Skip to main content
x

गडकरी, राम गणेश

गोविंदाग्रज

     राम गणेश गडकरी यांचा जन्म गणदेवी (ता. नवसारी) गुजरात येथे झाला. वास्तव्य व शिक्षण दामनगर (सौराष्ट्र), पुणे आणि कर्जत येथे झाले. १८९६-१८९७ या काळात ‘मित्रप्रिती’ (अनुपाठबंध) या नाटकाचे लेखन त्यांनी  केले. १९०४ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊन १९०५मध्ये पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयामध्ये  ते दाखल झाले. १९०६-१९०७ साली श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांशी त्यांची ओळख झाली व त्यांचा स्नेह वाढला. त्यांच्या नाटकाचा व विनोदी लेखनाचा गडकर्‍यांवर प्रभाव पडून गडकर्‍यांनी त्यांना गुरू मानले. १९०६ साली काही काळ त्यांनी किर्लोस्कर नाटक कंपनीच्या कर्मचार्‍यांचे मास्तर म्हणून काम केले. पुण्याच्या ज्ञानप्रकाशात उपसंपादक म्हणून काम पाहिले त्यानंतर पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये काही काळ ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. १९१०मध्ये नाटकातील पदे रचण्याच्या निमित्ताने किर्लोस्कर नाटक मंडळींशी पुन्हा संबंध आला. दरम्यानच्या काळात ‘गर्वनिर्वाण’ या पौराणिक नाटकाचे लेखन केले. रंगभूमीसाठी ‘सवाई नाटकी’ या टोपणनावाने लेखन केले. याच मासिकामधून ‘वेड्यांचा बाजार’ (अपूर्ण) हे नाटक प्रसिद्ध झाले. मासिक ‘मनोरंजन’मधून त्यांची ‘अल्लड प्रेमास’ ही पहिली कविता (१९०९) प्रसिद्ध झाली. त्यानंतर चरितार्थासाठी लेखन हाच व्यवसाय स्वीकारला. १९१३साली ‘तुतारी मंडळ’ची स्थापना. १९०९ ते १९१८ हा त्यांच्या काव्यलेखनाचा कालखंड म्हणता येईल. त्यांनी ‘गोविंदाग्रज’ या टोपण नावाने कविता-लेखन केले. विनोदी लेखनासाठी ‘बाळकराम’ हे नाव स्वीकारले.

     १९१०-१९११ या काळात गडकर्‍यांनी ‘प्रेमसंन्यास’ व ‘तोड ही माळ’ या नाटकांचे लेखन केले. १९१२ साली ‘प्रेमसंन्यास’ हे नाटक महाराष्ट्र नाटक मंडळी या सुप्रसिद्ध नाट्यसंस्थेने स्वीकारले. १९१२ साली रंगभूमीवर आले. त्यानंतर ‘पुण्यप्रभाव’ या नाटकाचा पहिला प्रयोग आणि प्रकाशन १९१६ झाले. ‘एकच प्याला’ या नाटकाचा प्रथम प्रयोग आणि प्रकाशन १९१९ मध्ये झाले. ‘राजसंन्यास’ (अपूर्ण) ह्या नाटकाचे प्रकाशन १९१९मध्ये झाले. ‘भावबंधन’ हे त्यांचे अखेरचे नाटक होय. ‘भावबंधन’ आणि ‘राजसंन्यास’ यांचे प्रयोग गडकर्‍यांच्या मृत्यूनंतर १९२० साली झाले.

     १९०९-१९१८ या काळात गडकर्‍यांनी ‘गोविंदाग्रज’ या टोपणनावाने काव्यलेखन केले. सुमारे १५०-१६० कविता त्यांनी लिहिल्या. ‘वाग्वैजयंती’ हा त्यांचा काव्यसंग्रह त्यांच्या निधनानंतर १९२१ मध्ये प्रसिद्ध झाला. गोविंदाग्रजांनी केशवसुतांना काव्यगुरू मानले होते. केशवसुतांच्या ‘तुतारी’, ‘हरपले श्रेय’ या बंडखोर आशय मांडणार्‍या कवितांचा तसेच गूढगुंजनपर कवितांचा प्रभाव गोविंदाग्रजांवर होता. गोविंदाग्रजांनी अनेक विषयांवर कविता केल्या. काव्य, निसर्ग, प्रेम, गूढगुंजन, विनोद, समाज इत्यादी अनेक विषयांवर कविता केल्या. परंतु खर्‍या अर्थाने त्यांच्यातील कवीचे दर्शन प्रेमकविता, त्यातही पुन्हा विफल प्रेमकवितांमधून घडते.

