Skip to main content
x

गायतोंडे, वासुदेव सन्तू

           स्वयंप्रज्ञ प्रतिभा असलेले, आधुनिक भारतीय चित्रकलेत अमूर्त शैलीला एक वेगळी प्रतिष्ठा मिळवून देणारे वासुदेव सन्तू गायतोंडे यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांचे घरातील टोपणनाव ‘बाळ’ होते आणि मित्रांमध्ये ‘गाय’ ह्या नावाने ते प्रसिद्ध होते. त्यांच्या आईला ‘बायजी’ म्हणत. ती गोव्याजवळच्या डिचोली गावची होती.

           म्हापसा शहराजवळील उस्कुई गावचे हे मूळ कुटुंब. गायतोंडे यांचे वडील बोल्टन प्रेसमध्ये सहाय्यक व्यवस्थापक होते. त्यांच्या वडिलांचे प्रेसशी संबंधित काम असूनही विज्ञानापासून कायद्यापर्यंत आणि ज्योतिषापासून आयुर्वेदापर्यंत त्यांचा दांडगा अभ्यास होता. घरातच ग्रंथसंग्रह असल्याने वासुदेवास वाचनाची गोडी लहानपणीच लागली. गायतोंडे कुटुंबातील कुणीतरी एक  गावातील देवळाच्या भिंतींवर चित्रे काढायचा. ते बघून छोट्या वासुदेवास चित्र काढावेसे वाटू लागले. नंतर हे कुटुंब मुंबईला, गिरगावात स्थलांतरित झाले. गिरगावात मॅजेस्टिक सिनेमासमोर कुडाळदेशकर वाडीत, चाळीच्या अडीच खोल्यांत हे कुटुंब स्थिरावले.

           वासुदेव गायतोंडे मुंबईत सुरुवातीला महापालिका शाळेत शिकले व नंतर गोखले हायस्कूलमधून मॅट्रिक झाले. त्यांचे चित्रे काढणे चालूच होते. थोड्याच दिवसांत ते  मुंबईतील कलाप्रदर्शनांना हजेरी लावू लागले. घरून ह्या संदर्भात त्यांना प्रोत्साहन मिळाले नाही. वडील अतिशय तापट आणि आई पारंपरिक वृत्तीची होती. ‘वाटेल त्या’ मुलांबरोबर मिसळायला त्यांना परवानगी नसे, त्यामुळे लहानपणापासून आपसूकच ते एकटे होत गेले.

           त्यांनी १९४३ मध्ये एका खाजगी आर्ट स्कूलमध्ये नाव दाखल केले व त्या तयारीमुळे १९४५ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांना थेट तिसर्‍या वर्षात प्रवेश मिळाला. जे.जे.च्या भव्य परिसराचा त्यांच्यावर चांगला परिणाम झाला. जगन्नाथ अहिवासी हे त्यांना रचनाचित्र शिकवत. अडूरकर पेन्सिल ड्रॉइंग आणि भोंसुले मास्तर जलरंगचित्रण व व्यक्तिचित्र शिकवत. अहिवासी आणि भोंसुले मास्तरांचे गायतोंडे हे लाडके विद्यार्थी होते.

           सुट्टीत काम करून गायतोंडे आर्ट स्कूलच्या खर्चाची मिळवणी करत. पुढे त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. त्या वेळी सहाध्यायी विद्यार्थ्यांमधील निकोप वातावरणामुळे त्यांना एकमेकांकडून खूप शिकायला मिळाले. पुढे ते त्यांच्या समकालीन पळशीकर ह्या थोर कलाशिक्षकांच्या प्रभावाखाली आल्यामुळे त्यांची आधुनिक चित्रकलेशी ओळख झाली. ‘भारतीय लघुचित्रे’ हा गायतोंडे यांचा खास अभ्यासाचा विषय होता. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी लघुचित्रांचे चक्क कित्ते गिरवले. नंतर लघुचित्रांमधील आकृतिबंध गाळून त्यांतील प्रमाणबद्धता, रचनासूत्रे, रंगांचे संघटन आणि भाव हे त्यांच्या चित्रांत राहिले आणि हीच त्यांच्या आधुनिक चित्रकलेची सुरुवात होती.

