गोखले, विक्रम चंद्रकांत
अभिनयाचा आणि संगीताचा जन्मजात वारसा लाभलेल्या विक्रम गोखले यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत व नाट्यसृष्टीतही अढळपद निर्माण केले . भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या नायिका म्हणून लौकिक असलेल्या कमलाबाई गोखले या त्यांच्या आजी आणि चरित्रनायक म्हणून ठसा उमटवणारे चंद्रकांत गोखले हे त्यांचे वडील. कलाप्रेमी कुटुंबात आणि हेमावती गोखले या आईच्या संस्कारात विक्रम गोखले यांच्या मनात कलेवरची निष्ठा रुजणे स्वाभाविक होते.
अभिनयाचा वारसा घरातूनच लाभलेल्या विक्रम चंद्रकांत गोखले यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील भावे हायस्कूल व वि.र.वेलणकर हायस्कूल येथे झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील एम.ई.एस. (आताचे आबासाहेब गरवारे) महाविद्यालयात झाले. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला.
बालवयातच त्यांनी नाटकांमध्ये कामे करायला सुरुवात केली. बालकलाकार म्हणून त्यांनी ‘आग्र्याहून सुटका’, ‘राजसंन्यास’, ‘बेबंदशाही’ या नाटकांमध्ये भूमिका केल्या. तर याच काळात त्यांनी ‘शेवग्याच्या शेंगा’ या चित्रपटात पहिल्यांदा अभिनय केला. ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ हे त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक होय. मराठी चित्रपटात नायक म्हणून ‘अनोळखी’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. स्पष्ट आणि स्वच्छ शब्दोच्चार, उत्तम संवादफेक, देखणे-रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि अभिनयातील सहजता या त्रिवेणी संगमातून मराठी आणि हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या. ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ या चित्रपटात आशा काळे, नयनतारा, सतीश दुभाषी अशा कलाकारांबरोबर विक्रम गोखले यांची भूमिकाही प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली. १९८९ मधील ‘कळत नकळत’ आणि १९९१ साली प्रदर्शित झालेल्या ‘माहेरची साडी’ या दोन्ही मराठी चित्रपटांत परस्परांहून वेगळ्या भूमिका त्यांनी ताकदीने उभ्या केल्या. याशिवाय ‘कुंकू’, ‘मुक्ता’, ‘लपंडाव’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. तसेच ‘वऱ्हाडी आणि वाजंत्री’, ‘बिजली’, ‘आधारस्तंभ’ आदी चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारल्या. ‘वजीर’ (१९९४) या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर अॅवॉर्ड मिळाले, तर त्यांनी डॉक्टरी पेशावर आधारित कथेवर ‘आघात’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. ‘अनुमती’ या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना २०१३ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल व न्यूयॉर्क इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्येही त्यांना या चित्रपटातील अभिनयासाठी पुरस्कार प्राप्त झाले .
नामांकित निर्मिती संस्थांच्या हिंदी चित्रपटांतही विक्रम गोखले यांनी आपल्या हिंदी शब्दोच्चारांनी आणि सहजसुंदर, परिपक्व अभिनयाने आपला ठसा उमटवला . ‘इन्साफ’, ‘खुदा गवाह’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘हे राम’, ‘भुलभुलैय्या’, ‘मदहोशी’, ‘तुम बिन’, ‘चॅम्पियन’, ‘लाडला’, ‘हसते हसते’, ‘शाम घनश्याम’, ‘अग्निपथ’, ‘ईश्वर’, ‘सलीम लंगडे पे मत रो’, ‘मिशन ११ जुलै’, ‘सो झूठ एक’, ‘गफला’, ‘धुवाँ’ या हिंदी चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या.
विक्रम गोखले यांनी ‘अपराध मीच केला’, ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘जास्वंदी’, ‘स्वामी’, ‘महासागर’, ‘जावई माझा भला’, ‘बॅरिस्टर’, ‘दुसरा सामना’, ‘आणि मकरंद राजाध्यक्ष’, ‘संकेत मीलनाचा’, ‘खरं सांगायचं तर’, ‘आप्पा आणि बाप्पा’, ‘नकळत सारे घडले’ इ. नाटकांत मुख्य भूमिका केल्या . विजया मेहता यांच्या ‘बॅरिस्टर’ नाटकातील त्यांची मध्यवर्ती भूमिका खूप गाजली. कोणत्याही भूमिकेशी समरस होऊन ताकदीने ती भूमिका जिवंत करण्याचे कौशल्य त्यांच्या ठायी होते . कामावर असलेल्या निष्ठेने आणि समर्पणाने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. ‘ढाई अक्षर प्यार के’, ‘जरा मुस्करा दो’ या हिंदी नाटकांशिवाय दूरदर्शन मालिकांमध्येही त्यांचा सहभाग असे . ‘विरुद्ध’ या मालिकेतील धीरेंद्रराय सिंघानिया या त्यांनी साकारलेल्या भूमिकेची खूप चर्चा झाली. ‘जीवनसाथी’, ‘संजीवनी’, ‘मेरा नाम करेगी रोशन’, या हिंदी मालिका आणि ‘या सुखांनो या’, ‘अग्निहोत्र’ या मराठी मालिकांमध्येही त्यांनी केलेला अभिनय रसिकांच्या लक्षात राहिला.
मराठी व हिंदीसह त्यांनी १७ गुजराती, २ तमिळ व १ कन्नड या भाषांतील चित्रपटांतूनही काम केले. त्यांनी लेखनही केले. नाट्य-चित्रपट संदर्भातील विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे येथे अतिथी प्राध्यापक म्हणून त्यांनी व्याख्याने दिली. याखेरीज त्यांचे संभाषण कौशल्याचे प्रशिक्षण वर्ग अतिशय लोकप्रिय ठरले
अभिनय क्षेत्रात भारदस्त कामगिरी करतानाही सामाजिक भान आणि खरेपणा जपणाऱ्या या मनस्वी कलाकाराने पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचीही स्थापना केली . तसेच त्यांना छायाचित्रणाची आवड होती.. चित्रपट, नाटक आणि दूरदर्शन मालिकांमध्ये व्यग्र असले, तरी एक कलाकार म्हणून आणि एक माणूस म्हणून त्यांनी सभोवतालचे भान आणि चिंतन कायम ठेवले.