सामाजिक  आशय-

     रसिकांचा अनुनय करण्यासाठी शब्द आणि प्रास यांची जुळणी करणे म्हणजे काव्य नव्हे. अर्थावाचून आलेले शब्द म्हणजे केवळ शृंगारलेल्या प्रेताप्रमाणे आहेत. ‘काव्य कराया जित्या जिवाचे जातिवंत करणेच हवे’ ही गोविंदाग्रजांची काव्यदृष्टी आहे. उत्कट भावनांचा आविष्कार, उत्तुंग कल्पनाशक्ती, कल्पनाचमत्कृती, असामान्य शब्दशक्ती  ही गोविंदाग्रजांच्या कवितेची सामर्थ्य स्थळे आहेत.

     ‘दसरा’, ‘स्मशानातले गाणे’, ‘घुबडास’ या कवितांमधून गोविंदाग्रजांनी सामाजिक आशय मांडला. ‘दसरा’ या कवितेच्या प्रारंभी “हे गाणे केशवसुतांच्या ‘तुतारी’चे वेडेवाकडे रूप आहे. सुधारणा पाहिजे या म्हणण्यापलीकडे या गाण्यात काहीच राम नाही” अशी प्रांजळ कबुली गोविंदाग्रजांनी दिलेली आहे. शिणलेल्या रसिकांची मने पुन्हा ताजी करणारी गोविंदाग्रजांची रसवंती सामाजिक आशय केवळ विचारांच्या व बुद्धीच्या पातळीवर स्वीकारते. त्यामुळे उत्कटतेचा स्पर्श सामाजिक कवितांना होत नाही. परिणामी या कविता कल्पनाविलास करणार्‍या, पाल्हाळीक, निर्जीव होतात.

     ‘चिन्तातुर जन्तू’, ‘विहिणींचा कलकलाट’, ‘एक समस्या’, ‘काय करावे’? या त्यांच्या विनोदी कविता होत. उपहास व विडंबन हे विनोदाचे दोन विशेष या कवितांमधून व्यक्त झालेले आहेत. ‘अचरटपणापलीकडे या काव्यांची फारशी किंमत नाही’ असे मार्मिक मत गोविंदाग्रजांनी स्वतःच मांडले आहे. अतिशयोक्ती, उपहास ही त्यांच्या विनोदी लेखनाची वैशिष्ट्ये या कवितांमध्येही दिसतात. परंतु कल्पनाशक्तीचे संस्कार विनोदी कवितांवर झालेले दिसत नाहीत.

     केशवसुतांच्या प्रभावामुळे गोविंदाग्रजांनी गूढगुंजनपर कविताही लिहिल्या. ‘फुटकी तपेली’, ‘घुबडास’, कलगीचे गाणे’ या महत्त्वाच्या गूढगुंजनपर कविता. आध्यात्मिक आशय, आत्मानुभूतीखेरीज मांडल्यामुळे या कविता केवळ शब्दांच्या, रचनेच्या पातळीवर उतरल्या आहेत. अध्यात्म व तत्त्वज्ञान हे विषय कवी गोविंदाग्रजांच्या प्रतिभेला मानवणारे नव्हेत, असे या कवितांमधून जाणवते.

