Skip to main content
x

घाटे, निरंजन सिंहेंद्र

निरंजन घाटे यांचा जन्म मुंबई, गिरगाव येथे झाला. यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. पुणे विद्यापीठातून भूशास्त्रातील एम. एस्सी. ही पदवी त्यांनी संपादन केली. १९६८ ते १९७७ या काळात त्यांनी पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागात प्राध्यापकीदेखील केली. मात्र नंतर ते आकाशवाणीकडे वळले. १९७७ ते १९८३ या काळात यांनी आकाशवाणीच्या नागपूर, जळगाव, सांगली या केंद्रांवर अधिकारी म्हणून काम केले. या काळात आकाशवाणीवर रूपके, एकांकिका, संवाद, भाषणे अशा विविध स्वरूपांचे सुमारे ६०० कार्यक्रम त्यांनी सादर केले. त्यांपैकी अनेक कार्यक्रम विज्ञानाशी संबंधित होते. १९८१ ते १९९३ या काळात पुण्यातील महात्मा फुले वस्तू संग्रहालयात आधी उपसंचालक व नंतर संचालक म्हणून ते कार्यरत होते. या नंतरच्या काळात मात्र त्यांनी स्वतःला पूर्ण वेळ लेखनाला वाहून घेतले. घाटे यांनी विज्ञानप्रसाराचा वसा आपल्या कार्यक्षेत्रात व लिखाणात जपलेला आहे.

घाटे हे विज्ञान लेखक म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. शास्त्रीय ग्रंथ, शास्त्रीय नियतकालिके आणि पाठ्यपुस्तके ह्यांमधील विज्ञानाच्या विविध शाखांमधील ज्ञान बाहेर काढून साध्या सोप्या भाषेतून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी आपल्या विपुल लेखनाद्वारे केले आहे. वैज्ञानिक सत्य आणि कल्पनाशक्ती यांचा मेळ घालून त्यांनी जशा विज्ञान कथा लिहिल्या आहेत, तसेच विज्ञानाचे अंतरंग उलगडणारे अनेक लेख पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी एकूण १५० पुस्तके लिहिली आहेत. त्यांपैकी १३० पुस्तके विज्ञानविषयक आहेत.

घाटे यांच्या वाङ्मयीन लेखनाची सुरुवात सामाजिक आशयाच्या कथांपासून झाली, तरी लवकरच ते विज्ञान कथांकडे वळले. १९६५पासून विविध विषयांवर वर्तमानपत्रांमधून व नियतकालिकांमधून स्फुट लेखनास त्यांनी सुरुवात केली. १९७१, १९७२  व १९७४ अशी तीन वर्षे त्यांच्या विज्ञान कथांना मराठी विज्ञान परिषदेचे पुरस्कार लाभले. त्यांच्या १० विज्ञान कादंबर्‍या व १७ विज्ञान कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘पॉप्युलर सायन्स’ वर त्यांनी ७८ पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या ‘वसुंधरा’ या पुस्तकाला १९७८-१९७९ या वर्षाचा राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. याशिवाय ‘स्पेस जॅक’ (१९८५-१९८६), ‘एकविसावे शतक’ (१९९७-१९९८) या त्यांच्या विज्ञानविषयक पुस्तकांना राज्य पुरस्कार मिळाले. घाटे यांनी विज्ञान कथांबरोबरच युद्धकथा, गुप्तहेर कथा, साहस कथा लिहिल्या आहेत. युद्धशास्त्र व युद्धकथांवर त्यांची १२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. याशिवाय त्यांनी बालवाङ्मयही विपुल प्रमाणात लिहिले आहे. बालवाङ्मयातील त्यांच्या विविध पुस्तकांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी विनोदी साहित्यही लिहिले आहे.

घाटे यांची संपादक म्हणूनही कारकीर्द घडली आहे. १९८३ ते १९९४ या काळात सृष्टिज्ञान, बुवा, पैंजण, अद्भुत, कादंबरी, ज्ञानविकास, किर्लोस्कर या नियतकालिकांचे संपादन त्यांनी केले. नव्या लेखकांचा शोध घेऊन त्यांनी त्यांना लिहिते केले. विज्ञान लोकप्रिय करण्याच्या उद्देशाने त्यांनी विज्ञान लेखकांचे मेळावे, वासंतिक शास्त्रीय व्याख्यानमाला, शारदीय शास्त्रीय व्याख्यानमाला, शालेय मुलांसाठी विज्ञानवर्ग असे अनेकविध उपक्रम राबवले. घाटे यांचा वाचनाचा व्यासंग दांडगा आहे. त्यांचा ग्रंथसंग्रह मोठा आहे. मोठ्या मेहनतीने आणि चोखंदळपणाने त्यांनी विविध विषयांवरती इंग्रजी, मराठी पुस्तके संग्रहित केली आहेत. ‘जे जे आपणासि ठावे। ते इतरांसि सांगावे। शहाणे करुनि सोडावे। सकल जन॥’ या वृत्तीने त्यांनी वाङ्मयीन कार्य केले आहे.

- मनोहर सोनवणे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].