Skip to main content
x

गोडबोले, अविनाश

               दृक्संवादकला आणि अभिजात चित्रकला या दोन्ही क्षेत्रांत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैलीची वेगळी ओळख निर्माण करणारे अविनाश गोडबोले यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांनी १९६५ मध्ये सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमधून उपयोजित कलेतील पदविका प्रथम वर्गात, प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन प्राप्त केली. त्यांनी त्याच संस्थेत १९६६ ते १९७० या काळात  अधिव्याख्याता म्हणून काम केले. त्यांनी १९७० ते १९९१ या काळात एम.सी.एम.’, ‘त्रिकाया’, ‘एच.टी.ए.’, ‘रिडिफ्युजनअशा प्रसिद्ध जाहिरात-संस्थांमधून व्हिज्युअलायझर, आर्ट डायरेक्टर अशा महत्त्वाच्या  पदांवर काम केले.

जाहिरातींच्या संकल्पनाव्यतिरिक्त, दिनदर्शिकांसाठी चित्रे, इलस्ट्रेशन्स अथवा कथाचित्रे, व्ही. शांताराम यांच्यासाठी नेपथ्यरचना (सेट डिझाइन) अशी विविध प्रकारची कामे त्यांनी केलेली आहेत. टाइम्स ऑफ इंडिया’, ‘इण्डिपेन्डन्ट’, ‘डेबोनेरअशा वृत्तपत्रे-नियतकालिकांसाठी, तसेच अश्विन मेहता यांनी तयार केलेल्या कामसूत्रावरील सीडी रॉमसाठी गोडबोले यांनी संगणकीय माध्यमाला साजेशी अशी चित्रे काढली आहेत. एच.एम.टी. या भारत सरकारच्या उद्योग-समूहासाठी त्यांनी धातूमध्ये भित्तिचित्रे अथवा म्यूरल्स तयार केली आहेत. त्यांनी एअर इंडियाच्या विमानांच्या अंतर्गत सजावटीचे संकल्पन व मांडणीही केली आहे.

गोडबोले यांनी १९७७ मध्ये एअर इंडियासाठी केलेली भित्तिपत्रके (पोस्टर्स) वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांत इलस्ट्रेटर म्हणून असलेले त्यांचे कौशल्य आणि अभिजात चित्रकाराची प्रतिमांची भाषा यांचा मिलाफ झालेला आहे. एकीकडे एस.व्ही. वाघुळकरांपासून चालत आलेली एअर इंडियाच्या पोस्टर्सची परंपरा सांभाळत स्वतःचे वेगळेपण दाखवणारी अशी ही भारतीय संगीतातल्या रागमालेवरची चित्रे आहेत. राग-रागिण्यांच्या भावरूपांप्रमाणे महाराजा निरनिराळी वाद्ये वाजवताना दिसतो. मेघ-मल्हारवरील चित्रात तो ढोलक वाजवताना दाखवला आहे, तर वसंत रागिणीसाठी तो बासरी वाजवताना दाखवला आहे. लघुचित्रशैलीतील रागमाला चित्रांमधली प्रतिमासृष्टी, महाराजासारखे व्यावसायिक क्षेत्रातले बोधचिन्ह आणि चित्रांमधली नर्मविनोदी, आल्हाद देणारी चित्रशैली यांचा योग्य तो मेळ घातल्यामुळे या पोस्टर्सनाही अभिजाततेचा स्पर्श झालेला आहे.

गोडबोले यांनी जाहिरात क्षेत्रात सातत्याने काम केले, पण त्या कामात व्यस्त असताना स्वतःची कलानिर्मिती चालू ठेवली. मुंबईतल्या कलादालनांमधून १९९७ पासून त्यांची चित्रे प्रदर्शित होत आहेत. सभोवतालच्या माणसांचे जगणे हाच त्यांच्या चित्रांचा मुख्य विषय राहिला आहे. त्यामुळे त्यांची चित्रे मानवाकृतिप्रधान असतात आणि विरूपीकरणाबरोबरच भारतीय लोककला, तंत्र आर्ट अशांचा प्रभावही चित्रांच्या रचनेत जाणवतो. त्यांच्या चित्रांना जीवनावर भाष्य करणारा एक वैचारिक आशय असतो, त्यामुळे जाहिरातकलेतील इलस्ट्रेशनच्या मर्यादा ओलांडून ते इथे एक भाष्यकार म्हणूनच वावरतात. गोडबोले यांची १९९६ मध्ये मुंबईत यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी आणि २००७ मध्ये आर्ट डेको येथे एकल प्रदर्शने झाली. सामूहिक प्रदर्शनांंमध्येही त्यांची चित्रे प्रदर्शित झाली आहेत.

जीवनातल्या साध्या घटनांपासून ते गूढवादापर्यंत अनेक विषय गोडबोल्यांना भावतात. त्यामुळे पर्यावरणापासून ते कबिराच्या दोह्यांतील सूफी तत्त्वज्ञानापर्यंत सारे काही त्यांच्या चित्रांमधून येते. आर्ट डेकोमध्ये भरलेल्या प्रदर्शनात कबिराच्या शिकवणीवर आधारित अशी बरीच चित्रे होती. गोडबोले यांची एक नवी दृश्यभाषा त्यातून प्रत्ययाला येते.

गोडबोले यांना १९९९ मध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांच्या शरीराच्या उजव्या बाजूवर परिणाम झाला. तेव्हापासून ते डाव्या हाताने चित्रे रंगवायला शिकले आणि गुणवत्तेशी तडजोड न करता ते आजही चित्रनिर्मिती करीत आहेत. हृदयविकाराबद्दल जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने कन्फेशन्सया नावाने त्यांनी स्वानुभवावर आधारित चित्रांचे प्रदर्शनही केले होते.

- दीपक घारे, रंजन जोशी

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].