           आजच्या काळात मूर्त आणि अमूर्त असे तट पडलेले असताना त्यांचा हा आकृतीकडून अमूर्ताकडे होत गेलेला प्रवास अभ्यासकांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर ते जर्मन-स्विस चित्रकार पॉल क्लीच्या प्रभावाखाली आले. क्लीच्या चित्रातील अद्भुत गोष्टी, रंगसंगती, रेषेचे सौंदर्य ह्यांनी त्यांना मोहून टाकले. क्लीने खूप छोट्या आकारांत चित्रे काढून आपले सामर्थ्य व्यक्त केले. परिस्थिती आणि जागेची अडचण ह्यांमुळे गायतोंडे यांनाही त्या काळात फक्त छोट्या आकाराची चित्रे काढणेच शक्य होते.

           आर्ट स्कूलच्या काळातच गायतोंडे यांनी बौद्ध वाङ्मय, जपानी चित्रकला, मृद्पात्रे (पॉटरी), कविता यांचाही अभ्यास या काळात केला. निसर्गदत्त महाराज, रमण महर्षी, सोयरोबानाथ अंबिये, संतवाङ्मय, कला, साहित्य, तत्त्वज्ञान असे विविध विषय त्यांच्या वाचनात होते. त्या काळात जे.जे.च्या पटांगणात दरवर्षी जे. कृष्णमूर्ती हे तत्त्वज्ञ आपली प्रवचने देण्यास येत. ह्या प्रवचनांचा फार मोठा परिणाम त्यांच्या जीवनावर झाला.

           गायतोंडे यांना १९४८ मध्ये जे.जे.मधून पदविका मिळाली व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे फेलोशिपही मिळाली. त्यांनी १९४९/५० या काळात जे.जे.मध्ये साहाय्यक शिक्षक म्हणून काम केले. त्यांनी केलेली ही एकमेव नोकरी होती. काही मतभेद होऊन त्यांनी १९५० मध्ये ही नोकरी सोडली व पूर्णवेळ चित्रकार म्हणून जगण्यास सुरुवात केली.

           हुसेन, सूझा, रझा, आरा, गाडे आणि बाकरे ह्यांनी १९४८ मध्ये  ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूप’ स्थापन केला. नंतर गायतोंडे त्यात सहभागी झाले. ह्या ग्रूपतर्फे १९४९ मध्ये भरवलेल्या समूह प्रदर्शनात त्यांचा सहभाग होता. त्यानंतर काही चित्रकारांनी ‘बॉम्बे ग्रूप’ स्थापन केला, त्यातही गायतोंडे होते. ह्या ग्रूपचीही काही प्रदर्शने झाली. ह्या साऱ्यांत होणाऱ्या कलाविषयक चर्चा, वादविवादांत गायतोंड्यांचा सक्रिय सहभाग असे आणि त्यांच्या मताला सहकलाकारांमध्ये मान होता.

           मुंबईत १९५७/५८ मध्ये वॉर्डन रोडवर भुलाभाई देसाई मेमोरिअल इन्स्टिट्यूट सुरू झाली. संगीत, चित्रकला, नाट्यक्षेत्रातील कलाकारांच्या कलासाधनेसाठी इथे उत्तम वातावरण होते आणि कलावंतांना तिथे अतिशय स्वस्तात स्टूडिओ मिळण्याची सोय होती. गायतोंडे यांनी तिथे काम करण्यास सुरुवात केली. ह्या इन्स्टिट्यूटसमोरच्या बाकावर बसून समुद्राकडे पाहत गायतोंडे तासन्तास चिंतन करत. नाट्य, नृत्य, चित्र अशा सर्व कलांमध्ये काहीतरी नवीन करू पाहणार्‍या कलाकारांचा इथे राबता असे आणि परस्परांत संवादही असे. गायतोंडे इथेच अल्काझी, विजया मेहता इत्यादींच्या संपर्कात आले.

