Skip to main content
x

गवई, पद्माकर गणेश

          द्माकर गणेश गवई यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील गणेश आकाजी गवई हे लंडन येथे झालेल्या गोलमेज परिषदेत सहभागी झाले होते. दलित समाज हा हिंदू समाजातील एक महत्त्वाचा घटक असल्याचे प्रतिपादन त्या वेळी त्यांनी केले होते.

      गवई यांनी नागपूर येथील मॉरिस महाविद्यालयातून संस्कृत आणि इंग्रजी वाङ्मय या विषयांत पदवी संपादन केली. नंतर याच महाविद्यालयातून त्यांनी इंग्रजी वाङमयात  एम.ए. केले.

      १९५० साली गवई महाराष्ट्रातून भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झालेले पहिले दलित अधिकारी ठरले. सेवेच्या आरंभी त्यांची नियुक्ती मॅगनिज ओअर इंडिया लि., नागपूर या केंद्रीय सार्वजनिक उपक्रमाचे कार्यकारी संचालक म्हणून झाली. ते या पदावर असतानाच या महामंडळास सर्वोत्तम केंद्रीय उपक्रम म्हणून पुरस्कार मिळाला. नागपूर महानगर पालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे तेथील लोकनियुक्त शासन राज्यसरकारने १९६४मध्ये बरखास्त केले आणि तेथे प्रशासकांची नेमणूक करण्यात आली. परंतु दुर्दैवाने या प्रशासकांच्या कार्यकालात नागपूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती अधिकच ढासळत गेली. तेव्हा शासनाने नागपूर महानगरपालिकेच्या नव्याने निवडणुका घेऊन तेथे लोकनियुक्त शासन आणले आणि गवई यांची नियुक्ती महानगरपालिका आयुक्त या पदावर करण्यात आली. त्यांनी अवघ्या दोन वर्षात प्रचंड आर्थिक सुधारणा आणि शिस्त बाणवून महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती भक्कम केली.

        त्यानंतर १९७५ च्या आणीबाणीच्या वेळी गवई हे राज्याचे गृह सचिव होते तर त्यांचे ज्येष्ठ बंधू मधुकर गवई हे नागपूरचे पोलीस आयुक्त होते. या बंधुद्वयीनी  महाराष्ट्रात आणीबाणीचे अतिरेक शक्य तेवढे रोखले.

गवई यांचे इंग्रजी भाषेवर असामान्य प्रभुत्व होते. कोणत्याही विषयावर चटकन पक्की पकड घेण्याचा त्यांचा गुण, विषयाचे आर्जवी आणि स्पष्ट, परखड प्रतिपादन तसेच कार्यकुशलता या त्यांच्या गुणामुळे इंदिरा गांधी अत्यंत प्रभावित झाल्या. त्यांनी गवई यांना पंजाबमधील राष्ट्रपती राजवटीच्या काळात राज्यपालांचे सल्लागार म्हणून १९८१-८२ मध्ये नेमणूक केली. त्यानंतर  दिल्ली या राज्याचे नायब राज्यपाल म्हणून १९८४ मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली.

        इंदिराजींच्या भोवती कार्यरत असलेल्या  तत्कालीन चौकडीच्या हस्तक्षेपाला न जुमानता त्यांनी कणखरपणे कारभार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही विशिष्ट व्यक्ती दुखावल्या गेल्या.  इंदिराजींची ३१ऑक्टोबर१९८४ रोजी दुर्दैवी हत्या झाल्यानंतर, गवई यांनी शिखविरोधी दंगलीत बघ्याची भूमिका घेतली अशा प्रकारचा अपप्रचार या  दुखावल्या गेलेल्या व्यक्तींनी केला. त्यामुळे राजीव गांधी यांनी अचानक गवई यांचा सक्तीने राजीनामा घेतला. त्यानंतर मात्र काही काळाने या कार्यक्षम दलित अधिकाऱ्यावर काहीसा अन्याय झाला आहे याची जाणीव होऊन राजीव गांधी यांनी गवई यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्षपद देऊ केले. परंतु एकदा राज्यपालपद भूषवलेल्या अतिशय स्वाभिमानी अशा गवई यांनी हे पद नाकारले. यानंतर काही काळाने गवई यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षाने त्यांना १९९१ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीत बुलढाणा मतदार संघातून उभे केले. ते प्रचंड बहुमताने जिंकणार असे स्पष्ट संकेत असतानाच २१मे१९९१ रोजी राजीव गांधी यांची दुर्दैवी हत्या झाली. त्यामुळे उसळलेल्या सहानुभूतीच्या लाटेत गवई पराभूत झाले. भाजपात त्यांच्या प्रशासकीय कौशल्य व अनुभव यांचे योग्य चीज करून घेतले नाही असे वाटल्यामुळे भाजप सत्तेवर येण्याच्या केवळ सहा महिने आधी त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर गवई यांची प्रकृती ढासळत गेली. शिखविरुद्ध दंगलीत चौकशीसाठी नेमलेल्या नानावटी आयोगासमोर त्यांच्या एका सहकाऱ्याने त्यांच्याविरुद्ध खोटी साक्ष दिली. या कारणाने नानावटी आयोगाने आपल्या अहवालात गवई यांच्यावर ठपका ठेवला. याविरुद्ध गवई यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका प्रलंबित असतानाच त्यांचा मूत्रपिंड विकाराने मृत्यू झाला.

- अरुण पाटणकर

गवई, पद्माकर गणेश