Skip to main content
x

गुणे, जग्गानाथ गणेश

कुवलयानंद

     स्वामी कुवलयानंद म्हणजे पूर्वाश्रमीचे जगन्नाथ गणेश गुणे हे थोर योगवैज्ञानिक होते. त्यांनी प्राचीन योगपरंपरा आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर पारखून योगाचा प्रसार अखिल मानवजातीच्या फायद्यासाठी केला.

     जगन्नाथ गणेश गुणे यांचा गुजरातमधील दाभोई या खेड्यात जन्म झाला. त्यांचे वडील गणेशराव हे शिक्षक, तर आई सरस्वती गृहिणी होती. हलाखीची स्थिती असल्याने शिक्षण घेण्यासाठी त्यांना फार कष्ट करावे लागले. १९०३ साली मॅट्रिकच्या परीक्षेत त्यांना ‘जगन्नाथ शंकरशेट संस्कृत शिष्यवृत्ती’ मिळाल्यामुळे बडोद्याच्या महाविद्यालयात शिक्षण घेऊन, १९१० साली ते पदवीधर झाले. बडोद्यातील जुम्मादादा व्यायामशाळेचे राजरत्न माणिकराव यांनी स्वामीजींना १९०७ ते १९१० या काळात भारतीय पद्धतीचे शारीरिक शिक्षण दिले. बडोद्याच्या विद्यापीठात प्राध्यापक असलेले अरविंद घोष व त्याचबरोबर लोकमान्य टिळकांचा प्रभाव त्यांच्यावर विद्यार्थिदशेतच पडला. आपले जीवन मानवजातीच्या सेवेसाठी अर्पण करायचे त्यांनी ठरविले व ब्रह्मचर्य व्रत स्वीकारले.

      स्वामीजींनी अमळनेर येथील खानदेश शिक्षण संस्था स्थापन करण्यास मदत केली. नंतर १९१६ साली ते तेथील राष्ट्रीय महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. १९२० साली ब्रिटिश सरकारने प्रखर राष्ट्रीयतेचे वातावरण असलेले हे महाविद्यालय बंद केले. १९१६ ते १९२३ या कालावधीत प्राचीन भारतीय संस्कृती हा विषय ते शाळेत व महाविद्यालयात शिकवीत असत.

     परमहंस माधवदासजी या थोर बंगाली योगी व्यक्तीशी  १९१९ साली त्यांची भेट झाली. माधवदासजी अनेक वर्षे हिमालयात राहून नंतर बडोद्याजवळ नर्मदा नदीच्या काठावर मालसार येथे आले होते. त्यांनी स्वामीजींना योगाचे अंतरंग उघडून दाखविले. या गोष्टींचा स्वामीजींच्या जीवनकार्यावर मोठा प्रभाव पडला.

      स्वामीजी आदर्शवादी व आध्यात्मिक प्रवृत्तीचे असूनही तर्कनिष्ठ होते. त्यामुळेच योगामुळे शारीरिक स्तरावर होणार्‍या परिणामांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण त्यांना जाणून घ्यायचे होते. म्हणून १९२०-२१ साली त्यांनी योगाच्या काही अंगांचा शरीरावर होणारा परिणाम बडोदा हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेत पारखून घेतला. त्यांना योगसाधनेने आलेलेे अनुभव व वैज्ञानिक प्रयोगांचे वस्तुनिष्ठ परिणाम यांची तुलना केल्यावर योगाचा संदेश केवळ एकट्या व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक व आत्मिक उन्नतीसाठी नसून तो सार्‍या मानवतेसाठी आहे ही त्यांची श्रद्धा बळकट झाली व त्या दिशेने त्यांचे कार्य सुरू झाले. योगाच्या वैज्ञानिक अभ्यासासाठी प्रयोगशाळा हवी म्हणून १९२४ साली त्यांनी लोणावळ्याला ‘कैवल्यधाम हेल्थ अ‍ॅण्ड योग रिसर्च सेंटर’ स्थापन केले. त्याच वर्षी त्यांनी योगाच्या वैज्ञानिक संशोधनाला वाहिलेले ‘योगमीमांसा’ हे वैज्ञानिक त्रैमासिक सुरू केले.

     पाश्चात्त्य संशोधकही या प्रयोगांनी प्रभावित होऊन लोणावळ्याला येऊ लागले. १९२८ साली डॉ. जोसेफाइन राथबोन, तर १९५८ साली कॅलिफोर्निया विद्यापीठाचे डॉ. वेंगर व मिशिगन विद्यापीठाचे डॉ. बागची काही काळ तेथे वास्तव्य करून गेले.

     कैवल्यधामची मुंबई येथील शाखा १९३२ साली काही काळ सांताक्रूझ येथे, तर १९३६ साली चौपाटी येथे स्थापन झाली. योगाभ्यासातून रोगनिवारण व स्वास्थ्यसंवर्धन हे त्यांचे ब्रीद आहे. याच सुमारास अलिबागजवळ कणकेश्वर येथे व पुढे सौराष्ट्रातील राजकोट येथे १९४३ साली कैवल्यधामच्या आध्यात्मिक केंद्रांची स्थापना झाली. १९४४ साली वैज्ञानिक व साहित्यिक संशोधनाला वाहिलेली ‘कैवल्यधाम श्रीमान माधव योग मंदिर समिती’ लोणावळ्याला स्थापन झाली. १९५१ साली गोवर्धनदास सक्सेरिया महाविद्यालयाची स्थापना झाली. त्याचा हेतू मानवजातीची नि:स्वार्थ सेवा करण्यासाठी तरुणांची आध्यात्मिक व बौद्धिक तयारी करून घेणे हा होता. योगाद्वारे जुनाट आजारांवर उपचार करण्याच्या उद्देशाने  १९६१ साली गुप्ता रुग्णालयाची  स्थापना झाली. स्वामीजींनी ‘आसन’ आणि ‘प्राणायाम’ ही दोन पुस्तके लिहिली. त्यांनी ‘गोरक्षशतकम्’चे संपादन केले. ८३ वर्षांचे कृतार्थ आयुष्य जगून स्वामी कुवलयानंद निजधामी गेले.

डॉ. वीणा लोंढे

गुणे, जग्गानाथ गणेश