           गायतोंडे यांना १९६५ मध्ये फोर्ड फाउण्डेशनची प्रवास शिष्यवृत्ती मिळाली. त्या अंतर्गत ते अमेरिकेला गेले. तेथे त्यांनी संगीत, नाटक आणि सिनेमा ह्या सर्व गोष्टी उत्सुकतेने पाहिल्या व अनुभवल्या. मोठमोठ्या म्युझियम्समधील चित्रकलेची प्रदर्शने व कलादालने पाहिली. न्यूयॉर्कमधील उत्तराधुनिक चित्रकारांची चित्रे पाहिली. अमेरिकेहून ते क्योटो, जपान येथे गेले. तेथे त्यांनी झेन मठ पाहिले व ते तेथे काही काळ राहिलेही. प्रवासात त्यांनी छायाचित्रे काढली. झेन तत्त्वज्ञानाचा तेथे परिचय झाला व ह्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाने गायतोंड्यांच्या विचारांना एक दिशा मिळाली.

           मुंबईत परतल्यावर त्यांची चित्रकला एक वेगळे रूप घेऊ लागली. एखाद्या विवक्षित संकल्पनेतून चित्रण करण्याची आवश्यकता नष्ट झाली आणि त्यातूनच एक मोकळेपणा आला व मानसिक मुक्तीच्या खुणा चित्रफलकावर सहजगत्या अवतरू लागल्या. उत्स्फूर्ततेला अधिक महत्त्व आले. त्या विवक्षित क्षणी जे घडेल ते अलिप्तपणे ‘घडू’ देणे हे सहजपणे होऊ लागले.

           भुलाभाई मेमोरिअल इन्स्टिट्यूट १९६६-६७ च्या सुमारास बंद झाली व त्यानंतर कुठे जावे हे गायतोंडे यांना कळेना; कारण घराचे बंध त्यांनी कधीच तोडून टाकले होते. वाळकेश्‍वर येथे हरकिशनलाल यांच्या स्टुडीओत ते राहू लागले. तुटपुंज्या पैशांत मुंबईत राहणे दिवसेंदिवस कठीण झाले होते. त्या काळात दिल्लीत खूप कमी पैशांत बंगल्याच्या गच्चीतील खोली (बरसाती) सहज मिळत असे. रामकुमार यांनी अशी एक बरसाती १९७१/७२ मध्ये जंगपुऱ्यात मिळवून दिली आणि त्यामुळे मुंबईतील सर्व नातीगोती तोडून गायतोंडे कायमचे दिल्लीवासी झाले. नंतर मुंबईला ते फक्त पंडोल आर्ट गॅलरीतील त्यांच्या प्रदर्शनानिमित्त येत.

           जंगपुऱ्यात एखादे वर्ष काढल्यावर त्यांना पूर्व निजामुद्दीन येथे हजरत निजामुद्दीनच्या दर्ग्याजवळच एक बरसाती मिळाली. ते १९९७ पर्यंत तिथे राहिले व त्यांनी तिथे काम केले. दिल्लीत १९७४ च्या आसपास त्यांची ओळख ममता सरन ह्या चित्रकर्तीशी झाली. त्यांची मैत्री आणि सोबत गायतोंडेंना अखेरपर्यंत लाभली. ममताने त्यांची शेवटपर्यंत काळजी घेतली. ते १९९७ ते २००१ ह्या काळात ममताबरोबर गुडगाव येथे एकत्र राहिले.

           त्यांनी निजामुद्दीनच्या बरसातीतच त्यांचे मुख्य काम केले. तेथे सुरुवातीला आकाशवाणीची संगत असे तर नंतर गायतोंडे ध्वनिमुद्रिका वाजत ठेवत; दूरचित्रवाणी आल्यावर मग ती सतत चालू असे. गायतोंड्यांच्या एकांतातल्या चिंतनाला सतत संगीत आणि चित्रकला ह्यांची साथ होती.

           गायतोंडे यांना १९८६ मध्ये एका रिक्षाने धडक दिली व त्यामुळे त्यांच्या मज्जासंस्थेवर परिणाम झाला. त्यांच्या मानेच्या मणक्याला इजा झाली व त्यांची मान एका बाजूला कलंडल्यासारखी झाली. ह्या आजारपणात त्यांना खूप त्रास झाला. सतत गळपट्टा घालावा लागे. त्यानंतर त्यांनी सात-आठ वर्षे काहीही काम केले नाही. ते नुसते विचार करत बसून असत. त्यांच्याच शब्दांत, ते ‘रिकामे’ होत होते. ह्या दीर्घ विश्रांतीनंतर त्यांनी केलेल्या तैलरंगातील चित्रांत वेगळाच बदल झाला. त्यांत अनेक कॅलिग्रफिक आकार तरंगू लागले.

