Skip to main content
x

गोडघाटे, माणिक सीताराम

ग्रेस

     कवी ग्रेस यांचा जन्म नागपूरमध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव सुमित्रा. ग्रेस यांचे शिक्षण एम. ए. पर्यंत (मराठी) झाले. ज्यात ते प्रथम श्रेणीत सर्वप्रथम हा सन्मान मिळवून उत्तीर्ण झाले (१९६६). आधी धनवटे नॅशनल कॉलेज आणि नंतर नागपूर येथील शासकीय महाविद्यालयात ते मराठीचे प्राध्यापक म्हणून काम करीत होते. विदर्भ साहित्य संघाचे मुखपत्र ‘युगवाणी’चे तीन वर्षे (१९७१ ते १९७४) संपादन करून त्यांनी त्या मासिकाला नवा चेहरा प्राप्त करून दिला. रायटर्स सेन्टरतर्फे निघणार्‍या ‘संदर्भ’ ह्या द्वैमासिकाचे संपादन त्यांनी १९७५-१९७६ ह्या काळात केले. त्यांचे काव्यलेखन आणि ललित गद्य निर्मिती १९५८ पासून आजतागायत अविश्रांत सुरू आहे. सुरुवातीला ‘छंद’, ‘सत्यकथा’ या नियतकालिकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या. वृत्तबद्धता, नादानुसारी आणि लयसंपन्न आकृतिबंध हे त्यांचे काव्यविशेष होत. त्यांची कविता जितकी गूढ आणि व्यामिश्र तितकीच अनुभूतीच्या विविध पातळ्यांना स्पर्श करणारी, जाणीव-नेणिवेच्या कक्षा आणि भावावेग यांच्या अनोख्या संश्लेषणातून प्रकटणारी आहे. तीत दुर्बोधता आहे तरीही ईश्वर, स्त्री, मृत्यू, दुःख ह्या आशयसूत्रांची ओढ आणि निसर्गप्रतिमा, पुराणप्रतिमा आणि स्वानुभूत प्रतीकांचे आकर्षण आणि संमोहित करणारे अर्थबहुल तरीही गूढ असे विश्व त्यांत सामावलेले आहे.

    ‘संध्याकाळच्या कविता’ (१९६७) हा त्यांचा पहिला कवितासंग्रह आहे. संध्याकाळीच कवीच्या ‘बाळमुठीला’, ‘आसवांचा तळ’ त्या क्षणी गवसलेला आहे, हीच त्याची चिरतरुण अशी अनुभव-श्रीमंती आहे. ‘राजपुत्र आणि डार्लिंग’ (१९७४), ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’ (१९७७), ‘सांध्यपर्वातील वैष्णवी’ (१९९५) आणि ‘सांजभयाच्या साजणी’ (२००६) असे त्यांचे पाच कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.

     ग्रेस यांनी मराठी कवितेला पृथगात्म असे वरदान दिलेले आहे. त्यांच्या कवितेचा आस्वाद घेताना आस्वादकालाही आपली योग्यता वाढवावी लागते. आपल्या कवितेत ग्रेस मंत्रभारलेपणा, अपूर्व निर्मितिक्षमता, प्रार्थनांचे वैभव आणि आत्म्याचा आवाजच जणू पेरतात. सौंदर्यानुभवाची अस्सलता जपण्यासाठी निखळ संवेदनांची एक वेगळी शैली तेथे अवतरते. ग्रेस स्वतःला ‘द्वैती’ म्हणतात, म्हणूनच लौकिक-अलौकिक संवेदनांच्या मंथनातून त्यांच्या खोल मनातला ताण आणि आकांत त्यात प्रकटतो. ते स्वतःच म्हणतात, त्याप्रमाणे ‘Creativity is my life,and its conviction is my character.’

