गिंडे, कृष्णराव गुंडोपंत
गायक, संगीतज्ञ
कृष्णराव गुंडोपंत गिंडे यांचा जन्म कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात बैलहोंगल या गावी, मध्यमवर्गीय संगीत व नाटकप्रेमी कुटुंबात झाला. गिंडे कुटुंबातील ते आठवे अपत्य होते. त्यांना चार भाऊ व तीन बहिणी होत्या. त्यांचे आजोबा रामचंद्र हे पोस्टमास्तर होते. वडील गुंडोपंत वैद्यकशास्त्रातील एल.सी.पी.एस. पदवी घेतलेले डॉक्टर होते. गिंडे कुटुंब हे श्रीरामभक्त असल्यामुळे त्यांच्या घरी परंपरेने नियमित दर गुरुवारी भजन-कीर्तनाचा कार्यक्रम होत असे. साहजिकच त्यांच्यावर जन्मापासून संगीताचे संस्कार होत गेले. त्यांचे सर्वांत वडीलबंधू रामचंद्र दिलरुबा वाजवीत असत व त्यांचे बालपणीचे समानशील मित्र म्हणजे कुमार गंधर्व हे होते.
कृष्णराव गिंड्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण कन्नड भाषेतून बैलहोंगल व बेळगाव येथे झाले. पुढे मराठी चौथी व इंग्रजी पहिलीचे शिक्षण गदग येथे, त्यांच्या काकांच्या घरी झाले. कृष्णरावांना वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षी बालगंधर्वांची बहुतेक नाट्यगीते पाठ होती. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी अडीच तासांचा नाट्यगीतांचा पहिला कार्यक्रम केला होता.
रामभाऊ गिंडे कृष्णाला अण्णासाहेब रातंजनकर यांच्याकडे घेऊन गेले. त्यांनी कृष्ण गिंडे यांची कसून योग्य चाचणी घेतली व त्याला शिकविण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे ते त्याला जुलै १९३६ मध्ये आपल्याबरोबर लखनौ येथे घेऊन गेले. लखनौ येथे गुरूंच्या सान्निध्यात राहून गुरु-शिष्य परंपरेनुसार संगीताचे शिक्षण चालू असताना तेेथीलच ‘सेंटिनल हायस्कूल’मध्ये त्यांचे उच्च-माध्यमिक शालेय शिक्षणही चालू होते. ते १९४२ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व त्याच वर्षी ‘संगीत विशारद’ ही परीक्षाही ते भातखंडे संगीत महाविद्यालयातून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. पुढे लखनौ येथे ख्रिश्चन महाविद्यालयामधून इंटरमीजिएटची परीक्षा उत्तीर्ण झाले, त्याचबरोबर त्यांनी संगीत निपुण (एम.म्युज., मास्टर इन म्यूझिक) या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन सुवर्णपदक मिळवले.
त्या वेळेस मॉरिस महाविद्यालयामध्ये गुरुवर्य अण्णासाहेबांचे ज्येष्ठ शिष्य एस.सी.आर. भट यांचे कृष्णरावांना मार्गदर्शन मिळाले. भटसाहेबांनी त्यांच्याकडून उत्तम शिस्तबद्ध रियाज करून घेतला व प्रत्येक बंदिश रागांग, तालांग व काव्यांगाच्या दृष्टिकोनातून सौंदर्यात्मक सादरीकरण करण्यासाठी घोटून घेतल्या. गिंडे यांचा संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन गंभीर बनविण्यास भटसाहेब कारणीभूत होते.
