Skip to main content
x

गोवारीकर, वसंत रणछोडदास

          संत रणछोडदास गोवारीकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचं बालपण कोल्हापूरच्या कोष्टी गल्लीत गेले. त्यांचे वडील इंजिनिअर होते. वडिलांना वाचनाची प्रचंड आवड होती. त्यामुळे घरात पुस्तकांचा जंगी खजिनाच होता. पुस्तकांच्या सहवासात राहून, वसंतरावांनाही लहानपणापासूनच वाचनाचा छंद लागला. या पुस्तकांमधूनच त्यांना हेन्री फोर्ड भेटला. वसंतराव म्हणतात, ‘‘हेन्री फोर्ड हा माझा आदर्श होता आणि त्याच्यासारखाच आपणही मोटारीचा कारखाना काढायचा, असे माझे स्वप्न होते.’’

त्या वेळी लहानग्या वसंतने मोटार बनवण्याचा. नुसता ध्यासच घेतला नाही, तर एक छोटेखानी मोटार तयार करून ती गल्लीत फिरवलीदेखील! एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्याशिवाय तुम्ही आयुष्यात काहीही करू शकत नाही, यावर वसंतरावांचा पूर्ण विश्वास आहे. आयुष्यात अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी जे यश संपादन केले, त्यातून त्यांचे हे तत्त्वज्ञान त्यांनी सिद्ध करून दाखवले.

कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून एम.एस्सी. पदवी मिळविल्यानंतर लंडनला रसायन अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी ते रवाना झाले. १९५९ ते १९६७ या काळात लंडनमधील बर्मिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी त्या विषयातील मास्टर्स आणि डॉक्टरेटची पदवी प्राप्त केली. त्यानंतर प्रथम त्यांनी हार्वेल येथील अ‍ॅटॉमिक एनर्जी रिसर्च एस्टॅब्लिशमेंटमध्ये आणि नंतर समरफिल्ड रिसर्च स्टेशन, ब्रिटिश मिनिस्ट्री ऑफ एव्हिएशन येथे संशोधनात्मक काम केले. त्याच दरम्यान डॉ.गोवारीकरांनी ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांच्या काही परीक्षांसाठी बाह्य-परीक्षक म्हणून काम पाहिले आणि परगॅमॉनच्या संपादक मंडळाचे सदस्य या नात्याने अनेक वैज्ञानिक पुस्तकांचे संपादनही केले.

संशोधन आणि विज्ञानविषयक साहित्य या दोन्ही क्षेत्रांमध्ये अनुभव घेत, डॉ.गोवारीकर रमून गेले होते. लंडनमध्येच संशोधनाच्या क्षेत्रात उत्तम कारकीर्द करून तिथेच स्थिर होण्याच्या विचारात असतानाच, त्यांना भारतीय अंतराळ संशोधन केंद्रात अर्थात इस्रो येथे पाचारण करण्यात आले. संस्थेचे संचालक डॉ.विक्रम साराभाई यांनी गोवारीकर यांची प्रगल्भ बुद्धी जोखली होती.  वैज्ञानिक म्हणून स्वबळावर, स्वचातुर्याने, एखादे नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची गोवारीकरांची क्षमता लक्षात घेऊन त्यांच्यावर अग्निबाणासाठी लागणारे इंधन तयार करण्याची जबाबदारी सोपवली गेली. सुरुवातीला अग्निबाणाला लागणारे घनइंधन विकसित करण्यासाठी डॉ.वसंत गोवारीकर इस्रो येथे प्रॉपेलंट इंजिनिअर म्हणून रुजू झाले.

१९६७ साली केरळ राज्यातल्या थुंबा या गावी एका वापरात नसलेल्या जुन्या चर्चमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय बनावटीच्या अग्निबाणासाठी लागणारे घनइंधन तयार करण्याच्या प्रकल्पाला सुरुवात झाली आणि त्यातूनच पुढे जगातले सर्वोत्कृष्ट दर्जाचे इंधन घडवले गेले. जुन्या चर्चचे पुढे भव्य वास्तूत रूपांतर झाले. तेथे संशोधन आणि विकसन विभाग स्थापन केला गेला एवढेच नाही, तर त्यांनी तेथे प्रॉपेलंट इंधन कॉम्प्लेक्स, अमोनियम परक्लोरेट प्लांट यांसारखी  युनिट्सही स्थापली आणि वाढवली. सॉलिड प्रॉपेलंट स्पेस बूस्टर प्लांटहे युनिट तर नंतरच्या काळात जगातले सर्वांत मोठे घनइंधन तयार करणारे युनिट ठरले. डॉ. वसंत गोवारीकर भारताच्या अवकाश प्रॉपेलंट तंत्रज्ञानाचे (एच.टी.पी.बी.) जनक मानले गेले.

पुढे १९७९ साली त्यांची विक्रम साराभाई अवकाश केंद्राच्या संचालकपदी नियुक्ती झाली. त्यांच्या संचालकपदाच्या कारकिर्दीत एसएलव्ही-३ प्रकल्प सुरू झाला. त्याद्वारे अग्निबाणाच्या साहाय्याने, भारताचा पहिला उपग्रह पृथ्वीभोवतालच्या कक्षेत स्थिर केला गेला आणि १९८३ साली एसएलव्ही-३ हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाला.

