Skip to main content
x

गायकवाड, शंकर श्यामजी

सनईवादक

 

         महाराष्ट्रात सनईवादनाची परंपरा तसे पाहता मध्ययुगापासून होती व गुरव, कैकाडी, महार या जमातीतील कलाकार यात अत्यंत तरबेज असत. मात्र मौंजी, विवाहासारखे संस्कारविधी, मंदिरांतील दैनंदिन सेवा, धार्मिक उत्सव यांतील वादनापुरते या सनई व सुंद्रीवादनाचे स्वरूप मर्यादित होते.

         सनई या वाद्यास रंगमंचावर प्रतिष्ठित करण्याचे मोठे कार्य सनईसम्राट शंकरराव शामजी गायकवाड यांनी केले. सनई व सुंद्रीवादनाची परंपरा असलेल्या नाभिक समाजात, पुण्यात त्यांचा जन्म झाला. सरस्वतीबाई व  श्यामजी गणपत गायकवाड हे त्यांचे माता-पिता होत. आपल्या चुलत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षापासून सनईवादनास आरंभ केला व अल्पावधीतच ते पारंपरिक धुनी, लावण्या व टप्पे वाजवू लागले. मात्र अक्कलकोटचे गायक शिवभक्तबुवा यांनी त्यांच्यावर रागसंगीताचे प्रारंभिक संस्कार केले. त्यांची प्रगती पाहून त्यांना गायनाचार्य भास्करबुवा बखले यांच्याकडे ख्याल, ठुमरी शैली शिकण्यास पाठवले आणि शंकररावांनी रागसंगीतावरही नैपुण्य मिळवले. त्यांचे वादन सुरेल, तयारीचे होते. प्रचलित रागांसह अनवट रागही ते सफाईने वाजवत. 

        त्यांच्या विसाव्या वर्षी मुंबईतील शेट वसंतजी खेमजी सभागृहातील पहिल्या मैफलीतच त्यांनी आपले स्थान सिद्ध केले व उत्तरोत्तर त्यांची कीर्ती वाढत गेली. ख्याल व धुनींसह ‘उगीच का कांता’, ‘चंद्रिका ही जणू’, ‘पांडुनृपती जनक जया’ अशी नाट्यपदेही शंकरराव बहारीने वाजवत, म्हणून बालगंधर्व त्यांना गंधर्व नाटक मंडळीत विशेष प्रसंगी वादनास पाचारण करत. पुण्यातील आर्यन सिनेमागृहात मूकपटांसाठी ते पार्श्वसंगीत म्हणून वादन करत. महाराष्ट्रातील सर्व संस्थानांसह हैद्राबाद, बडोदा, जामनगर इ. दरबारांत शाही इतमामात त्यांचे वादन होई. म्हैसूर दरबारच्या दसरा उत्सवासाठी तर पंधराहून अधिक वर्षे त्यांनी वादन केले. बडोदा दरबारात त्यांनी दरबारी कानडा हा राग वाजवला होता व त्या श्रुतियुक्त वादनास उ. फैयाझ खाँ साहेबांनीही दाद दिली होती. जालंधर, गया, अजमेर, नागपूर, इ. ठिकाणी अनेक संगीत परिषदांतून त्यांनी कला सादर करून नाव कमावले.

        एच.एम.व्ही. कंपनीने १९३७ ते ३९ या काळात त्यांच्या जौनपुरी, मुलतानी, भीमपलास, मालकंस, तिलक कामोद, मालगुंजी, दरबारी कानडा, बिहाग, धानी, बागेश्री, जोगिया इ. राग, काही धुनी, नाट्यपदे व भजने यांच्या दहा ध्वनिमुद्रिका काढल्या होत्या. तसेच ट्रिन कंपनीने अडाणा व मल्हार रागांतील वादनाची ध्वनिमुद्रिका काढली होती. या ध्वनिमुद्रिका त्या काळी भारतासह आफ्रिका व आशिया खंडातील अन्य देशांत वितरित झाल्या व अत्यंत गाजल्या. बी.बी.सी व सिलोन रेडिओवरूनही या तबकड्या वाजवल्या जात असत.

         स्वातंत्र्यपूर्व काळात फैजपूर, इंदूर, नाशिक इ. ठिकाणी झालेल्या काँग्रेस अधिवेशनांत त्यांना वादनासाठी पाचारण करण्यात आले होते. फैजपूर अधिवेशनात महात्मा गांधींपुढे वादन करण्याची संधी त्यांना लाभली व त्यांच्या वादनाने प्रसन्न होऊन गांधीजींनी त्यांना रोज प्रार्थनेच्या वेळी भजने वाजवण्यास बोलावले होते. त्यांना १५ ऑॅगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्यदिनी शनिवारवाड्यावर सनईवादन करण्याचा मान  मिळाला  होता. पुणे आकाशवाणीचे उद्घाटन त्यांच्या वादनाने झाले व नंतर अनेक आकाशवाणी केद्रांत त्यांनी सनईवादन पेश केले. सनईवादनातील कलानैपुण्याबरोबरच या वाद्याची पत्ती बनवणे, पावी गुंफणे इ. तांत्रिक बाबींत ते वाकबगार होते. वयाच्या सत्तरीपर्यंत ते अत्यंत तयारीने वादन करत असत. सनईसारखी सुषिर वाद्ये वाजवण्यास दात सुस्थितीत असावे लागतात, मात्र शंकरराव दंतविहीन अवस्थेतही वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत वादन करू शकत.

         सनई म्हटले की बनारसच्या बिस्मिल्ला खाँ यांचे नाव डोळ्यांसमोर येते, मात्र त्यांच्याही आधी सुमारे २५ वर्षे शंकररावांनी सनईवर रागसंगीताचा प्रगल्भ आविष्कार करून या वाद्यास स्वतंत्र वादनाचा दर्जा व प्रतिष्ठा मिळवून दिली होती, भारतभरात लौकिक प्राप्त केला होता. या दृष्टीने सनईवादनाच्या क्षेत्रात महाराष्ट्रच नव्हे, तर पूर्ण हिंदुस्थानात त्यांचे श्रेय हे अग्रक्रमाचे ठरते. शंकररावांचे हे श्रेय खुद्द बिस्मिल्ला खाँ यांनीही त्यांना मान देऊन मान्य केले होते. ठिकठिकाणच्या संगीतसंस्थांनी त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचा गौरव केला होता. पुणे महानगरपालिकेने १९५४ व १९६९ साली त्यांचा विशेष सन्मान केला होता. नागपूर येथील संगीत परिषदेत त्यांना सन्मानित करण्यात आले होते. पुणे संगीत शिक्षक संघाने विख्यात गायिका हिराबाई बडोदेकरांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला होता.   

        शंकररावांच्या स्मृतिनिमित्त त्यांच्या निवासस्थानावर खास नीलफलक बसवण्यात आला, तसेच पुणे महानगरपालिकेतर्फे त्यांचे नावही निवासस्थानाच्या मार्गास देण्यात आले. त्यांच्या स्मृतिनिमित्त दरसाल १७ मार्च रोजी विशेष मैफलीचे आयोजन केले जाते. शंकररावांची परंपरा त्यांचे पुत्र बबनराव, प्रभाशंकर व नातू प्रमोद हे चालवत आहेत व ‘सनईसम्राट शंकरराव गायकवाड अकादमी’त सनई व सुंद्रीवादनाचे पारंपरिक शिक्षण देण्यात येते.

— चैतन्य कुंटे

गायकवाड, शंकर श्यामजी