           गायतोंडे चित्र काढायचे ते स्वत:च्या आनंदासाठी. त्यांची अध्यात्माची बैठक पक्की असल्याने चित्रकलेत ते सहजपणे आकाराकडून निराकाराकडे गेले आणि स्वत:च्या जीवनात ते आसक्तीकडून विरक्तीकडे गेले. त्यांचे बोलणेही ‘मी’पणापासून अलिप्त होत गेले. गायतोंडे यांनी जगापासून स्वत:ला फार लवकर बाजूला काढून घेतले. स्वत:भोवती एकटेपणाचा कोष विणला. नातीगोती तोडून टाकली; कारण त्यांना एकच ध्यास लागला होता, तो म्हणजे पेंटिंगचा. महाराष्ट्रातील संतकवींनी विठ्ठलाच्या ध्यासात सगळ्याचा त्याग केला, त्या संतकवींशी त्यांचे नाते होते. आपल्या दिल्लीतील मठीत ते एखाद्या संतासारखेच अनंतात दृष्टी लावून बसलेले असत.

           गायतोंडे यांच्या प्रमुख कार्याचा विचार केल्यास त्यांनी अमूर्त चित्रकलेला, त्याचबरोबर चित्रकार म्हणून जगण्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांनी आपल्या कलंदर जगण्याचे भांडवल केले नाही. अमूर्त चित्रकला हे काहीतरी थातूरमातूर प्रकरण नसून त्यामागे चित्रकाराचे काही जीवनविषयक तत्त्वज्ञान असते, विचार असतो हे गायतोंडे यांनी आपल्या कामातून, वागण्याबोलण्यातून, जगण्यातून, मुलाखतींमधून हळूहळू प्रस्थापित केले.

           गायतोंड्यांच्या कॅनव्हासवर अवकाश आणि अवकाशात आकार घेणाऱ्या रंगांच्या विविध रूपांचा आविष्कार दिसतो. त्यांची चित्रे ही एका मुख्य रंगाच्या अनुषंगाने सुरू होऊन त्यात नंतर इतर रंगांची योजना होत जाते व मूळ प्रमुख रंगाचे रूप त्या इतर रंगांच्या आधाराने हळूहळू उलगडत जाते.

           त्यांनी मधल्या काही काळात स्केचपेनने कागदावर खूप ड्रॉइंग्ज केली आणि ही सारी कॅलिग्रफीच्या खूप जवळ जाणारी होती. नंतरच्या त्यांच्या तैलरंगातील कॅनव्हासवर काही कॅलिग्रफिक आकार येऊ लागले आणि त्या आकारांचा रंगांच्या लाटेवर तरंगताना एक सुंदर, सहज तोल साधला जाऊ लागला.

           ते कुणाशी फारसे बोलत नसत. पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे ते कधी लागले नाहीत. वाचन आणि संगीतात ते रममाण होत. ते एकटेच नाटक-सिनेमाला जाऊन बसत. पं.रविशंकर, झुबिन मेहता, झुबेद यांचे संगीत त्यांना आवडत असे.

           मुंबईच्या पंडोल आर्ट गॅलरीने १९९५ मध्ये गायतोंडे यांच्यावर एक माहितीपट तयार केला. या चित्रपटाचे दिग्दर्शन पॅरिस येथील सुनील काळदाते यांनी केले होते. पॉम्पिदू आर्ट सेंटर, तसेच व्हेनिस आणि ग्रीस फिल्म फेस्टिव्हलमध्ये तो दाखवण्यात आला. हा माहितीपट परदेशात आणि इथल्या कलावर्तुळात खूप गाजला. पण काळदाते जेव्हा गायतोंडे यांना भेटायला दिल्लीला गेले, तेव्हा तो त्यांनी पाहिलाही नव्हता आणि तो बघायला मिळावा अशी त्यांची इच्छा वा आग्रहदेखील नव्हता. गायतोंडे यांची चटकन न उमगणारी अमूर्त शैलीतील चित्रे, त्यांचा तत्त्वज्ञानाचा अभ्यास आणि जगण्याची जगावेगळी शैली यामुळे गायतोंडे हे जिवंतपणीच एक आख्यायिका बनले आणि त्यांच्याभोवती एक गूढतेचे वलय निर्माण झाले.

