गवई, मधुकर गणेश
मधुकर गणेश गवई यांचा जन्म अमरावती येथे एका दलित कुटुंबात झाला. त्यांचे वडील गणेश आकाजी गवई सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. भारतीय संसदीय कायदा (१९३५) यानुसार निर्माण झालेल्या कायदे मंडळाच्या मध्य प्रांत आणि वऱ्हाड याचे ते निवडून आलेले सदस्य होते.
मधुकर गवई यांनी अमरावती येथील किंग एडवर्ड महाविद्यालयामधून (आताचे विदर्भ महाविद्यालय) बी.ए. पदवी प्राप्त केली. १९५९मध्ये त्यांची भारतीय पोलीस सेवेमध्ये निवड झाली. मधुकर गवई हे दलित समाजातून आय.पी.एस. उत्तीर्ण झालेले पहिलेच अधिकारी होत. आपल्या कार्यकालात त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पोलीस अधीक्षक हे महत्त्वाचे पद भूषविले. नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख, महाराष्ट्र राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख या महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही त्यांनी पार पाडल्या .
मधुकर गवई यांना मुंबई, पुणे आणि नागपूर या महत्त्वाच्या शहरांच्या पोलीस आयुक्तपदी काम करणारे पहिले अधिकारी असण्याचा मान मिळाला. त्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला, तसेच विशेष पोलीस सेवेसाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकानेही त्यांना सन्मानित करण्यात आले. १९७९ मध्ये पोलीस महासंचालक (आय.जी.पी.) या पदावरून निवृत्त झाल्यावर गवई यांची नियुक्ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून करण्यात आली. या पदावर त्यांनी चार वर्षे काम केले. याच काळात त्यांची नियुक्ती राज्य ग्राहक आयोगावर झाली होती.
पोलीस सेवेबरोबरच सामाजिक क्षेत्रातही गवई कार्यरत होते. दलित समाजाच्या उत्कर्षासाठीही त्यांनी बरेच कार्य केले, तसेच येथे मुस्लीम मुलांसाठी असलेल्या शाळेलाही त्यांनी मदत केली होती.
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये राज्यपालांनी नेमलेले प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुंबईमध्ये वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी मधुकर गवई यांचा मृत्यू झाला.
दलित समाजातील पहिले आय.ए.एस. अधिकारी पद्माकर गवई हे त्यांचे कनिष्ठ बंधू होत. मधुकर गवई यांची दोनही मुले प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. ज्येष्ठ चिरंजीव शशीशेखर गवई हे भारतीय परराष्ट्र सेवेमध्ये अधिकारी असून सध्या ते कॅनडामध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांचे धाकटे चिरंजीव सतीश गवई हे सध्या म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.