लखनौ येथील वास्तव्यात अण्णासाहेबांच्या तालमीव्यतिरिक्त पं. गोविंद नारायण नातू (पं. राजाभैय्या पूछवाले यांचे पट्टशिष्य) यांचेही मोलाचे मार्गदर्शन कृष्णराव गिंडे यांना मिळाले. ते १२ ऑगस्ट १९५१ रोजी आपले संगीताचे शिक्षण पूर्ण करून मुंबईला परत आले. मुंबई येथे १९४६ मध्ये डॉ. के.एम. मुन्शी यांनी आचार्य रातंजनकरांच्या विनंतीनुसार त्यांच्याच मदतीने भारतीय विद्या भवनमध्ये संगीत शिक्षापीठाची स्थापना केली. कृष्णराव गिंडे यांनी तिथे अध्यापनाचे कार्य केले. त्यांचा ५ मे १९५४ रोजी विवाह झाला.
मुंबईत अंधेरी येथे १९५८-५९ च्या सुमारास ‘ज्ञानाश्रम’ या नावाची एक मिशनरी शैक्षणिक संस्था स्थापन झाली होती. त्याचेे प्राचार्य ‘फादर प्रॉक्ष’ यांना भारतीय संगीताची आवड होती व त्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकताही होती. तसेच शाळेतील संगीताचे वर्ग घेण्याकरिता आणि त्यासंबंधी कार्यशाळा चालविण्याकरिता संगीत क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची आवश्यकता होती. पं. रातंजनकरांनी फादर प्रॉक्ष यांना आपले शिष्य गिंडे यांचे नाव सुचविले. त्यानंतर गिंडे अंधेरी येथील मिशनरी शाळेत संगीताचे वर्ग घेऊ लागले आणि त्या निमित्ताने फादर प्रॉक्ष व गिंडे यांचे घनिष्ठ संबंध जुळले. फादर प्रॉक्ष यांच्या आग्रहपूर्वक आमंत्रणावरून १९६० मध्ये जागतिक युकॅरिस्टिक काँग्रेसच्या सोहळ्यात भाग घेण्यासाठी त्यांनी पश्चिम जर्मनी, इटली व रोमला भेट दिली. त्या कार्यक्रमाकरिता गिंडे यांनी हिंदुस्थानी राग-संगीतावर आधारित बायबलमधील कथांवर समूह-नृत्यगीतांच्या रचना केल्या व त्या प्रयोगांची जर्मन आणि रोम या देशांमध्ये खूप प्रशंसा झाली व त्या निमित्ताने रोममध्ये ख्रिस्ती धर्मगुरू ‘पोप जॉन पॉल टू’ (दुसरे) व ‘कार्डिनल गे्रशस’ यांची भेट झाली. त्यांच्या समक्ष आणि जर्मनीतील युकॅरिस्टिक काँग्रेसच्या सोहळ्यात नृत्यनाट्यांचे प्रस्तुतीकरण झाले. रोममध्ये पोपने गिंड्यांच्या उत्कृष्ट सांगीतिक कार्यक्रमाबद्दल पदक देऊन त्यांचा विशेष सन्मान केला. भारतात परत आल्यावर त्यांनी भारतीय विद्या भवनमध्ये अध्यापकाचे कार्य पुढे चालू ठेवले, तसेच फादर प्रॉक्ष यांच्या ‘ज्ञानाश्रम’मध्येही त्यांनी संगीताचे वर्ग घेतले.
गिंडे यांनी जून १९६१ मध्ये श्रीवल्लभ संगीतालयाच्या प्राचार्यपदाची जबाबदारी स्वीकारली. अतिशय निष्ठेने, आत्मीयतेने, निःस्वार्थ बुद्धीने सांगीतिक व शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने १९९२ पर्यंत उल्लेखनीय कामगिरी करून त्यांनी विद्यालयाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली. त्या मोलाच्या योगदानात त्यांचे वडील, गुरुबंधू पं. एस.सी.आर. भट यांचेही तेवढेच परिश्रम होते. गिंडे व भट यांच्या अतुलनीय परिश्रमाबद्दल १९७२ मध्ये श्रीवल्लभ संगीतालयाने त्यांना ‘डॉक्टरेट’च्या उपाधीने अलंकृत केले.
