गायकवाड, महादेव शाम
महादेवराव शामराव गायकवाड यांचा जन्म मूळ गाव काकंबा, ता. तुळजापूर जि.धाराशिव इथल्या भटके विमुक्त समाजातील कैकाडी या समाजामध्ये झाला. महादेवराव यांचे शिक्षण एम.ए., एम.एड व डिप्लोमा. व्ही.जी. पर्यंत झाले आहे.
भटके-विमुक्त तसेच पारधी समाजाच्या शैक्षणिक विकासाच्या व पुनर्वसनासाठी रचनात्मक कार्यामध्ये त्यांनी भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून यमगरवाडी प्रकल्पाच्या सुरुवातीपासून कार्य केले आहे. यमगरवाडीला पारधी समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरु करण्यामध्ये महादेवरावांचा खूप मोठा वाटा आहे. एक दोन कार्यकर्त्यांच्या मदतीने महादेवरावांनी वसतिगृहाची सुरुवात केली. वसतिगृहाच्या सुरुवातीपासून महादेवरावांनी पारधी समाजाच्या व भटक्यांच्या पालावरती संपर्क करून तेथील मुलांना यमगरवाडीत शिक्षणासाठी आणले. त्यांच्या कार्यात त्यांची पत्नी निर्मलाताई गायकवाड यांनी त्यांना मोलाची साथ दिली. त्यांनी स्वतःच्या नोकरीचा व्याप सांभाळून वसतिगृहामधील मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. वसतिगृहातील मुलांना वसतिगृहात राहण्याची अथवा दिवस भर वर्गात बसून शिक्षण घेण्याची सवय नव्हती. त्यामुळे मुले सतत पळून जायची. त्यांना शोधून आणून वसतिगृहात ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करावा लागे. त्यांचे मार्गदर्शन लाभलेले यमगरवाडीतील अनेक विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. भटके-विमुक्त अभ्यास संशोधन समिती, महाराष्ट्र शासन यावर महादेवराव यांनी कायम निमंत्रीत सदस्य म्हणून काम केले आहे.
एन.सी.सी. प्रशिक्षण, स्काउट प्रशिक्षण, वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध ठिकाणी सहलीचे आयोजन, पालकांशी संपर्क, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरता हिन्दी, शिष्यवृत्ती व नवोदय प्रवेश परीक्षा तयारीचा सराव यामध्ये त्यांनी भरीव कार्य केले आहे.
त्यांनी शिक्षण बाह्य जगामध्ये एस.एस.सी. च्या शून्य टक्के निकालाच्या शाळेमध्ये मार्गदर्शन केले आहे. शिक्षकांच्या गटसंमेलनामध्ये प्रबोधनाचे काम केले आहे. अध्यापनाच्या व नोकरीच्या कामामध्ये महादेवरावांनी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मदत केली आहे. त्यांनी घडविलेले अनेक विद्यार्थी महाराष्ट्राच्या विविध भागात उच्च पदावर कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांचे हिंदी लेखन, मराठ्यांच्या इतिहासावर अन्याय का? या विषयावर तसेच मुंबई क्षेत्रातील मुलींच्या आवडीच्या व्यावसायिक क्षेत्रांचा शोध घेणे, या विषयांवर महादेवरावांनी संशोधनाचे काम केले आहे.
आजपर्यंत महादेवरावांना राष्ट्रीय कामगार युनियन तर्फे स्व. बाळासाहेब साठे पुरस्कार (१९९२), राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार (मे २००६), जिल्हा स्तरीय शिक्षक पुरस्कार (सप्टेंबर २००७) अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
सध्या महादेवराव सेवा निवृत्त आहेत. सामाजिक कार्य तसेच धाराशिव जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघ चालक म्हणून महादेवरावांकडे जबाबदारी आहे.