           वासुदेव गायतोंडे यांना अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले. बॉम्बे आर्ट सोसायटीचे सिल्व्हर मेडल (१९५०), ‘यंग एशियन आर्टिस्ट’ अवॉर्ड, टोकियो (१९५७), जे.डी. रॉकफेलर प्रवास शिष्यवृत्ती, अमेरिका (१९६४-६५), ‘कालिदास सन्मान’ (१९८९), ‘पद्मश्री’ (१९७१) हे त्यांपैकी प्रमुख सन्मान आहेत. त्यांची अनेक एकल प्रदर्शने मुंबई, दिल्ली, न्यूयॉर्क इत्यादी ठिकाणी झाली. पूर्व युरोपात भरलेले भारतीय कला प्रदर्शन (१९५६), प्रोग्रेसिव्ह ग्रूप आर्ट शो (१९४९), लंडन व न्यूयॉर्क येथे समूह प्रदर्शन (१९५९, १९६३), ग्रहम आर्ट गॅलरी, न्यूयॉर्क येथे एकल प्रदर्शन (१९६५), फेस्टिव्हल ऑफ इंडिया (१९८२) अशा महत्त्वाच्या प्रदर्शनांमध्ये त्यांचा सहभाग होता. ललित कला अकादमी, नवी दिल्ली; टीआयएफआर, मुंबई; म्यूझियम ऑफ मॉडर्न आर्ट, न्यूयॉर्क अशा अनेक देशी-विदेशी संग्रहालयांत आणि कलासंग्रहकांच्या संग्रही त्यांची चित्रे आहेत.

           गायतोंडे यांच्या कलाप्रवासाचे तीन टप्पे आहेत. १९४५ ते १९६० हा पहिला टप्पा आहे. जे.जे.मध्ये विद्यार्थी असताना एकीकडे त्यांनी भारतीय लघुचित्रांचा सखोल अभ्यास करून अहिवासींना अभिप्रेत असलेली चित्रातील भावप्रधानता आत्मसात केली, तर दुसरीकडे पळशीकरांमुळे पॉल क्लीच्या निर्मितिसूत्रांचा त्यांनी मागोवा घेतला. विद्यार्थिदशेत त्यांनी केलेल्या रेखाटनांमधून याचा प्रत्यय येतो. जे.जे.च्या संग्रहात गायतोंडे यांनी केलेले एक मोठे भित्तिचित्र आहे, त्यात या भारतीय शैलींचा आविष्कार दिसतो, तर जे.जे.च्याच संग्रहातले दुसरे तैलचित्र आहे त्यात पॉल क्लीचा प्रभाव दिसतो. या दुसर्‍या चित्राला जरी कुठलेही शीर्षक नसले आणि त्यात भौमितिक आकारच प्रकर्षाने दिसत असले, तरी ते व्यक्तिचित्रण आहे हे बारकाईने पाहिल्यास लक्षात येते. समोर बसलेल्या व्यक्तीचे चित्रण करण्याऐवजी चित्र-काराच्या कल्पनाविश्‍वातल्या भावलेल्या एका व्यक्तीचे ते प्रकटीकरण वाटते. त्यातला रंगांचा वापरदेखील वेगळा आहे.

           ‘वुमन विथ काइट’ किंवा ‘टू विमेन’ या १९५३ सालच्या चित्रांमध्ये फिकट, मातकट रंगांच्या पार्श्‍वभूमीवर काळ्या रेषेने काढलेल्या मानवाकृती इजिप्शियन किंवा भारतीय शैलीची आठवण करून देतात. पण पॉल क्लीच्या १९२०च्या दशकातील ‘द टाइटरोप वॉकर’सारख्या चित्रांशीदेखील या चित्रांचे साधर्म्य आहे. याच काळातले ‘सायकल लोकेशन’ (१९५३) सारखे चित्र आकृतिप्रधान चित्रांकडून अमूर्त आकारांकडे संक्रमित होणार्‍या गायतोंडे यांच्या शैलीतले स्थित्यंतर दाखवते. हळूहळू गायतोंडे यांच्या चित्रांमधील मानवाकृती भौमितिक आकारांमधले रंगांचे आकार बनतात.

