Skip to main content
x

गुरव, श्रावण गोपाळ

             पयोजित कलेत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केलेल्या श्रावण गोपाळ ऊर्फ एस.जी.गुरव यांचा जन्म खानदेशातल्या सानेगुरुजींच्या कर्मभूमीत म्हणजेच अमळनेर येथे झाला. श्रावण एक वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबाची सर्व जबाबदारी आई सखूबाईवर येऊन पडली. अमळनेरच्या प्रताप गिरणीमध्ये काम करता करता आईने लहानग्या श्रावणचा व इतर भावंडांचा सांभाळ केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आईच्या मायेखाली श्रावणचे शालेय शिक्षण झाले.

             ‘शालेय शिक्षणाचे धडे गिरवतागिरवता चित्रकार हो’ असा चित्रकार व कलाशिक्षक प्रभाकर शुक्ल यांनी दिलेला सल्ला गुरव यांनी मोलाचा मानला व त्यांनी मुंबई गाठली. तेथे सर जे.जे.इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमध्ये त्यांनी प्रवेश मिळविला. पेंटिंग न करता कमर्शिअल आर्टच करावे या विचारातून त्यांनी १९५८ साली कमर्शिअल आर्टची पदविका प्राप्त केली. उपयोजित कलेच्या (अप्लाइड आर्टच्या) तिसऱ्या वर्षीच त्यांना पहिला ‘कमर्शिअल जॉब’ मिळाला.

             प्रदर्शन संकल्पना (एक्झिबिशन डिझाइनिंग) म्हणजे काय? प्रदर्शनाच्या स्टॉलची मध्यवर्ती कल्पना (थीम) कशी असते ? ग्राहक कोण? आणि त्याचे अंदाजपत्रक (बजेट) कसे करायचे ? याची माहिती ताम्हाणे यांच्या कार्यालयामध्ये गुरवांना शिकायला मिळाली. गुरवांना पहिली नोकरी मिळाली ‘उल्का अ‍ॅडव्हर्टायझिंग’ इथे र.कृ.जोशी आणि नौशिर छापगरांच्या मार्गदर्शनाखाली गुरवांनी खूप कामे केली. उल्कामधून ‘अय्यर्स अ‍ॅडव्हर्टायझिंग’मध्ये गुरवांना आमंत्रण मिळाले. उल्कामधला अनुभव वेगळा आणि छान होता. त्या अनुभवावर त्यांनी अय्यर्समध्ये  महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. कामात प्रगती आणि आनंद मिळत गेला.

             १९७० च्या अखेरीस बेन्सन एजन्सीमध्ये गुरव ‘ज्यूनिअर आर्ट डायरेक्टर’ म्हणून रुजू झाले. बेन्सनची टीम, स्टूडिओ मॅनेजमेंट ब्रिटिश धाटणीची होती. कटिंग — पेस्टिंग, स्पे्अरवर्क, स्क्रेपरबोर्ड ते हाफटोन फिनिशिंगपर्यंतची अनेक कामे करणारी इलस्ट्रेटर मंडळी येथे होती. बेन्सनच्या साडेतीन वर्षांत गुरव यांची वरच्या हुद्द्यावर बढती झाली. पुढे फ्रँक सिमॉइस यांनी आपल्याच नावाने एजन्सी सुरू केली. गुरव सिमॉइसमध्ये दाखल झाले. 

             ताजमहाल हॉटेल, सीमेन्स इंडिया, रेमण्ड्स, ब्लूस्टार अशा मोठ्या कंपन्यांच्या जाहिरातमोहिमा गुरवांना करायला मिळाल्या. या कामांमुळे गुरवांना जाहिरात क्षेत्रातले अनेक पुरस्कार मिळाले. दरम्यान स्वतःचे ‘ओम क्रिएशन’ही गुरवांनी सुरू केले होते. हा त्यांचा स्टुडीओ कुलाबा येथील चैत्रा एजन्सीजवळ होता. चैत्राच्या ब्रॅन्डन परेरांनी गुरवांना चैत्रा अ‍ॅडव्हर्टायझिंगमध्ये बोलावून घेतले. चैत्राच्या कामात असताना ‘ओम क्रिएशन’चा व्याप वाढल्यामुळे कुलाबाच्या कॉजवे हाउसवरून मोदी स्ट्रीट, फोर्ट येथे गुरवांनी आपला स्टूडिओ मोठ्या जागेत हलवला.

             कृष्णमूर्तींनी ‘मुद्रा अ‍ॅड एजन्सी’ मुंबईत सुरू केली तेव्हा या एजन्सीच्या आर्ट स्टूडिओची सर्व जबाबदारी त्यांनी गुरवांकडे सोपवली. सायमन फर्नांडिससारख्या कॉपिरायटर सोबत गुरवांनी तेथे काम केले. अंबानी कुटुंबीयांजवळ जाण्याची संधी या एजन्सीमुळेच गुरवांना मिळाली.

             जाहिरात क्षेत्रातील पहिला पुरस्कार त्यांना १९५७ साली मिळाला. कॅग डिस्प्लेसाठी त्यांना दिल्लीची तीन वेळा पारितोषिके मिळाली. तेव्हा ते ‘उल्का’मध्ये होते. ‘सिमॉइस’ एजन्सीत असताना ताज हॉटेल व ‘रेमण्ड वुलन’च्या जाहिरातमोहिमेसाठी त्यांना पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनातही त्यांच्या कलाकृतीला ‘ताम्रपट’ मिळाला होता. प्रेस सिंडिकेटच्या समाजसेवा जाहिरातमोहिमेला (पब्लिक सर्व्हिस कॅम्पेन) ‘कॅग’चे पारितोषिक मिळाले. ‘ओम क्रिएशन’च्या माध्यमातून ‘फ्रीलान्स आर्टिस्ट’ म्हणून काम करीत असताना भारत सरकारचा ‘कॉर्पोरेट बुक’साठी पुरस्कार, चैत्रा एजन्सीमध्ये असताना स्टेट बँकेच्या जाहिरातमोहिमेसाठी पुरस्कार, असे जाहिरात क्षेत्रातले अनेक पुरस्कार श्रावण गुरव यांना मिळाले आहेत.

             उपयोजित स्वतंत्र चित्रकार म्हणून काम करताना त्यांचे कलाकृती साकारण्याचे कामही सुरूच राहिले. बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शन यांच्या प्रदर्शनांत त्यांच्या कलाकृती प्रदर्शित झालेल्या आहेत. त्यांच्या कलाकृतींची जहांगीर कला दालन, आर्टिस्ट सेंटर, इत्यादी ठिकाणी एकल प्रदर्शने आयोजित केली गेली आहेत.

             वास्तववादी व मानवाकृतिप्रधान पद्धतीच्या त्यांच्या कलाकृती जनसामान्यांनाही भावतात. इलस्ट्रेटर ते आर्ट डायरेक्टर अशी जाहिरात क्षेत्रातली विविध पदे भूषवून त्यांनी चित्रकार म्हणूनही कलाक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

- सुभाष पवार

गुरव, श्रावण गोपाळ