापक प्रशिक्षण वर्गांचे संचालन त्यांनी ‘आदर्श बहुव्यापी शिक्षक व संशोधन महाविद्यालय’ पुणे या संयोजन संस्थेच्या माध्यमातून केले. ‘महाराणी ताराबाई शिक्षण - प्रशिक्षण महाविद्यालय’, ‘कोल्हापूर विस्तार सेवा’ विभागातर्फे चंदगड, बाहुबली, कुडित्रे येथील शिबिरांतील शैक्षणिक चर्चासत्रांत ते सहभागी झाले.

     वर उल्लेखलेल्या ‘सावरकर ः एक चिकित्सक अभ्यास’ या ग्रंथास मिळालेल्या पारितोषिकाशिवाय डॉ. प्र. ल. गावडे यांना विविध सन्माननीय पुरस्कार मिळालेले आहेत. ‘आदर्श शिक्षक - राज्य पुरस्कार’(१९७६), ‘उत्कृष्ट साहित्य समीक्षेबद्दल ‘पु. भा. भावे स्मृति समितीचा’ पुरस्कार (१९९७), ‘सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल अ‍ॅड. डी. आर. नगरकर पुरस्कार’, ‘शैक्षणिक कार्याबद्दल राजा मंत्री पुरस्कार’, शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे कृतज्ञता पुरस्कार’ (१९९८) आणि ‘विचार प्राथमिक शिक्षणाचा’ या पुस्तकास म. सा. परिषदेचे ‘ना. गो. चाफेकर पारितोषिक’ (१९९८) अशा विविध पुरस्कारांनी डॉ. प्र. ल. गावडे यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. डॉ. प्र. ल. गावडे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा गौरव करण्यात आला. त्या वेळी ‘अमृतसंचय’ हा ‘डॉ. प्र. ल. गावडे अमृतमहोत्सव गौरव ग्रंथ’ प्रकाशित करण्यात आला आहे.

- श्री. वा. कुलकर्णी

गावडे, प्रभाकर लक्ष्मण