पं. वि.ना. भातखंडे यांच्या गायनपद्धतीचा व परंपरेचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने गिंडे यांनी अण्णासाहेब रातंजनकरांप्रमाणेच निःस्वार्थ, निरपेक्ष बुद्धीने, अनेक विद्यार्थ्यांना विद्यादान केले. त्यात इंदूधर निरोडी, सुधींद्र भौमिक, मीरा भागवत, सुनिती गंगोळी, लीला कुळकर्णी-नरवणे, स्वामी चैतन्यस्वरूपदास, यशवंत महाले, त्याचप्रमाणे प्रसिद्ध गायक कलाकार डॉ. सुमती मुटाटकर, पं. सी.आर. व्यास, पं. जितेंद्र अभिषेकी, डॉ. प्रभा अत्रे व शुभ्रा गुहा आणि इतर अनेक गायकांना पं. गिंडे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे प्रत्येकाला स्वतंत्र मार्गदर्शन केलेे. त्यांच्या आयुष्यातील शेवटची पाच वर्षे त्यांनी अभ्यागत प्राध्यापक म्हणून कोलकाता येथील संगीत रिसर्च अकादमी येथे नियमित विद्यादानाचे कार्य केले.
त्याव्यतिरिक्त संगीताच्या शैक्षणिक क्षेत्रात भारतातील जवळजवळ सर्व महत्त्वपूर्ण महाविद्यालयांचे प्रात्यक्षिके व शास्त्रीय विषयांचे परीक्षक या नात्याने त्यांनी अनेक वर्षे काम केले, तसेच महाविद्यालयांच्या सांगीतिक अभ्यासक्रमाच्या आखणीसाठी व सल्लागार समितींसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. गिंडे यांनी अनेक संगीत संस्थांतून आणि चर्चासत्रांमध्ये संगीतातील विभिन्न प्रात्यक्षिके व शास्त्रीय विषयांवर तीनशेहून अधिक सप्रयोग व्याख्याने दिली. त्याचबरोबर अनेक महत्त्वपूर्ण संगीत नियतकालिकांमधून कार्यक्षेत्रातील आपले अनुभव व विचार हिंदी व इंग्लिश भाषांमधून लिहिले आहेत. त्यांनी ‘सुजन-सुत’ या टोपणनावाने धृपद-धमार, ख्याल व तराणे रचले आहेत.
बंदिशींच्या स्मरणशक्तिसंग्रहाबद्दल पं. गिंडे यांना चालता-बोलता ‘ज्ञानकोश’ म्हटले जाते. त्यांना दोन हजारांपेक्षा अधिक बंदिशी मुखोद्गत होत्या. त्यांत विभिन्न रागांतील अनेक विलंबित, द्रुत ख्याल, धृपदे, धमार, ठुमर्या, टप्पे, तराणे, चतुरंग, अष्टपदी, झूले इत्यादींचा समावेश होता. कृष्णराव गिंडे यांना अनेक प्रचलित व अप्रचलित रागांतील निरनिराळ्या घराण्यांच्या, शैलींच्या व निरनिराळ्या अंगांच्या बंदिशींचे कण-स्वरांसकट संपूर्ण स्थायी, अंतरे पाठ होते.
पं. गिंडेजींचे अक्षर म्हणजे मोत्याचा दाणा ही उपमाही कदाचित कमी वाटेल. त्यांनी गुरुवर्य अण्णासाहेब रातंजनकरांच्या ८०० बंदिशी एकाच वळणाच्या अक्षरांत लिहिल्या आहेत.
संगीत क्षेत्रातील निःस्वार्थ सेवा व उल्लेखनीय योगदानासाठी १९८८ मध्ये त्यांना ‘जायंट इंटरनॅशनल’चा पुरस्कार देण्यात आला व १९९० मध्ये ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार व ‘महाराष्ट्र राज्य गौरव’ पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.
त्यांचे कोलकाता येथील संगीत रिसर्च अकादमीमध्ये निधन झाले.
— यशवंत महाले