Skip to main content
x

गजेंद्रगडकर, अश्वथामा बाळाचार्य

      संस्कृतचे गाढे अभ्यासक, काव्यशास्त्र, नाट्यवाङ्मय, तत्त्वज्ञान इ. विविध विषयांवरील ग्रंथांचे अभ्यासपूर्ण लेखन करणारे लेखक. संस्कृत विभाग, एल्फिन्स्टन महाविद्यालय मुंबई, येथे प्राध्यापक  म्हणून ते कार्यरत होते. मुंबई मराठी साहित्य संघ, चर्नी रोड, मुंबई हा साहित्य संघ २१ जुलै १९३५ रोजी स्थापन झाला. त्यामध्ये अ. बा. गजेंद्रगडकरांच्या अध्यक्षतेखाली सेंट्रल साहित्यिक संस्था सुरू झाली.

     कालिदास इ. कवींच्या काव्यकृतींमधून मिळणारे ज्ञान अनंत काळापर्यंत टिकणारे आहे. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनशैलीने ते संस्कृत साहित्याच्या अत्युच्च शिखरावर आहेत. गजेंद्रगडकरांच्या साहित्याचा थोडक्यात सारांश सांगणे कठीण काम आहे. परंतु सामान्य अभ्यासकांच्या सोयीसाठी त्यांच्या या कार्याविषयी ही माहिती. गजेंद्रगडकर यांनी ‘अभिज्ञानशाकुंतलम्’ ह्या कालिदासांच्या नाट्यकृतीचा सटीप इंग्रजी अनुवाद केला. अभिज्ञानशाकुंतलावरील विविध विचारपैलूंचे दर्शन घडवले. विसाव्या शतकातील अ.ब. गजेंद्रगडकरांनी भारतीयांनाच नव्हे, तर पाश्चात्त्यांनाही भुरळ पाडणार्‍या अभिज्ञानशाकुंतलमचे जे नूतनीकरण केले, ते विद्यार्थ्यांना व संशोधकांना निश्चितच उपयोगी ठरेल.

     १४-१५व्या शतकातील लौगाक्षी भास्कराचा अर्थसंग्रह हा पूर्वमीमांसेवरील प्रकरण ग्रंथ आहे. आर. डी. करमरकर व प्रा. गजेंद्रगडकर यांनी या संस्कृत ग्रंथाचे स्पष्टीकरणात्मक भाषांतर केले. याचे वैशिष्ट्य म्हणजे जणू हा पूर्वमीमांसेचा कोशच. त्याला ‘पूर्वमीमांसासार्थसंग्रह’ असेही नाव आढळते.

     भासविरचित ‘स्वप्नवासवदत्तम’ ह्या संस्कृत नाटकाचे इंग्रजी भाषांतर व स्पष्टीकरणात्मक टीपा, तसेच ‘वेणीसंहार : चिकित्सक अध्ययन ह्यामध्ये गजेंद्रगडकरांनी वेणीसंहारातील अनेक विषयांचे, संदर्भांचे चिकित्सक अध्ययन व ‘हर्षचरित’ या महाकाव्याचे इंग्रजी भाषांतर व संदर्भयुक्त टीपा ग्रंथाचे आणि काव्यशास्त्रातील मम्मटांचे ‘काव्यप्रकाश’ या ग्रंथातील १,२,३,१० उल्लास, यांचे मराठी भाषांतर केले.

     अ.बा. गजेंद्रगडकरांच्या भाषांतरित व संपादित साहित्यामुळे मराठी व संस्कृत, तसेच इंग्रजी साहित्याचे दालन अतिशय समृद्ध झाले. उपरोक्त तिन्ही भाषिक वर्गातील साहित्यिकांना, विद्यार्थिवर्गाला व संशोधकांना त्यांचे हे साहित्य निश्चितच मार्गदर्शक आहे.

     त्यांच्या लिखित साहित्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला असता त्यांच्या विद्वत्तेची खोली कळते.

     १)  अभिज्ञानशाकुंतलम् (सटीप इंग्रजी भाषांतरासहित) १९२०, २) अर्थसंग्रह - लौगाक्षी भास्कर (आर.डी. करमरकर व अ.बा. गजेंद्रगडकर) १९८४, ३) काव्यप्रकाश - मम्मट (१,२,३ व १०वा उल्लास) १९७०, ४) तर्कसंग्रह - अन्नंभट्ट (आर.डी. करमरकर व अ.बा. गजेंद्रगडकर) १९३०, ५) तर्कभाषा - केशवमिश्र (आर.डी. करमरकर व अ.बा. गजेंद्रगडकर) १९३४, ६) दशकुमारचरित - दंडी (पूर्वपीठिका व १-२ उच्छवास) (स.द. गजेंद्रगडकर व अ.बा. गजेंद्रगडकर) १९२०, ७) भट्टनारायणकृत वेणीसंहार : चिकित्सक अध्ययन १९३३, ८) बाण हर्षचरित - उच्छवास १-७ (स.द. गजेंद्रगडकर व अ.बा. गजेंद्रगडकर), ९) स्वप्नवासवदत्तम् (भास) १९३८, १०) फर्स्ट इयर संस्कृत पोएटिक सिलेक्शन नं. १ (आर.डी. करमरकर व अ.बा. गजेंद्रगडकर) १९२८, ११) इंटरमिडिएट संस्कृत सिलेक्शन नं. २ (संपादन व संपूर्ण भाषांतर इंग्रजी प्रस्तावनेसह), १२) अ‍ॅनल्स ऑफ द भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट खंड १४ (१९३२-१९३३) संपादक - डी.आर. भांडारकर व अ.ब. गजेंद्रगडकर.

सुचित्रा ताजणे

गजेंद्रगडकर, अश्वथामा बाळाचार्य