Skip to main content
x

गोडबोले, अरुण दत्तात्रेय

          रुण दत्तात्रेय गोडबोले यांचा जन्म मध्य प्रदेशातील जबलपूर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते. त्यांचे प्रारंभिक शिक्षण जबलपूर येथील महाराष्ट्र हायस्कूलमध्ये झाले. नंतर तेथीलच पशुवैद्यकीय महाविद्यालयात १९५३मध्ये बी.व्ही.एस. ही पदवी घेऊन ते पशुवैद्य झाले. सुरुवातीला एक वर्ष पशुवैद्यकीय महाविद्यालयात व नंतर त्या काळच्या पूर्व मध्य प्रदेशातील छत्तीसगड विभागात व नंतर जबलपूरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी नोकरी केली. भाषावार प्रांतरचनेमध्ये नोव्हेंबर १९५६मध्ये मुंबई राज्यातील भंडारा जिल्ह्यातील तिरोडा नॅशनल एक्स्टेंशन सर्व्हिस ब्लॉकमध्ये पशुसंवर्धन विस्तार अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. यानंतर वर्धा, नागपूर व अमरावती जिल्ह्यांतील पोहरामधील मेंढी प्रक्षेेत्र अशा ठिकाणी त्यांनी काम केले. त्यानंतर पशुसंवर्धन खात्यातर्फे आय.ए.एस.आय.आर. येथे शेती व पशुवैद्यक सांख्यिकी कनिष्ठ व वरिष्ठ अभ्यासक्रम पूर्ण करून १९६३मध्ये ते पोहरा येथील मेंढी प्रक्षेत्रावर रुजू झाले. त्यांनी सांख्यिकी कार्याव्यतिरिक्त खात्याच्या व्हिलेज सेंटर व सघन पशुविकास प्रकल्पामध्ये प्रायोगिक तत्त्वावर शास्त्रोक्त पद्धतीवर आधारित दुधाच्या पद्धतशीर तपशील नोंदणीच्या कार्यास सुरुवात केली व योजनांच्या कार्यक्षेत्रात उत्पादित दुधाचा अंदाज वर्तवणे सुरू केले आणि पशुपालनाविषयी माहिती जमा केली. त्यांनी १९६७-१९६८च्या सुमारास एकात्मिक पाहणी योजना आराखडा तयार करून खात्यातर्फे शासनास मंजुरीसाठी सादर केला. या योजनेचा उद्देश प्रतिवर्षी दूध, अंडी, लोकर व मांस उत्पादनाचा अंदाज देऊन गाय, म्हैस, शेळ्या आणि मेंढ्या पालनाविषयी माहिती घेणे व प्रसिद्ध करणेे हा होता. या आराखड्याला १९६९मध्ये शासनाची मंजुरी प्राप्त झाली आणि योजना १९७०मध्ये सुरू झाली. या योजनेबरोबरच गोडबोले यांच्या ‘सिद्ध वळू योजने’स १९८२मध्ये महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली. या योजनेनुसार कृत्रिम रेतनाची सुरुवात झाली. या योजनेचा उद्देश गाईच्या कृत्रिम रेतनासाठी वापरण्यात येत असलेल्या वळूंना त्यांच्या वारसांनी दिलेल्या पहिल्या वेतातील  दुधाच्या आधारे सिद्ध करणे व सिद्ध वळूचा कृत्रिम रेतनासाठी वापर करून उच्च वंशाच्या दुधाळ कालवडीची निर्मिती करून दुग्धोत्पादनात वाढ करणे हा होता. कृत्रिम रेतन केल्यापासून वळू सिद्ध होण्यास ७-८ वर्षांचा कालावधी लागतो. मध्यंतरीच्या काळात गोडबोले यांना १९७७मध्ये उपसंचालक व १९८८मध्ये सहसंचालक म्हणून पदोन्नती मिळाली, १९९०मध्ये सेवानिवृत्त झाले.

          ‘एकात्मिक पाहणी योजना’ आणि ‘सिद्ध वळू योजना’ या दोन्ही योजनांवर निवृत्तीनंतरही ते लक्ष ठेवून होते. यापैकी सिद्ध वळू योजनेत ३ वळूंचे संच सिद्ध झाले. या कार्यक्रमांतर्गत ३८ वळूंपैकी पहिल्या संचात १० (जर्सी), दुसर्‍या संचात २ (जर्सी), तिसर्‍या संचात १ (संकरित) वळू सिद्ध झाले. 

- मानसी श्रेयस बडवे

गोडबोले, अरुण दत्तात्रेय