     हा रंग सौंदर्यशोधकाचा आहे. मूल्यगर्भी, गूढात्म चिंतनवेध त्यांच्या ललितबंधातही आहे. त्यांच्या अनुभवकेंद्राबद्दल आणि ग्रहणप्रक्रियेसंबंधीच्या त्या नोंदी आहेत. ते म्हणतात तशी ‘ही मुळातच अनवट बीजसंभवाची निर्मिती आहे.’ याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्या निर्मितीत कार्यकारणभावाची जपणूक किंवा तार्किक भान नाही, ती अंतःप्रेरणेची भाषा आहे; जी काहीशी गूढ असणारच. त्यासाठी विश्लेषण नको, संश्लेषणच हवे. तीत आत्मसत्त्व, आत्मशोध आणि अप्रकट मनाची गुंतागुंत प्रकटते. हा  नेणिवेचा उच्चार ‘तू माझी कुलस्वामिनी धनवती’ असाच आहे. झिरझिरीत पडद्यामागच्या सौंदर्यदर्शनाची हुरहुर त्यांच्या निर्मितीत आहे. ती जितकी शब्दवेल्हाळ आहे तितकी अर्थकाहूर आहे. त्यांचे ललितबंधही त्यापासून वेगळे नाहीत.

    ‘माझ्या कवितेच्या नाकात दुर्बोधतेची बेसरबिंदी जन्मापासूनच टोचलेली आहे’, असे ते म्हणतात. ‘संध्याकाळच्या कविता’मध्ये संध्यावेळाशी जडलेल्या मनाचा वेध, ‘राजपुत्र आणि डार्लिंग’मध्ये एक अखंड स्वगतासारखा संवाद, ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’मध्ये ‘आई:१’, ‘आईः २’, ‘आई: ३’, ‘आईचे गाणे’, ‘चंद्रमाधवीच्या तीन कविता’, ‘चंद्रमाधवीच्या कविता: २’ अशा कविता आहेत. ‘सांध्यपर्वातील वैष्णवी’मध्ये ‘प्रार्थनापर्व’, ‘सांध्यपर्व’ आणि ‘दृष्टान्तपर्व’ अशी विभागणी आहे. ‘एकांतकृष्ण’ व ‘कृष्णएकांत’ अशा द्विदल कवितेबरोबर ‘त्रिदल’ कविताही आहे. ‘वेरावळीय समुद्राचे दृष्टांत’ मधून नव्या प्रतिमा घडवून साधलेला परिणाम दिसतो, आणि  ‘सांजभयाच्या साजणी’मध्ये ‘साऊलगाणी’, ‘संध्येचे अर्थान्तरन्यास’ अशा वेगळ्या वाटाही भेटतात.

     त्यांच्या ललितबंधात ‘मुक्त गद्य’ नव्हे तर मुक्त असे काव्यच प्रकटते. तेथेही त्यांनी स्वतःवर प्रकाशाची तिरीप टाकलेली आहे. ‘परंतु माझ्या मनाला एक वाईट खोड आहे. वस्तूंचे आणि व्यक्तींचे संबंध एका भावस्थितीत गुंफून मी जाणिवांच्या दुसर्‍या वर्तुळात उभा असतो.’ ‘चर्चबेल’मध्ये (१९७४) निबंध आणि काव्य यांच्या सीमारेषेवरील लेखन आहे तर ‘मितवा’ मध्ये (१९८७) आत्मपरतेच्या अंगाने ते कवीच्या आत्मशोधाकडे झुकलेले आहेत. ‘संध्यामग्न पुरुषाची लक्षणे’ मध्ये  (२०००) आत्ममग्नता, भाववृत्तींची प्रबलता आणि गूढ धूसर प्रत्ययातून प्रतिमांचा संकर झालेला दिसतो. ‘मृगजळाचे बांधकाम’ मध्ये (२००३) निर्मितिप्रक्रियेचा शोध घेण्याची अनावर ऊर्मी दिसते. निसर्गसत्ता आणि जीवनसत्ता यांचे विश्लेषण करून सौंदर्यसत्तेची मांडणी करणारा सिद्धान्त मांडणारे ग्रेस इथे आहेत.

