Skip to main content
x

गोंधळेकर, जनार्दन दत्तात्रेय

        हुश्रुत व्यक्तिमत्त्वाचे चित्रकार, कलासमीक्षक, भारतीय व पाश्‍चिमात्य कलाविषयक  वाचन असणारे अभ्यासक आणि उत्तम व्याख्याते म्हणून जनार्दन दत्तात्रेय गोंधळेकर सुप्रसिद्ध होते. याशिवाय कलाकृतींचे संरक्षण, संवर्धन आणि मुद्राचित्रण या विषयांचाही त्यांचा विशेष अभ्यास होता.

        त्यांचा जन्म पुण्यातील मुद्रण व्यवसायात ख्यातनाम असलेल्या सुसंस्कृत व सधन कुटुंबात, दत्तात्रेय व गंगाबाई या दांपत्याच्या पोटी झाला. पुण्यातच नूतन मराठी विद्यालयात शालेय व माध्यमिक शिक्षण घेऊन (१९२६) ते मॅट्रिक झाले. त्यानंतर त्यांनी मुंबई येथील जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून  जी.डी. आर्ट ही पदविका (१९३१) मिळवली. त्यांना विद्यार्थिदशेत चित्रकलेत अनेक बक्षिसे व शिष्यवृत्ती लाभली. त्यांत रौप्यपदक व १९३१ ते १९३३ या काळात म्युरल डेकोरेशनसाठी असलेल्या शिष्यवृत्तीचा समावेश आहे (१९३३-३४). इंदूरच्या सुशीला मोने यांच्याशी १९३४ मध्ये त्यांचा विवाह झाला.

        काही वर्षे त्यांनी पुण्यात चित्रकलेचे खासगी वर्ग (१९३४-३७) चालविले. नंतर ते उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला गेले. त्यांनी स्लेड स्कूल ऑफ आर्ट (लंडन) या ख्यातकीर्त संस्थेतून ‘डिप्लोमा इन फाइन आर्ट’ पदविका मिळवली. शिवाय सेंट्रल स्कूल ऑफ आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्टमधून वुड एन्ग्रेव्हिंग, एचिंग व इंटॅग्लिओ या मुद्राचित्रण माध्यमांचे (१९३७-३९) अध्ययन केले. भारतात परत आल्यानंतर त्यांनी पालनपूर संस्थानच्या नवाबासाठी भित्तिचित्रे रंगविली. पुण्याच्या ‘नवयुग चित्रपट कंपनी’त कला दिग्दर्शक व व्यवस्थापक म्हणून त्यांनी १९४० ते १९४८ दरम्यान काम केले. त्यांनी काही चित्रपटांचे कलादिग्दर्शनही केले. या काळात ते चित्रकार व चित्रकलेवर अभ्यासपूर्ण लिहिणारे लेखक म्हणून अल्पावधीतच  प्रसिद्धीस आले.

        ‘सह्याद्री’ मासिकाच्या ‘सुखी संसार’ या विशेषांकासाठी त्यांनी काढलेले आधुनिक पद्धतीचे चित्र मराठी मासिकांच्या मुखपृष्ठ परंपरेला छेद देणारे होते. त्या चित्रावर ‘झंकार’, ‘धनुर्धारी’, ‘सकाळ’, ‘महाराष्ट्र विस्तार’ अशा नियतकालिकांतून टीकेची झोड उठली. या प्रतिकूल परिस्थितीने नाउमेद न होता, निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन चित्रकलेतील आधुनिक विचार, प्रतीकांचा वापर व नवकलेचे आकलन वाढावे या दृष्टिकोनातून त्यांनी लेखन केले. प्रतीक-चित्र पाहण्याची खरी दृष्टी (‘सह्याद्री’,जानेवारी १९४०)आणि ‘संधिकाळातील चित्रकला’ (‘मनोहर’, डिसेंबर १९४९) हे त्यांचे विशेष उल्लेखनीय लेख आहेत. सुसूत्रपणे लेखनविषयक मांडणी करणे; पण ती करत असताना स्वतःचा विशिष्ट दृष्टिकोन व मते नेमकेपणाने व ठामपणे व्यक्त करणे हे त्यांच्या समीक्षालेखनाचे वैशिष्ट्य होते. त्यांना १९५० मध्ये ‘युनेस्को’ या जागतिक संस्थेची बेल्जियम फेलोशिप मिळाली व जुन्या कलाकृतींचे जतन व संरक्षण या विषयाचा त्यांनी अभ्यास  करून ते शास्त्र शिकून घेतले. 

