गोखले, गोविंद विष्णू
महाराष्ट्रात मातीच्या गणपतीच्या मूर्ती करण्याची कला पूर्वीपासूनच आहे. परंतु या कलेचे गोविंद विष्णू गोखले यांनी शास्त्र बनविले. अशा मूर्तींची व देखाव्यांची प्रदर्शने केली व ‘मृण्मूर्ती रंगकला विज्ञान’ हे पुस्तक लिहून या कलेचा प्रचार केला. भाद्रपद महिन्यात गणपती उत्सव येतो व त्यासाठी मातीच्या मूर्ती बनवून घरोघरी त्या बसविल्या जातात. गावोगावी अशा मूर्ती तयार करणारी घराणी असून त्यांत कलेत गती असणारी मंडळी हा व्यवसाय भक्तिभावाने करतात. आजवर अशा गणेशमूर्ती बनविणारे अनेक मूर्तिकार झाले असले तरी ते शास्त्रस्वरूपात मांडणारे व १९१४ मध्ये त्यावर पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न करणारे गोविंद विष्णू गोखले आजच्या गणेशमूर्तिकारांना ज्ञात नाहीत.
गोविंद विष्णू गोखले यांचा जन्म पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीच्या आसपास असलेल्या एका खेड्यात झाला. त्यांच्या घरची स्थिती फार गरिबीची होती. अशातच त्यांच्या लहानपणीच वडील वारले. आपल्या आठवणींत ते लिहितात, ‘गावी असताना लहानपणी श्रावणमासात गणपती करण्याचे अड्डे सुरू झाले म्हणजे माझेही मिळेल त्या मातीने वेडेवाकडे गणपती वगैरे करण्याचे काम सुरू व्हावयाचे. सारांश, मनापासून चित्रकलेची आवड; परंतु ती पुरी होण्यास मुळीच साधन नव्हते.’ या पार्श्वभूमीवर माधुकरी मागून विद्याभ्यास करावा या हेतूने ते सांगलीत आले. मराठी पाचवीपर्यंतचा अभ्यास केल्यानंतर ते एका नाटक मंडळीत दाखल झाले. (ही नाटक मंडळी बहुधा १८४३ मध्ये ‘सीता-स्वयंवर’ हे पहिले नाटक करणारी विष्णुदास भावे यांची होती.) ते करीत असलेल्या भूमिकांचे मेकअप, कपडे इत्यादी काम तेच करीत असत. त्यातील प्रावीण्यामुळे इतरांना सजविण्याचे कामही त्यांच्यावर सोपविण्यात येऊ लागले. शिवाय नाटकातील किरीट, कुंडले, बाहुभूषणे, मुखवटे आदी कागदी सामान बनविण्यातही त्यांना चांगलीच गती होती.
नाटकमंडळीचे मालकही या तरुण व हुन्नरी कलावंतावर खूष होते. पण गोखले अस्वस्थच होते. अखेरीस कुणाच्या तरी आधाराने त्यांनी मुंबई गाठली व पुन्हा शिक्षण सुरू केले. ते मराठी सहाव्या इयत्तेत अभ्यास करू लागले. परंतु गिरगावातील रस्त्याने जाता-येता लागणाऱ्या गणपतीच्या कारखान्यातील कामे बघण्यात गोविंद गोखले जास्त वेळ रमू लागले. त्यांची लहानपणीची चित्रकलेची व मातीकामाची हौस उफाळून येऊ लागली. अशा स्थितीत ते सहावी इयत्ता उत्तीर्ण झाले. पण पुढील इंग्रजी शिक्षणासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. या चिंतेत असतानाच तालुका : रोहे, मुक्काम : मेढे येथील रहिवासी असलेल्या व गिरगावातील गणेशवाडीत गणपती उत्सवापूर्वी गणपतीचा कारखाना चालवणाऱ्या विसाजी कृष्ण आठवले या गणेशमूर्तिकारांशी त्यांचा परिचय झाला. गोखले त्यांच्याकडे शिकू लागले व ते अत्यंत मन:पूर्वक ही कला शिकले.
गोखल्यांनी प्रथम, गुरू करत असलेले काम काही दिवस स्वस्थ बसून पाहिले. त्यानंतर आठवल्यांनी त्यांना गणपतीच्या बैठकीचे व पाठीकडचे अंग रचण्यास व कोरण्याने साफ करण्यास शिकवले. असे करताकरता काही दिवसांनी आत्मविश्वास आल्यावर जमेल तशी मूर्ती तयार करण्याची त्यांना परवानगी दिली. अशा काही मूर्ती तयार झाल्यावर आठवल्यांनी त्या मूर्तीस रंग देण्याची गोखल्यांना परवानगी दिली. त्यानंतर गोखल्यांनी केलेल्या मूर्ती विकून माती व रंगाच्या खर्चाचे पैसे वगळून पाच रुपये आठवले गुरुजींनी गोखल्यांना दिले. गुरुदक्षिणा म्हणून गोखले ते परत करू लागताच आठवल्यांनी ते न घेता गुरुप्रसाद म्हणून त्यांस परत दिले व ते म्हणाले, ‘‘पुढच्या वर्षापासून तू स्वत: गणपतीच्या मूर्ती तयार कर. मी येऊन मार्गदर्शन करीन.’’