           गायतोंडे यांनी या सुरुवातीच्या कालखंडाविषयी म्हटले आहे की, चित्रात आकार मिळवण्यासाठी ते मानवी आकृतींवर अवलंबून असायचे. पण नंतर त्यांच्या लक्षात आले, की मानवी आकृतीशिवाय आकार मिळवणे वा शोधणे हे जास्त महत्त्वाचे आहे. ज्ञात आकारांपासून ते बंधमुक्त होत गेले आणि अवकाशावर त्यांचे लक्ष अधिक केंद्रित होत गेले.

           गायतोंडे यांच्या चित्रांचा दुसरा टप्पा १९६० ते ७० या काळातला आहे. त्यांची चित्रशैली अमूर्त बनली ती याच काळात. फक्त रंग आणि आकारातून भावनेची उत्कटता व्यक्त करणारी ही चित्रे आहेत. त्यांना आता स्वत:चे आकार आणि रंग यांची संवेदना विकसित करायची होती. रंगांनी मानवी आकाराचा विषय रंगवणे हा खरा अडथळाच आहे असे ते म्हणत. म्हणून केवळ आकाराच्या संवेदनेसाठी गायतोंडे यांनी चित्राचा विषयच बदलला.

           साठच्या दशकातील चित्रांमध्ये पार्श्‍वभूमीला एखाद्या रंगाचा सपाट थर देऊन त्यावर निळ्या, पिवळ्या, तांबड्या आणि काळ्या रंगांचे आडवे फटकारे मारलेले दिसतात. त्यातून शहरी इमारतींचा भास व्हावा अशी रचना असते. यातील आकार आणि रंगांच्या प्रभावी वापरामुळे ‘आकृतिबंध असलेले स्ट्रक्चर पेंटिंग’ असे त्याचे वर्णन करता येईल. ऑलिव्ह, यलो ऑकर, ग्रे, निळा किंवा लाल अशा एका रंगाच्या पार्श्‍वभूमीवर इतर रंग अगदी मोजकेच येतात. त्या रंगांमधून तरंगणारे आकार सुटे सुटे वाटले तरी त्यांचे एकमेकांशी घट्ट नाते असते. इतके की, एखाद्या आकाराला जरी हलवले, तरी सारा डोलारा कोसळून पडेल.

           गायतोंडे यांच्या म्हणण्याप्रमाणे संगीत ऐकावे तसे ते रंग ‘ऐकतात’. त्यामागचे कोणतेही मानसशास्त्रीय कारण द्यायचे ते नाकारतात. रंगांची निवड ते सहजप्रवृत्तीवर सोडून देतात. पॉल क्लीने म्हटले आहे, की रंगांना स्वत:ची गुणात्मकता असते (क्वालिटी). दुसरे म्हणजे गडद आणि फिकट रंगछटांनी त्याला एक वजन प्राप्त होते (वेट). तिसरी गोष्ट म्हणजे रंग हा लांबी, रुंदी, खोलीची मापेही निश्‍चित करतो (मेजरमेंट). गायतोंडे यांच्या चित्रांमधील अवकाशात रंगांच्या या त्रिमितिपूर्ण वैशिष्ट्यांचा पुरेपूर प्रत्यय येतो.

           १९७० ते १९९५ पर्यंतचा कालखंड हा गायतोंडे यांच्या कलाप्रवासाचा तिसरा टप्पा आहे. या काळात गायतोंडे यांच्या चित्रांमध्ये चिन्हार्थाचा भास व्हावा असे आकार एकाच किंवा संवादी रंगांच्या सूक्ष्म रंगछटांसह पुनरावृत्त झालेले दिसतात. सुलेखन किंवा कॅलिग्रफीचे मूलतत्त्व त्यांच्या चित्रांमध्ये सुरुवातीपासूनच होते. त्याचाच विस्तार त्यांच्या अखेरच्या कालखंडात झालेला दिसतो. या बाबतीतही पॉल क्लीशी गायतोंडे यांचे साम्य आहे. क्लीच्या १९३७-३८ मधल्या चित्रांमध्ये भाषिक चिन्हांचा, चित्राचा मूलभूत घटक म्हणून वापर केलेला दिसतो.