१९८६ ते १९९३ या कालावधीत डॉ. वसंत गोवारीकर यांची भारतीय शासनाच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाचे सचिव आणि पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. त्या कालावधीत सलग चार पंतप्रधानांसाठी त्यांनी हे काम केले. विज्ञान सर्वसामान्य जनमानसात रुजले पाहिजे, भारतातल्या प्रत्येक माणसाला वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे, असे विचार या द्रष्ट्या शास्त्रज्ञाच्या मनात सतत रुंजी घालत होते. त्या विचारांतून त्यांना देशभरात एक वैज्ञानिक चळवळ रुजवण्याची कल्पना सुचली. त्यासाठी त्यांनी २८ फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिनम्हणून साजरा केला जावा, असे आवाहन केले. त्यानुसार भारतात १९८७ सालापासून ही प्रथा अमलात आली आहे. दरवर्षी एखादी मध्यवर्ती वैज्ञानिक संकल्पना घेऊन देशभरातल्या गावागावांतून विद्यार्थ्यांसाठी, विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. सर्व वयोगटांतल्या लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, वाढावा या दृष्टीने अनेकविध कार्यक्रम राबवले जातात. त्यांमध्ये पथनाट्ये, व्याख्याने, प्रयोग मेळावे, विविध विषयांवरील कृतिसत्रे, सहली, अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा अंतर्भाव असतो.

त्यांनी सुरू केलेला आणखी एक अत्यंत कल्पक, देशव्यापी कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय बालविज्ञान काँग्रेस! शालेय शिक्षण घेणाऱ्या तमाम भारतीय बालवैज्ञानिकांसाठी हा कार्यक्रम म्हणजे एक आनंदाची आणि ज्ञान संपादन करण्यासाठीची मोठी पर्वणीच असते. शालेय विद्यार्थ्यांप्रमाणेच, वैज्ञानिक दृष्टिकोन हा सर्व देशभरातल्या जनमानसात रुजवण्यासाठी, डॉ.गोवारीकरांच्या प्रयत्नाने एन.सी.एस.टी.एस.च्या जाळ्याची देशव्यापी घडी बसवण्यात आली, ज्यामध्ये आकाशवाणी, दूरदर्शन, स्वयंसेवी गट, स्वयंसेवी संस्था, अशा देशभरातल्या जवळपास ५० संस्थांनी एकत्र येऊन, देशात वैज्ञानिक चळवळ रुजवण्याच्या स्वप्नांना वास्तवात आणण्याचे प्रयत्न सुरू केले.

१९९० सालच्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या वडोदरा येथे झालेल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते आणि त्यांच्या अध्यक्षीय भाषणाचा विषय भारताची लोकसंख्याहा होता. भारताची लोकसंख्या आता स्थिरीकरणाकडे (जन्म आणि मृत्युदर समान झाल्याने लोकसंख्या तेवढीच राहणे) वाटचाल करीत आहे, हा त्यांचा निष्कर्ष आता जगन्मान्य झाला आहे.

१९९३ ते १९९५ या काळात खतांविषयीच्या एका प्रकल्पावर भारत सरकारने डॉ.वसंत गोवारीकर यांची एकसदस्यीय समिती नेमली होती. २००५ साली त्यांच्या प्रमुख संपादकपदाच्या नेतृत्वाखाली द फर्टिलायझर एनसायक्लोपीडियाया प्रचंड ग्रंथाचे काम पुरे झाले. हा जगातील सर्व प्रकारच्या खतांची माहिती देणारा अतिशय परिपूर्ण असा ग्रंथ असून त्याचे काम अत्यंत सूक्ष्म पातळीवर अभ्यास करून, नेटकेपणाने पुरे केलेले आहे. अशा प्रकारचा खतांसंबंधीचा संपूर्ण माहिती देणारा जगातला हा पहिलाच ग्रंथ आहे.

आज डॉ. वसंत गोवारीकर यांना मॉन्सूनचा अंदाज वर्तवणाऱ्या प्रारूपाचे जनक म्हणून सारा देश ओळखतो. नैर्ऋत्य मौसमी पावसाच्या आगमनासंबंधीचे अचूक आराखडे बांधण्याचे तंत्रज्ञान आणि पद्धत त्यांनी विकसित केली व त्यानुसार दरवर्षी मे महिन्यात आगामी मॉन्सूनचे भाकीत वर्तवण्यात येते. ते बहुतांशी अचूक ठरल्याने, समस्त भारतीय शेतकऱ्यांसाठी मोठीच मदत मिळाली आहे. 

१९९५ ते १९९८ या तीन वर्षांच्या कालावधीत डॉ. गोवारीकरांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिले. इस्रोचे सतीश धवन डिस्टिंग्विश्ड प्राध्यापकम्हणून इस्रोतील तरुण शास्त्रज्ञांनाही त्यांनी मार्गदर्शन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे ते अध्यक्ष होते. इंफाळ येथील मणिपाल विद्यापीठाच्या कोर्टावरही त्यांची नेमणूक झाली होती. भारत सरकारच्या शुगर टेक्नॉलॉजी मिशनच्या स्थापनेपासून, म्हणजे १९९३ सालापासून ते त्याच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष होते.

त्यांचे २०० हून अधिक विज्ञानविषयक शोधनिबंध, अनेक विज्ञान पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांचे हे लेख आणि पुस्तके अनेक विद्यापीठांच्या आणि बोर्डांच्या पाठ्यपुस्तकांमधून अभ्यासासाठी लावले गेले आहेत.

द अ‍ॅस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाया संस्थेतर्फे २००४ साली अग्निबाणाच्या इंधनासंबंधी त्यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना आर्यभट्टहा अत्यंत मानाचा पुरस्कार मिळाला. त्यांना अनेक संस्थांची सुवर्णपदके, मानाच्या पदव्या, तसेच  पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुरस्कार मिळालेले आहेत.

डॉ. मानसी राजाध्यक्ष

संदर्भ :
१.दै. महाराष्ट्र टाइम्स; ३० मार्च २००१. २.दै. सकाळ; १८ नोव्हेंबर २००४. ३.श्री दीपलक्ष्मी दिवाळी अंक; २००४.

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].