Skip to main content
x

घळसासी, प्रदीप मधुसूदन

          डॉ. प्रदीप मधुसूदन घळसासी पशुसंवर्धन विभागात इतर सहकाऱ्यांप्रमाणे चाकोरीबद्ध काम करत होते, परंतु सातारा जिल्ह्यातील फलटण येथील प्रथितयश शेतकरीमित्र पद्मश्री बी.व्ही. निंबकर यांच्या संपर्कात ते आले आणि शेळ्या-मेंढ्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ होण्याच्या उद्देशाने त्यांचे संगोपन, पैदास, रोगनियंत्रण याबाबतीत त्यांनी अपार मेहनत, सूक्ष्म अवलोकन यांद्वारे अत्यंत उपयुक्त कार्य उभे केले. शेळ्या-मेंढ्यांमध्ये कृत्रिम रेतनाद्वारे पैदास या विषयावरचा त्यांचा अभ्यास आणि नैपुण्य खास उल्लेखनीय आहे. प्रदीप मधुसूदन घळसासी यांचा जन्म कराड येथे झाला. त्यांनी मुंबई येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पशुवैद्यकीय पदवी प्राप्त करून महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन खात्यात पशुधन विकास अधिकारी या पदावर सेवा केली. निंबकर यांनी कृषी संशोधन संस्थेच्या पशुसंवर्धन विभागात दीर्घकाळ प्रकल्प संचालक व अतिरिक्त संचालक म्हणून कार्य केले आहे.

          डॉ. घळसासी यांनी १९८८मध्ये लॅप्रोस्कोपिक कृत्रिम रेतन करण्याचे प्रशिक्षण न्यूझीलंड येथे घेतले आणि परदेशांमधील शेळ्या-मेंढ्यांमधील कृत्रिम रेतनाचा प्रसार पाहिल्यानंतर याबाबतचे कार्य पुढे नेण्याचे ठरवले. भारतामध्ये कृत्रिम रेतन प्रसाराबाबत नाराजीचाच सूर होता. अशा परिस्थितीत या व्यवसायाशी एकरूप होऊन परदेशातील अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत शेळ्या-मेंढ्यांमध्ये पैदाशीचे उच्च तंत्रज्ञान आत्मसात केले आणि ते शेळ्या-मेंढ्यांमधील कृत्रिम रेतन व भ्रूण प्रत्यारोपण अत्यंत यशस्वीपणे करू लागले. या तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्र शेळी व मेंढी संशोधन व विकास संस्थेच्या प्रक्षेत्रांवर भारतात प्रथमच उच्च उत्पादन क्षमतेच्या दक्षिण आफ्रिकेतील बोअर जातीच्या शेळ्यांचे उत्पादन आणि संकरीकरण घडवून त्याचा प्रसार व कृत्रिम रेतनासाठी रेतमात्रा आणि पैदाशीचे नर यांचे वाटप होत आहे. शेळ्या-मेंढ्यांमध्ये आनुवंशिक सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने डॉ. घळसासी यांनी संस्थेच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केले आहे.

          शेळ्या-मेंढ्यांमधील कृत्रिम रेतन व वीर्य गोठवणे तंत्रज्ञानाचा विकास व प्रचार करण्यासाठी डॉ. घळसासी यांनी संस्थेच्या इमारतीत फलटण येथे अद्ययावत रेतमात्रा उत्पादन प्रयोगशाळा स्थापन केली असून तेथून राज्यात व परराज्यांत रेतमात्रांचे वाटप होत आहे. तसेच शेळी-मेंढीपालक, तंत्रज्ञांना व पशुवैद्यकांना कृत्रिम रेतन प्रशिक्षण देण्यात येत आहे. शेळ्या-मेंढ्यांमध्ये भ्रूण संकलन व प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपी, वंध्यत्व तपासणी व उपचार, कृत्रिम रेतन, अल्ट्रासोनोग्राफी या सर्व आधुनिक तंत्रांचा वापर केला जातो. शेळ्या-मेंढ्यांमधील अचूक रोगनिदान व उपचार यामध्ये डॉ. घळसासी दीर्घ व्यासंगामुळे अनुभवसंपन्न झाले आहेत. त्यांना मेंढ्यांमधील मावा प्रतिबंधक लसीची निर्मिती करण्यातसुद्धा यश आले.

          आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था, ऑस्ट्रिया यांनी कॅमेरून देशातील युनिव्हर्सिटी ऑफ शँग येथील डॉ. ज्युलियस एनडुकुम यांना २००५मध्ये शेळ्या-मेंढ्यांमधील कृत्रिम रेतन वीर्य संकलन व वीर्य गोठवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी निंबकर संस्थेत पाठवले होते. भारत-सिरिया द्विपक्षीय सामंजस्य करारांतर्गत सिरिया देशातील शास्त्रज्ञांना शेळ्या-मेंढ्यांच्या नरांचे वीर्य गोठवण्याचे तंत्र शिकवले गेले व तेथून दमास्कस या शेळ्यांच्या जातीचे व आवासी या मेंढ्यांच्या जातीचे गोठीत वीर्य भारतात आणण्यात आले.

          निंबकर कृषी संशोधन संस्थेच्या पशुसंवर्धन विभागाने ऑस्ट्रेलियाच्या सहकार्याने स्थानिक मेंढ्यांमध्ये अधिक उत्पादन मिळवण्याच्या उद्देशाने आनुवंशिक सुधारणेचा प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे राबवला व त्याची परिणती  ‘नारी सुवर्णा’ हा अधिक उत्पादन देणारा वाण विकसित करण्यात झाली. या प्रकल्पामध्ये डॉ. घळसासी यांचा महत्त्वाचा सहभाग होता. डॉ. घळसासी यांचे अनेक तांत्रिक लेख व संशोधन अहवाल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच त्यांचे शेळी-मेंढीपालनाच्या विविध तांत्रिक विषयांवर सोप्या भाषेत पुस्तिका व तक्तेही प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांच्या कामाची दखल घेण्यात येऊन त्यांना महाराष्ट्र उद्योजक परिषद पुरस्कार (२००१), ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान महाराष्ट्र, पुणे या संस्थेचा उत्कृष्ट पशुवैद्य पुरस्कार (२००८) हे पुरस्कार दिलेले आहेत. डॉ. घळसासी यांना त्यांच्या सुविद्य पत्नी पद्मजा यांचे नेहमीच महत्त्वाचे सहकार्य लाभले. त्याही नारी संस्थेतच परोपजीविशास्त्र विभाग समर्थपणे सांभाळत आहेत.

- डॉ. वसंत नारायण जहागीरदार

घळसासी, प्रदीप मधुसूदन