दुसऱ्या वर्षापासून गोखले स्वतंत्रपणे मूर्ती तयार करू लागले. पण स्वत: केलेल्या मूर्तीपेक्षा जास्त चांगले काम बघताच, गोखले तसे काम कसे करता येईल याबद्दल विचार व प्रयोग करीत शिकले. हळूहळू त्यांच्या कामाचा दर्जा सुधारत जाऊन त्यांचे काम त्या काळातील सर्वोत्कृष्ट म्हणून नावाजले जाऊ लागले. त्यासाठी त्यांनी रेखणी, वर्ख लावणे, भरजरी वस्त्रांचे काठ व किनारी रंगविणे, डोळे व नखांवर चमक आणणे अशा बारीकसारीक गोष्टी विविध निष्णात गुरूंकडून प्रयत्नपूर्वक जाणून घेतल्या होत्या. काहींनी अशी गुपिते सांगण्यास नकार दिल्यावर ते स्वत: प्रयत्नपूर्वक शिकले. यातून त्यांची प्रसिद्धी वाढत गेली.
लोकांनी त्यांच्या गणपतीच्या मूर्ती बघाव्यात म्हणून ते त्या मांडून ठेवू लागले. त्या पाहण्यास गर्दी होत गेली. हे बघून त्यांचा उत्साह वाढला व मूर्तीसोबतच एखादा प्रसंग किंवा देखावेही ते प्रदर्शित करू लागले. यातूनच गावोगावी गणपती व त्याच्या देखाव्यांचे प्रदर्शन भरविण्याची कल्पना पुढे आली व ती कमालीची लोकप्रिय झाली. त्यांनी बनविलेले गणपती व त्याचे देखावे यांची छायाचित्रे लोक विकत मागून संग्रही ठेवू लागले. इतर गावांतील गणेशमूर्तिकारांना गोखले यांचे दर्जेदार काम बघून आपणही तसे काम करावेसे वाटू लागले. प्रत्यक्ष भेटून किंवा पत्ररूपाने ते आपल्या शंका विचारून त्यांचे मार्गदर्शन घेत असत व गोखलेही अशा मंडळींना कोणत्याही प्रकारची लपवाछपवी न करता मार्गदर्शन करीत.
यातूनच अशा मंडळींची इच्छा कायमस्वरूपी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून १९१४ साली ‘मृण्मूर्ती- रंगकला-विज्ञान’ हे पुस्तक लिहिण्यास त्यांनी प्रारंभ केला. व्यवसाय व वयानुरूप प्रकृती सांभाळून ते पूर्ण करण्यास दोन वर्षे लागली. पण महायुद्धामुळे महागाई वाढून सर्व सामानाची टंचाई निर्माण झाली व अखेरीस १९२३ मध्ये हे पुस्तक प्रसिद्ध झाले. अशा प्रकारे या कलेवर पुस्तक लिहिणारे गोविंद विष्णू गोखले हे पहिलेच मराठी मूर्तिकार असावेत. या पुस्तकात माती तयार करण्यापासून ते सोन्याचा वर्ख लावून, ज्या ठिकाणी चमक हवी त्या ठिकाणी वॉर्निश लावून ते सुकल्यानंतर झाकून ठेवण्यापर्यंत तपशीलवार माहिती दिली आहे. शेवटी ते म्हणतात, ‘या क्रमाने आमची रीत आहे. जसें ज्यांस सोईस वाटेल तसें त्यांनी करावें.’
गोखले यांच्याबद्दलची फारशी व्यक्तिगत माहिती उपलब्ध नाही. परंतु त्यांच्यापासून अनेक गणेशमूर्तिकारांचा फायदा निश्चितच झाला असावा. तसेच ते मातीकामाच्या कलेत व रंगकाम करताना असे काही कौशल्य दाखवीत, की त्यातील मानवाकृती असोत की प्राणी किंवा पक्षी, ते सर्वच अत्यंत जिवंत, कलात्मक अनुभव देणारे व मोहक असत. त्यांच्या पुस्तकाच्या शेवटी दिलेली जाहिरात पुढीलप्रमाणे आहे :
‘आमचेकडे मिळणारी चित्रे श्रीगणपती मूर्ती - किंमत रु. ७ ते १०० (कामाप्रमाणे), गौरीचे मुखवटे - किंमत रु. १०, मातीची अगर प्लॅस्टरची चित्रे (देवादिकांची व इतर रिलीफ आणि राउण्ड)- किंमत रु. १५ ते १००. कोणत्याही कामाची ऑर्डर फक्त गणेशचतुर्थीपासून ते चैत्र अखेरपर्यंत घेतली जाते आणि त्यास एक चतुर्थांश किंमत अॅडव्हान्स द्यावी लागेल — गोखले गणपतीवाले - मुंबई ४.’
त्यांच्या अशा दर्जेदार गणेशमूर्ती बघून मुंबईतील आद्य भारतीय स्मारकशिल्पकार रावबहादूर गणपतराव म्हात्रे यांना मूर्तिकलेबद्दलची ओढ निर्माण झाली. त्यातूनच त्या काळात अत्यंत गाजलेले ‘मंदिरपथगामिनी’ हे शिल्प साकार झाले. पुढील काळात जिवंत वाटणारी व्यक्तिशिल्पे व स्मारकशिल्पे परदेशी कलावंतांकडून तयार करून न घेता भारतीय शिल्पकारच ती करू लागले. त्यामागे अत्यंत जिवंत अशा वाटणाऱ्या मूर्ती बनविणाऱ्या व अतिशय उत्कृष्ट प्रकारे रंगविणाऱ्या गोखले यांच्या मृण्मय मूर्तिकलेची प्रेरणा होती असे म्हणता येईल. आज गणपती उत्सव व त्यात असणाऱ्या मूर्तींचे स्वरूप कमालीचे ढोबळ झाले आहे, आमूलाग्र बदलले आहे. म्हणूनच गोविंद विष्णू गोखले यांच्या मृण्मूर्ती कलेचे, त्या रंगविण्याच्या शास्त्राचे व त्यामागील प्रयत्नांचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे.