Skip to main content
x

गोरे, प्रभाकर

           पल्या विचारगर्भ, थेट शैलीने पुस्तकांच्या मुखपृष्ठांना एक वेगळे वळण देणारे स्वयंप्रज्ञ चित्रकार प्रभाकर गोरे हे शास्त्राचे विद्यार्थी. पण त्यांनी शिक्षण अर्धवटच सोडून दिले. चित्रकलेचे रीतसर शिक्षणही त्यांनी घेतलेले नव्हते. मनस्वी स्वभावाचे असल्यामुळे गोरे यांना उत्कटतेने जगण्यात रस होता. ते खेळकर आणि उत्साही असत. कोणत्याही कामात सर्वस्व झोकून देण्याची त्यांची वृत्ती होती. त्यांच्या चित्रशैलीत ही उत्कटता, आशयाला थेट भिडणारा रांगडेपणा पुरेपूर उतरला होता. कागदाच्या कपट्यांवर, भिंतीवर मुक्त रेखाटने म्हणजेच डूडल्स करण्याचा त्यांना छंद होता.

           बाबूराव पटेल यांच्या ‘मदर इंडिया’ (पूर्वीचे ‘फिल्म इंडिया’) मासिकात व्यंगचित्रकार म्हणून ते काम करीत. त्यांची व्यंगचित्रे नियमितपणे प्रसिद्ध होत असत. ती नोकरी त्यांना सोडावी लागली. पॉप्युलर प्रकाशनाच्या काही इंग्रजी पुस्तकांची रेखाचित्रे याच काळात त्यांनी केली. प्रभाकर पाध्ये यांचे युगोस्लाव्हियावरील इंग्रजी पुस्तक, सदानंद भटकळांचे ‘निर्मल अँड अदर पोएम्स’ तसेच ‘फ्यूचर ऑफ द इंडियन यूथ’ या पुस्तकांसाठी त्यांनी रेखाचित्रे केली होती. केशव भिकाजी ढवळे यांनी १९५६ मध्ये क्रमिक पुस्तके तयार केली, त्यांतील चित्रे गोरे यांची होती.

           प्रभाकर गोरे चित्रकार म्हणून माहीत झाले ते त्यांच्या मराठी पुस्तकांच्या मुखपृष्ठांमुळे. पॉप्युलर, तसेच इतर मान्यवर प्रकाशनांसाठी त्यांनी काम केले आणि मुखपृष्ठ कलेला एक वेगळी दृश्यभाषा दिली. मुख्यत: त्यांच्या नाटकांसाठी केलेल्या मुखपृष्ठांनी मराठीत एक नवा प्रवाह आणला. नाट्यप्रयोगांतली छायाचित्रे मुखपृष्ठांसाठी वापरण्याचा तोपर्यंत प्रघात होता. नाटकाच्या संहितेला नाट्यप्रयोगापेक्षा एक साहित्यकृती म्हणून वेगळे अस्तित्व आहे याची जाणीव त्या काळात प्रकाशन व्यवसायात नव्हती. भा.वि. वरेरकर यांंच्या ‘भूमिकन्या सीता’ आणि वसंत कानेटकरांच्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकांच्या मुखपृष्ठांसाठी अमूर्त भासणार्‍या प्रतिमांच्या आणि अभिजात कलेशी साधर्म्य साधणार्‍या चित्रशैलीचा त्यांनी वापर केला. ‘भूमिकन्या सीता’ या नाटकाच्या मुखपृष्ठावर सीता दाखवण्यापेक्षा सीतेचे निष्पाप चारित्र्य, तिला वेढणारे पार्थिव अस्तित्व आणि स्थल काळापलीकडे असलेल्या वास्तवाशी जडलेले तिचे नाते गोरे यांनी रंगसंगतीतून आणि अमूर्त आकारांमधून समर्थपणे मांडलेले आहे.

           ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे कानेटकरांचे ऐतिहासिक नाटक. शिवाजी महाराज आणि संभाजी या पिता-पुत्रांमधील दुरावा, एकाकीपणा आणि त्यांच्यामधले भावनिक नाते यांचे चित्रण करणारे हे नाटक ऐतिहासिक नाटकांना वेगळे वळण देणारे ठरले आणि कलानुभवाच्या गाभ्याला भिडण्याच्या गोरे यांच्या चित्रशैलीमुळे त्यांचे मुखपृष्ठही मराठी वाचकांच्या दृश्यकलेच्या अभिरुचीला, दृश्यप्रतिमांच्या ताकदीचे नवे भान आणून देणारे ठरले. या नाटकाच्या आतील पानांवर गोरे यांनी ब्रशच्या प्रवाही काळ्या रेषांमधून साकारलेल्या पात्रांच्या व्यक्तिरेखा रंगभूमीवरील नाटकामधील नसून नाट्यसंहितेने वाचकांच्या मनाच्या अवकाशात तयार होणार्‍या व्यक्तिरेखांशी नाते सांगणार्‍या आहेत.

           जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘निळासावळा’, ‘पारवा’, ‘हिरवे रावे’, ‘रक्तचंदन’, ‘पिंगळावेळ’, ‘सांजशकुन’ अशा अनेक पुस्तकांच्या सुरुवातीच्या आवृत्तीची मुखपृष्ठे गोरे यांची आहेत. जी.ए. आपल्या संग्रहांना त्यांतल्या कथांचा ‘मूड’ पकडणारी नावे देत. गोरे यांनी त्यांच्या मुखपृष्ठांमध्ये तो मूड नेमका टिपला आहे. ‘पिंगळावेळ’ पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एखादे मुद्राचित्र शोभावे अशा शैलीतले घुबडाचे चित्र आहे, ते जी.एं.च्या गूढ आशयाला नेमके चित्ररूप देणारे आहे. ‘राजा लिअर’ या विंदा करंदीकरांनी केलेल्या नाटकाच्या भाषांतराला गोरे यांनी केलेले मुखपृष्ठ स्वतंत्र कलाकृतीच्या दर्जापर्यंत पोहोचावे अशा गुणवत्तेचे आहे. त्यात एक मुखवटा दिसतो. क्रेयॉनच्या जोरकस रेषांनी आणि रंगांनी खंडित झालेला. बारकाईने पाहिले तर त्यात विहंगम दृश्य असलेले निसर्गदृश्य आणि मानवी मुखवटा अशी दोन परिप्रेक्ष्ये दिसतात. लिअरच्या शोकांतिकेतली व्यक्तिगत पातळीवरची उत्कटता आणि भयचकित करणारे माणसाचे सार्वकालिक वास्तव म्हणजे आधुनिक एक्स्प्रेशनिस्ट शैलीतले शेक्सपीअरचे इन्टरप्रिटेशन अथवा दृश्यप्रतिमेतून लावलेला एक अन्वयार्थच आहे.

           प्रभाकर गोरे यांना साहित्याची आवड होती. वसंत बापट, व्ही.एस. गायतोंडे यांच्याशी त्यांचा परिचय होता. समाजवादी वर्तुळातही ते काही काळ होते. ‘रचना’ या द्वैमासिकाचे ते एक संपादक होते. शब्द आणि दृश्य माध्यमे यांचे परस्परसंबंध शोधण्यात त्यांना रस होता. त्या शोधाचा एक भाग म्हणून त्यांनी काही पेन्टिंग्जही केली होती. पुढेपुढे त्यांच्या मनस्वी स्वभावामुळे आणि वैचारिक घोटाळ्यांमुळे त्यांच्या  कामात अनियमितपणा आला आणि त्यांचे काम थांबले.

           मूत्रपिंडाच्या विकाराने वयाच्या चौपन्नाव्या वर्षी गोरे यांचे निधन झाले. मुखपृष्ठकलेच्या मुख्य प्रवाहापेक्षा वेगळ्या, स्वतंत्र पद्धतीने काम करणार्‍या प्रभाकर गोर्‍यांचे अनुकरण कोणी केले नाही. पण प्रवाहाबाहेर राहूनही एकूण अभिरुचीवर प्रभाव पाडणारे चित्रकार म्हणून त्यांची ओळख कायम राहील.

- दीपक घारे

गोरे, प्रभाकर