           गायतोंडे यांनी १९९० च्या सुमारास काही लिपिसदृश आकार वापरून रेखाटने केली. गायतोंडे यांच्या चित्रांमधील आकार बहुतेक वेळा आडवे, क्षितिजसमांतर का असतात याबाबत त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे, की ‘कॅलिग्रफिक डिझाइन्स’मध्ये त्यांना अतिशय रस होता, त्याचा हा परिणाम असावा. ते म्हणतात, की प्रत्येक अक्षर हा एक विकसित आकार आहे आणि हे आकार विकसित करता येतात. त्यातले प्रत्येक अक्षर म्हणजे एक प्रतिध्वनी आहे. त्यात एक विशिष्ट तत्त्व आहे आणि विशिष्ट आकारही आहे. गायतोंडे यांच्या १९८० आणि १९९० च्या दशकातील चित्रांमध्ये रंग आणि असे आकार यांची एक नवी दृश्यभाषा पूर्णपणे विकसित झालेली दिसते.

           गायतोंडे यांची वृत्ती साधकाची होती आणि चित्रकला ही त्यांच्या दृष्टीने आध्यात्मिक साधना होती. तत्त्वज्ञानातील अनेक परंपरांचा त्यांनी जरी अभ्यास केला असला, तरी त्यांचे निर्मितिविश्‍व हे स्वायत्त विश्‍व आहे. तिथे अंतिमत: बाह्य संदर्भ, भाषिक, सांस्कृतिक असे सारेे तात्त्विक रूढ चिन्हार्थ गळून पडतात, उरते ती फक्त गायतोंडे यांची संवेदनशीलता. त्याच्याशी काही प्रमाणात एकरूप होता आले तरच त्यांच्या चित्रांचे मर्म कळेल.

           गायतोंडे यांच्या विविध मुलाखतींमधील त्यांचे निवडक विचार एकत्र केले तर आपल्याला त्यांच्याच शब्दांत त्यांचा जीवनाकडे/कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कळतो.

           ‘‘... मला अमूर्त अशी चित्राची व्याख्या करणं, वर्गीकरण करणं आवडत नाही. पेंटिंग म्हणजे पेंटिंग. जसं प्रत्येक जण माणूस आहे, मग तो हिंदू असो वा ख्रिश्‍चन. तसंच पेंटिंगला जात नसते, धर्म नसतो.’’

           ‘‘... प्रत्येक चित्रात एक बीज असतं. ते दुसर्‍या चित्रात उगवतं नि उलगडत जातं. चित्र हे एकाच कॅनव्हासपुरतं मर्यादित नसतं. मी माझ्या चित्रात माझ्या मूलतत्त्वाचा विस्तार करीत जातो. त्यामुळंच माझ्या चित्रात बदल होत राहतो. खरं म्हणजे पेंटिंग ही एकच गोष्ट नसते, तर ती अनेक गोष्टींची संरचना असते.’’

           ‘‘... माझं पेंटिंग हे एका व्यक्तीचं पेंटिंग नाही. तुम्ही जी भाषा बोलता ती लोकांनी हजारो वर्षं बोलून तयार केलेली आहे. तुम्ही जे ‘ज्ञान’ म्हणून बोलता ते हजारो/लाखो लोकांच्या अनुभवांवर आधारित असतं. हा एक प्रकारचा वारसा बीजातून आपल्यापर्यंत चालत आलेला असतो. त्यामुळं आपण जे कला म्हणून व्यक्त करत असतो, ते ह्या संपूर्ण मानव समाजाचं/ जातीचंच व्यक्त करणं असतं.’’ ते म्हणत की, ‘‘मी काही करत नाही. पेंटिंग माझ्याकडून घडून जातं.’’अमूर्त चित्रकलेची एक वेगळी व समृद्ध वाट शोधणार्‍या गायतोंडे यांचे निधन दिल्ली येथे झाले.

           - नितीन दादरावाला, दीपक घारे

गायतोंडे, वासुदेव सन्तू