गोगटे, शंकर लक्ष्मण
महाराष्ट्र शासनाने कृत्रिम रेतनपद्धतीने पशुपैदास कार्यक्रम राबवून दूध उत्पादन क्षेत्रात क्रांती घडवून आणली. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या राबवण्यामध्ये गोठीत वीर्य प्रयोगशाळेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. महाराष्ट्र शासनाची अशी पहिली गोठीत वीर्य प्रयोगशाळा स्थापन करणारे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून दूध उत्पादन क्षेत्रात डॉ. शंकर लक्ष्मण गोगटे यांची ओळख आहे. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण धारवाड जिल्ह्यातील सावनूर येथे झाले. मुंबई येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातून १९५९मध्ये त्यांनी बी.व्ही.एस्सी. पदवी प्राप्त केली आणि त्याच वर्षी ८ जून रोजी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन खात्यात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून गोगटे यांनी नोकरीस सुरुवात केली.
त्या वेळी महाराष्ट्र राज्यातील गायी-म्हशींचे दूध उत्पादन वाढावे; म्हणून पशुसंवर्धन खात्यातर्फे कृत्रिम रेतन पद्धतीने संकरित गोपैदास कार्यक्रम राबवण्यात येत होता. या पद्धतीमध्ये दूध उत्पादनाची उच्च आनुवंशिकता असणार्या वळूचे वीर्य कृत्रिम पद्धतीने गोळा केले जाते. ते जास्तीत जास्त गायींना वापरता यावे, म्हणून विशिष्ट द्रावणात विरळ करून ठरावीक मात्रांमध्ये (रेत मात्रा) वीर्यकांड्यात बर्फाच्या साहाय्याने साठवले जाते. या वीर्यकांड्या निरनिराळ्या ठिकाणी पाठवून तेथील स्थानिक गायींना हे वीर्य इंजेक्शनद्वारे देऊन कृत्रिम गर्भधारणा घडवून आणली जाते. अशा पद्धतीने जन्म घेणारी संकरित गाय स्थानिक गायींच्या तुलनेने भरपूर दूध देणारी असते. या कृत्रिम रेतन कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासनाने सुरुवातीला पुणे येथे ‘वळू वीर्य संकलन आणि पुरवठा केंद्र’ स्थापन केलेले आहे. ज्या ठिकाणी कृत्रिम रेतन पद्धतीचा अवलंब करण्यात आला, त्या ठिकाणी दुग्धोत्पादन वाढल्याचे आढळून आले. त्यामुळे शेतकरी व गोपालकांचा या कार्यक्रमावरचा विश्वास वाढला. संकरित गोपैदाशीसाठी चांगल्या जातीच्या वळूच्या वीर्याची मागणी वाढत गेली.
पुणे येथील एकाच केंद्रातून राज्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांना रेतमात्रा (द्रव स्वरूपातील वीर्य) पुरवणे अवघड होऊ लागले. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक तरी वळूबीज केंद्र सुरू करण्याचे शासनाने ठरवले. असेच एक केंद्र अहमदनगर जिल्ह्यात स्थापन करण्यासाठी १९६४मध्ये डॉ. गोगटे यांची जिल्हा कृत्रिम रेतन केंद्राचे केंद्र अधिकारी म्हणून नेमणूक झाली. केंद्रासाठी जातिवंत विदेशी वळू खरेदी करणे आणि वीर्य साठवण्यासाठी सुसज्ज प्रयोगशाळा स्थापन करणे, ही आव्हानात्मक जबाबदारी डॉ. गोगटे यांनी पार पाडली.
पुढील काळात नगर जिल्ह्यातील संकरित गायींची संख्या आणि दूध उत्पादन लक्षणीयरीत्या वाढत गेले. त्याचे श्रेय डॉ. गोगटे यांच्या कार्याला दिले पाहिजे. वीर्य साठवण्याच्या १९६०-७०च्या दरम्यानच्या प्रचलित पद्धतीत वीर्याची प्रत लवकर खराब व्हायची. ते दूरवर पाठवता येत नव्हते. कृत्रिम रेतनपद्धतीमधील ही त्रुटी दूर करणारे नवीन तंत्रज्ञान नुकतेच उपलब्ध झाले होते. ते म्हणजे अतिशीत तापमानात (-१९६० से.) एका विशिष्ट नळीमध्ये (वीर्यकांडी) वीर्य गोठवणे. असे गोठीत वीर्य कित्येक वर्षे चांगल्या स्थितीत राहू शकते. त्याची वाहतूक करणेही सोपे जाते. महाराष्ट्र शासनाने गोठीत रेत (अतिशीत वीर्य) प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी डेन्मार्क येथील ‘डॅनिडा’ या संस्थेने आर्थिक मदत आणि तांत्रिक मार्गदर्शन देण्याची तयारी दर्शवली.
डॉ. गोगटे यांच्या कृत्रिम रेतन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन शासनाने गोठीत रेत केंद्र स्थापन करण्याची आव्हानात्मक जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. डॉ. गोगटे यांनी डॅनिडा या संस्थेने आयोजित केलेल्या गोठीत रेत तंत्रज्ञानाचे दोन महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. शासनाने १९७९मध्ये पुणे येथील पहिल्या ‘गोठीत रेतमात्रा उत्पादन व पुरवठा केंद्राचे’ प्रमुख म्हणून गोगटे यांची नेमणूक केली. १९८०मध्ये पुणे येथे गोठीत रेत केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू झाले. राज्यातील पहिले गोठीत रेत केंद्र यशस्वीपणे आणि पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केल्याबद्दल डॉ. गोगटे यांच्या कर्तृत्वाची खास प्रशंसा करणारा अहवाल डॅनिडा या संस्थेने महाराष्ट्र शासनाकडे पाठवला. डॉ. गोगटे ३१ मार्च १९९१ रोजी उपसंचालक (कृत्रिम रेतन) या पदावरून निवृत्त झाले. आपल्या ३२ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी अनेक शेतकरी मेळाव्यांतून, दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या कार्यक्रमांतून गायी-म्हशींच्या प्रजनन समस्येविषयी विशेष मार्गदर्शन केले. पाकिस्तान आक्रमणाच्या वेळी १९६५मध्ये मदतनिधी उभारण्यासाठी जिल्हा परिषदेने नाट्यप्रयोग केले होते. त्यात डॉ. गोगटे यांनीही नाटकात भूमिका करून अशा उदात्त कार्यास हातभार लावला होता. निवृत्तीनंतर शंकर गोगटे यांनी कला क्षेत्रात काम करणार्या प्रसिद्ध ‘संस्कार भारती’ या अखिल भारतीय संस्थेत पुणे शाखेचे कार्यालय प्रमुख म्हणून काम केलेले आहे.