     ग्रेस रूढ अर्थाने जुनी, नवी किंवा रूढ परंपरा स्वीकारत नाहीत, ते त्यांचे संचित मानतात. मांडणीत येणारी दुर्बोधता ही अनुभवांच्या व्यामिश्रतेने आणि भाषेची काव्यनिष्ठ व संगीताभिमुख पुनर्घटना करताना येते, असे त्यांनी मुलाखतीत सांगितले आहे. त्यांचा अलीकडचा ‘वार्‍याने हलते रान’ (२००८) हा ललितबंधसंग्रह म्हणजे जणू ग्रेस यांना लागलेला ‘मृगजळाच्या काही विलक्षण, सुलक्षण डोहांचा तळसुगावा’ आहे. प्रतिभेच्या अनावर वळणांमागील ‘आत्मकेंद्राच्या पाठीपोटाशी असलेल्या, विश्वकेंद्राच्या अनुभूतीचे करुणामूल्य, कलामूल्यच... ’ इथे शोधले जाते आहे. हे ललितबंध पुराणकथा, दंतकथा, लोककथा, परीकथा, स्मरणकथा यांतून निर्मिती आणि तिची प्रक्रिया यांचा शोध घेतात. वीणा आलासे म्हणतात त्याप्रमाणे ग्रेस यांच्या दृष्टीतून उमगणारे तत्त्व हे ‘कला ही जीवनाची पुनर्निर्मिती आहे’ हेच मांडणारे आहे. हे कवितेने हललेले ललितबंधलेखन आहे आणि एक अनोखा आत्मसंवाद आहे.

    ‘आई’ ही ग्रेस यांच्या काव्यातील महत्त्वाची संकल्पना आहे, ज्याबद्दल ग्रेस म्हणतात - ‘She stands in my poetry as a supreme symbol of entire womanhood.’ आईबद्दल बोलताना त्यांनी ‘स्त्री-देहाच्या शक्तीचे अंतिम भयाण केंद्र माझी आई - माझे क्रौर्य आणि माझी आई - माझी करुणा.’ इथे आई ह्या प्रतिमेतील देहनिष्ठ भावना, इच्छा, वासना यांचे सूचनही होते. डॉ. जयंत परांजपे यांना ‘मातृविषयक गंडाच्या उपपत्तीविषयी’ हा अंगुलिनिर्देश वाटतो. (ग्रेस आणि दुर्बोधता, पृष्ठ १८३)

     ‘संध्याकाळच्या कविता’, ‘चर्चबेल’, ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’, ‘राजपुत्र आणि डार्लिंग’ ह्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ‘मितवा’ ह्या ललित लेखसंग्रहाला मारवाडी संमेलन, मुंबईचा पुरस्कार, ‘संध्यामग्न पुरुषाची लक्षणे’ ह्या ललित लेखसंग्रहाला सोलापूर येथील दमाणी पुरस्कार, विदर्भ साहित्य संघ, नागपूर ह्या संस्थेचा ‘जीवनव्रती’ पुरस्कार (१९९७) तर माणिकलाल गांधी स्मृतीप्रीत्यर्थ ‘विदर्भगौरव’ पुरस्कार (२००३) असे पुरस्कार मिळाले.

     दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान, पुणे यांचा वाग्विलासिनी पुरस्कार हा गौरवही त्यांना प्राप्त झाला; तर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची (मुंबई) गौरववृत्तीही त्यांना लाभलेली आहे.

     त्यांच्या ‘चर्चबेल’ ह्या ललितबंधांचा, निवडक कवितांचा आणि ‘मितवा’ ह्या ललितबंधाचा गुजराती भाषेत अनुवाद झालेला आहे. सदस्य, सल्लागार समिती (मराठी), भारतीय साहित्य अकादमी, दिल्ली येथे सदस्य, विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई (१९८२-८६) हे सन्मानही त्यांना लाभले.

     कवी ग्रेस यांचे मराठी साहित्यातील स्थान हे असे अनन्य आहे. त्यांच्या कवितेचे मूलात्म स्वरूपच पृथगात्म आहे. त्यांची कविता आणि ललितबंध आपल्याला एक विलक्षण, अतार्किक अनुभव देतात. म्हणूनच त्यांची निर्मिती आपल्याला अनुभव, काव्यभाषा, शैली ह्यांचा पुनर्विचार करायला भाग पाडते ही तिची विलक्षणताच मानावी लागेल !

- डॉ. आशा सावदेकर

गोडघाटे, माणिक सीताराम