        पुढे त्यांची सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये अधिष्ठाता (१९५३) म्हणून नियुक्ती झाली. या काळात त्यांनी कलाशिक्षणात नवीन कल्पना राबविल्या व काही नवीन उपक्रम सुरू केले. शालेय स्तरापासून ते उच्च कलाशिक्षणापर्यंतच्या विविध पातळ्यांवर कलाशिक्षणाचे सम्यक दर्शन घडावे म्हणून त्यांनी तत्कालीन मुंबई राज्याच्या राज्य-कलाप्रदर्शनाची (१९५३) सुरुवात केली. त्यांच्या कारकिर्दीत सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टची शताब्दी (१९५७) थाटात संपन्न झाली. यानंतर महाराष्ट्र शासनाने जे.जे. चे तीन स्वतंत्र भागांत विभाजन करण्याचा निर्णय घेतला. गोंधळेकरांनी या प्रस्तावित योजनेस विरोध केला आणि शासकीय निर्णयात बदल होत नाही हे लक्षात येताच आपल्या अधिष्ठाता पदाचा राजीनामा दिला.

        गोंधळेकरांचा कलाक्षेत्रातील लौकिक पाहून बेनेट कोलमन अँड कंपनीने त्यांची ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या प्रतिष्ठित वृत्तपत्र समुहात कलासंचालक म्हणून (१९५९) नियुक्ती केली. गोंधळेकरांनी टाइम्सच्या दर्शनी, तसेच अंतरंगात लक्षणीय कलात्मक बदल करून तो अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न करीत असताना, अभिजात कला व उपयोजित कलेची सांगड घालणारे प्रयोग केले. करार संपुष्टात येताच (१९६४) महाराष्ट्र शासनाने त्यांची वाई येथे मराठी विश्‍वकोश कार्यालयात कला संपादक म्हणून (१९६५) नेमणूक केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विश्‍वकोशाचा परिचय खंड प्रसिद्ध झाला (१९६५.) १९६५ ते १९७१ या काळात  विश्‍वकोशासाठी त्यांनी अनेक कलात्मक प्रणालींवर चिकित्सक लेखन केले.

        विश्वकोशाच्या कामात असतानाच अमेरिकेतील एका मान्यवर कलासंस्थेने ‘आय एक्स्पर्ट’ म्हणून त्यांना पाचारण केले (१९७४). महाराष्ट्रातील कलापरंपरेची ओळख व्हावी म्हणून वाई (जि. सातारा) येथील मेणवलीच्या नाना फडणवीसांच्या वाड्यातील अठराव्या शतकातील भित्तिचित्रांचा प्रकल्प महाराष्ट्र राज्याच्या कलासंचालनालयातर्फे प्रा. बाबूराव सडवेलकरांच्या प्रेरणेतून आणि गोंधळेकरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला (१९७८). भित्तिचित्रांचे जतन व दस्तऐवजीकरण व भित्तिचित्रांच्या यथामूल प्रतिकृती तयार करणे हे त्याचे स्वरूप होते. गोंधळेकरांवर या प्रकल्पाची जबाबदारी सोपविण्यात आली व जे.जे.तील प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या मदतीने तो साकार करायचा होता; परंतु सदर प्रकल्प संबंधितांच्या असहकार्यामुळे अयशस्वी झाला, तरीही गोंधळेकरांनी आपला अहवाल शोध-निबंधाच्या स्वरूपात सादर केला. त्यातून त्यांची या विषयाबद्दलची आस्था, अभ्यासू व चिंतनशील मनोवृत्ती दिसून येते. या सोबतच कलेचा सौंदर्य व सामाजिक दृष्टिकोनातून विचार करणारा विचारवंत वाचकांसमोर उभा राहतो.

        १९३० च्या दरम्यान गोंधळेकरांनी ‘बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल’ या भारतीय पुनरुज्जीवनवादी कलाचळवळीतून प्रेरणा घेऊन भगवान बुद्ध, वटवृक्षाखाली पहुडलेला श्रीकृष्ण अशा भारतीय विषयांवरील चित्रे रंगविली. ‘वॉश टेक्निक’मधील ही चित्रे वेगळाच दृक्प्रत्यय देतात.