प्रेम कविता-

     ‘प्रेमशोधन’ आणि ‘विफलप्रेम’ या दोन विषयांवर गोविंदाग्रजांनी लिहिलेल्या कविता वैशिष्ट्यपूर्ण आहेत. प्रेमभावनेतील आर्तता, उत्कटता, आकर्षण, दारुण निराशा, तन्मयता, निरपेक्ष प्रेमभावना अशा अनेक भावच्छटा त्यांच्या कवितांमधून व्यक्त झालेल्या दिसतात. ‘गुलाबी कोडे’, ‘पहिले चुंबन’ या कवितांमधून शारीर आकर्षण व्यक्त होते. परंतु हा अनुभव काल्पनिक पातळीवर असल्यामुळे त्यात हृदयस्पर्शाचा अनुभव व्यक्त होत नाही. ‘फुले वेचली पण?’ या कवितेत फुले वेचली पण ती कुणाला द्यावी? या प्रश्नातून अंतरंगातले खोलवर झालेले दुःख कवीने व्यक्त केले आहे. ‘जगावाचूनी लाभतीस तरी जग मी केले असते। तुझ्यावाचुनी जग हे आता असून झाले नसते।’ अशी दारुण प्रेमव्यथा गोविंदाग्रजांनी व्यक्त केली आहे. ‘निर्दय बालेस’ या कवितेत कवीचे हृदय तुडवून निघून गेलेल्या निर्दय बालेस बोल लावणे, अंतःकरणातील आशानिराशेचा हिंदोळा ही वैशिष्ट्ये जाणवतात. ही कविता वाचल्यानंतर उत्कटता हाच त्यांच्या वृत्तीचा सहजधर्म असल्यामुळे तिचे दुसरे टोक म्हणजे दुबळेपण आणि पराकोटीचे आत्मप्रेम गोविंदाग्रजांच्या प्रेमकवितेत व्यक्त झाले आहे, असे वाटते.

     याशिवाय ‘कृष्णाकाठी कुंडल’, ‘पानपताचा फटका’ या दीर्घ कविता त्यांनी लिहिल्या. या दोन्ही कवितांना ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. त्यामागे स्मरणरंजनाची प्रेरणा असल्याचे जाणवते. काही नाट्यगीतांची रचनाही गोविंदाग्रजांनी केली. परंतु त्यांच्या हृदयाची आंतरिक हाक त्यांच्या प्रेमकवितांमधून व्यक्त झाली.

नाटककार-

     नाटककार गडकर्‍यांनी श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांना गुरू मानले होते. परंतु कोल्हटकरांच्या नाटकांना यश अतिशय कमी प्रमाणात लाभले. गडकर्‍यांच्या व्यक्तिमत्त्वातील विनोदी लेखक, त्यांच्यातील कवी या दोन पैलूंना कवेत घेऊन, नाटककार गडकर्‍यांची घडण झालेली दिसते.

     नाटकाचे प्रयोग डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी लेखन केले नाही. नाटककारामधील लेखकाचे अंग, कल्पनाशक्तीचा विलास या दोन घटकांना त्यांनी नाट्यलेखनामध्ये महत्त्व दिल्याचे जाणवते. त्यांच्या नाटकांमध्ये दृश्यापेक्षा शब्दांना अधिक महत्त्व दिलेले दिसते. त्यांची नाटके लांबलचक, पल्लेदार आहेत. ‘पुण्यप्रभाव’ या नाटकामधून त्यांनी पतिव्रतेची पुण्याई मांडली. ‘राजसंन्यास’ या नाटकामध्ये संभाजीचा नुसता पराक्रम दाखवायचा नव्हता. संभाजीचे रोमॅन्टिक प्रेम त्यांनी ‘राजसंन्यास’मध्ये दाखवले. ‘वेड्यांच्या बाजार’ हे त्यांनी लिहिलेले शुद्ध प्रहसन (फार्स) होय. प्र.के.अत्र्यांचे ‘साष्टांग नमस्कार’ हे नाटक वाचताना गडकर्‍यांचे ‘वेड्यांचा बाजार’ हे नाटक आठवते. प्र. के. अत्र्यांनी गडकर्‍यांना गुरुस्थानी मानले होते.

     ‘प्रेमसंन्यास’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’ ही नाटके लिहिताना त्यांच्यासमोर आपल्या काळातले सामाजिक प्रश्न होते. नाटक वाचताना तसे जाणवते. परंतु माणसांची जुळणारी-तुटणारी नाती व त्यांतले नाट्य गडकर्‍यांना नाटकामधून मांडावेसे वाटले. ‘एकच प्याला’ या नाटकामध्ये कर्तबगार, स्वाभिमानी माणसाची शोकांतिका त्यांना दाखवायची होती. या नाटकातला ‘तळीराम’ आणि त्याचे विनोद विशेष गाजले.

भावबंधन-

     ‘भावबंधन’ हे गडकर्‍यांचे अखेरचे नाटक. त्यांनी हे नाटक मृत्युशय्येवर असताना पूर्ण केले. एका खलनायकाच्या तावडीत एक म्हातारा सापडला तर काय होईल, या कल्पनेभोवती वरवर पाहता विनोदाच्या अंगाने जाणारी शोकांतिका गडकर्‍यांनी लिहिली. या नाटकातील घनश्याम हा गडकर्‍यांनी उभा केलेला शेवटचा खलनायक होय. गडकर्‍यांच्या एकूण नाटकांतील खलनायकांचे चित्रण अतिशय भडक, एकांगी खलनायक, खलनायकाचा ‘माणूस’ म्हणून विचार आणि अतिशय शांत डोक्याने आपल्याला जे करायचे आहे, ते करणारा खलनायक अशा दृष्टीकोनांतून झालेले दिसते.

     ‘भावबंधन’ मध्ये हिणकस प्रेम, अनुकरण करणारे खोटे प्रेम, प्रेमातले वैयक्तिक सुख-दुःख, प्रेमाविषयीची गौरवभावना या सार्‍या भावच्छटा ओलांडून तटस्थ मानवी जीवनाचे निरीक्षण करणारा माणूस त्यांनी दाखवला. म्हणूनच या नाटकाला केवळ सुखांतिका किंवा केवळ शोकांतिका असे म्हणता येत नाही; या दोन्हींची संमिश्र जाणीव या नाटकातून होते. सुख-दुःखाची संमिश्रता हेच खर्‍या जगण्याचे सार असल्याचे नाटकामधून व्यक्त होते. नाटककार गडकर्‍यांच्या नाटकामध्ये कृत्रिम विनोद, वेषांतरासारख्या क्लृप्त्यांचा उपयोग, विडंबनाचा अतिरेक असे काही दोषही आढळतात. परंतु नाटककार गडकर्‍यांचे लेखन विकसनशील होते, हेही लक्षात घेतले पाहिजे.

     ‘बाळकराम’ या टोपणनावाने त्यांनी केलेले विनोदी लेखन मासिक मनोरंजनातून १९१३-१९१५ ह्या काळात छापून आले; पुढे ते ‘रिकामपणाची कामगिरी’ (१९२१) या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. १९२५ साली त्यांचे समग्र विनोदी लेखन ‘संपूर्ण बाळकराम’ मध्ये संग्रहित झाले. अतिशयोक्ती, उपहास, शाब्दिक कोटी, शब्दविपर्यय, विरोधाभासातून होणारा अपेक्षाभंग; अतिशय गंभीर, प्रौढ व भारदस्त भाषाशैलीद्वारे साधलेला विनोद, ही त्यांच्या विनोदी लेखनाची वैशिष्ट्ये होती. ‘वधूपरीक्षा’, ‘लग्नाच्या मोहिमेची पूर्व तयारी’, ‘ठकीचं लग्न’ असे विषय घेऊन समाजातील मागासलेल्या रूढी-परंपरा, बुरसटलेले समाजमन, लग्न जमविणे या प्रकारामध्ये होणारे माणसांच्या स्वभावाचे दर्शन यांवर त्यांनी विनोदी लेखन केले. त्यांचे अप्रकाशित राहिलेले साहित्य ‘अप्रकाशित गडकरी’ या नावाने १९६२ साली प्रसिद्ध झाले.

- प्रा. रूपाली शिंदे

गडकरी, राम गणेश