        गोंधळेकरांच्या कलानिर्मितीवर प्रामुख्याने वास्तववादी चित्रशैलीचा प्रभाव असला तरी त्यांनी परदेशात असताना व अभ्यासातून अनुभवलेल्या विविध कलाचळवळी, कलाशैलींचाही त्यांच्या कलानिर्मितीवर प्रभाव पडलेला दिसतो. सुरुवातीच्या काळातील त्यांची व्यक्तिचित्रे व आत्मचित्रे त्यांच्या वास्तववादी शैलीतील प्रभुत्वाची साक्ष देतात. ‘आजोबा’ हे त्यांचे १९३१ मधील व्यक्तिचित्र त्यातील तांत्रिक कौशल्य व भावनाविष्कार यांमुळे हृद्य वाटते. व्यक्तिचित्रांसोबतच त्यांनी वास्तववादी शैलीत दर्जेदार निसर्गचित्रे आयुष्यभर रंगविली. पण त्यांच्या या निसर्गचित्रांत निसर्गातील चैतन्यापेक्षा, तंत्र व कारागिरीलाच प्राधान्य दिल्याचे आढळते. असे असूनही, १९४० ते १९५० च्या दरम्यान त्यांनी रंगविलेली काही निसर्गचित्रे व रचनाचित्रे मानवी जीवनातील निराशा, अस्थैर्य व भावव्याकुळता व्यक्त करणारी आहेत.

        याशिवाय, गोंधळेकरांनी आयुष्यभर मिळेल त्या कागदावर, पेन किंवा पेन्सिलीने विविध विषयांवरील अगणित रेखाटने केली. स्त्री-पुरुषांची, वस्त्रे परिधान केलेली, अर्धनग्न व नग्न देहांची, तसेच निसर्ग, वास्तू, प्राणी अशा कोणत्याही विषयावरील त्यांच्या या रेखाचित्रांतून गोंधळेकरांचे माध्यमावरील प्रभुत्व, अचूकता व परिपूर्णतेचा ध्यास दिसून येतो. आयुष्याच्या अखेरीस, १९८१ च्या दरम्यान बंगलोर येथील मारुती मंदिराचे काम त्यांनी स्वीकारले व त्यासाठी लहान आकारातील नमुनाचित्रे रंगविली. त्यांतून त्यांच्या कलाविषयक व्यापक जाणिवेचा व कौशल्याचा एक वेगळाच आविष्कार जाणवतो.

        त्यांनी आपल्या चित्रांची एकल प्रदर्शने दिल्ली, मुंबई, ब्रुसेल्स, लंडन आदी मोठ्या शहरांत भरविली. शासकीय व स्वायत्त अशा अनेक कला समित्यांवर त्यांनी सदस्य म्हणून काम केले. त्यांत मुंबई विद्यापीठ (सिनेट), ललित कला अकादमी, नागार्जुन कोंडा समिती, नालंदा समिती या प्रमुख होत. शिवाय त्यांनी भारत व पाश्‍चात्त्य देशांतील आकाशवाणीवर कलेवरील व्याख्याने दिली. चित्रकार व चित्रकला यांवर त्यांनी समीक्षात्मक लेखन व भाषणे केली आहेत. संगीताचा दर्दी आणि सुरेल बासरीवादक म्हणूनही ते मित्रांच्या वर्तुळात प्रसिद्ध होते. 

        एक चिंतनशील, भावनाप्रधान व चित्रकलेशी प्रामाणिक नाते असणारा बहुश्रुत चित्रकार म्हणून त्यांचे  कलेच्या इतिहासात नाव राहील. त्यांच्या स्मरणार्थ ‘ज.द. गोंधळेकर फाउण्डेशन’ ही संस्था पुणे येथे स्थापण्यात आली असून त्याद्वारे प्रदर्शने भरविली जातात व चित्रकलेच्या होतकरू, गरीब विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मदत दिली जाते. जहांगीर आर्ट गॅलरीतर्फे भरणाऱ्या ‘मास्टर स्ट्रोक्स ६’ या प्रदर्शनात गोंधळेकरांची चित्रे प्रदर्शित करण्यात आली व २००९ मध्ये  त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात ‘ज.द. गोंधळेकर’ हे पुस्तक ज्योत्स्ना प्रकाशनातर्फे प्रसिद्ध करण्यात आले.

- सु.र.देशपांडे, सुहास बहुळकर

गोंधळेकर, जनार्दन दत्तात्रेय