Skip to main content
x

घोष, पन्नालाल अक्षयकुमार

न्नालाल अक्षयकुमार घोष यांचा जन्म बारीसाल (बंगाल) येथील सध्याच्या बांगलादेशातील अमलज्योती या खेड्यात झाला. आई सुकुमारदेवी त्यांना प्रेमाने पन्ना म्हणायची. आजोबा हरकुमार घोष हे धृपदिये आणि पखवाजवादक होते, तर वडील अक्षयकुमार घोष हे व्यवसायाने वकील होते आणि ते सतार वाजवीत. प्रसिद्ध तबलावादक पं. निखिल घोष हे पन्नालाल यांचे धाकटे भाऊ होत.
पन्नालाल घोषांनी सुरुवातीला सतारवादनाचे धडे घेतले. पण असे म्हटले जाते की, गंगाप्रवाहात वाहून आलेली बासरी त्यांच्या हातात आली व हा गंगाप्रसाद समजून ते बासरीवादनाशी एकरूप झाले. या वाद्याची संगीतक्षमता पन्नालाल घोषांनीच प्रथम निदर्शनास आणून दिली. धृपद ख्यालगायनातील आलापासारखे विलंबित विस्तार आणि तंतुवाद्यातील झालासारखे प्रकार त्यांनी आत्मसात केलेे. परंतु पारंपरिक छोटेखानी, सहा छिद्रांच्या मर्यादा त्यांना जाणवत होत्या.
अविश्रांत परिश्रमाने पन्नालाल यांनी वयाच्या अठराव्या वर्षी ९२ सेंमी. लांबीची
  व २.६ सेंमी. अंतर्व्यासाची, सात छिद्रांची (फुंकीसह आठ छिद्रांची) बासरी बनविली. त्यामुळे बासरीवादनाची मर्यादा दोन सप्तकांवरून तीन सप्तकांवर गेली.
पन्नालाल घोषांच्या बासरीवादनशैलीवर अनेक थोर संगीततज्ज्ञांचा प्रभाव होता. गुरुदेव टागोर यांच्या रवीन्द्र संगीताचे ते भक्त होते. कलकत्त्यातील न्यू थिएटर्समधील वाद्यवृंदात काम करीत असता त्यांना रामचंद्र बोराल यांचे मार्गदर्शन मिळाले. पं. गिरिजाशंकर चक्रवर्ती या संगीततज्ज्ञांकडून त्यांना १९३९ साली सांगीतिक शिक्षण आणि दृष्टी लाभली. ते १९३८ साली ‘सराई नृत्यकला मंडळी’सह संगीतकार म्हणून युरोपच्या दौऱ्यावर गेले. अमृतसरच्या खुशी मुहंमद खाँकडून १९३७ साली त्यांना संगीतातील बारकावे अभ्यासायला मिळाले. त्यांची १९४७ मध्ये अल्लाउद्दिन खाँसाहेबांशी गाठ पडली व पन्नालालांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले.
‘अंजान’ (१९४१), ‘बसंत’ (१९४२), ‘भलाई’, ‘सवाल’ (१९४३), ‘पोलीस’ (१९४४), ‘बीसवीं सदी’ (१९४५), ‘आंदोलन’ (१९५१) हे त्यांनी संगीत दिलेले काही चित्रपट गाजले. ‘मुगल-ए-आझम’, ‘बसंत बहार’ इत्यादी चित्रपटांच्या पार्श्वसंगीतात त्यांच्या बासरीवादनाचा सहभाग आहे. त्यांनी ‘ॠतुराज’, ‘कलिंग विजय’, ‘आंदोलिका’ या वृंदरचनाही
  केलेल्या आहेत. याशिवाय त्यांनी चंद्रमौली, नूपुरध्वनी, दीपावली, पुष्पचंद्रिका या रागांची निर्मितीही केली आहे. त्यांच्या शिष्यपरिवारात हरिपद चौधरी, देवेन्द्र मुर्डेश्वर, बी.डी. देसाई, व्ही.जी. कर्नाड, रघुनाथ सेठ, हरिश्चंद्र कोकरे इत्यादी निष्णात बासरीवादकांचा समावेश आहे.
त्यांनी मुंबई ही आपली कर्मभूमी निवडली होती. १९४० च्या सुमारास ते मुंबईला आले. ते १९५६ पर्यंत मुंबईत होते. त्यांची १९५६ साली दिल्ली आकाशवाणीवर वाद्यवृंद संचालक म्हणून नियुक्ती झाली. अखेरपर्यंत ते दिल्लीतच होते.
पन्नालाल बाबू तरुणवयात बंगालमधील मुष्टियोद्धा होते. ते आध्यात्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या पत्नी पारुल घोष या
  प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अनिल विश्वास यांच्या धाकट्या भगिनी होत. त्या १९३०-४० च्या कालखंडात  प्रसिद्ध पार्श्वगायिका होत्या.
आकाशवाणीच्या प्रत्येक केंद्रावरून, तसेच अनेक संगीत संमेलनांमधून पन्नालाल घोषांची बासरी रसिकांपर्यंत पोहोचली आहे. तसेच एच.एम.व्ही.ने प्रसिद्ध केलेली त्यांची ध्वनिमुद्रणे अत्यंत गाजली.
  पन्नालाल घोष यांचे लोकवाद्य म्हणून दुर्लक्षित राहिलेल्या बासरीवर रागसंगीताचा गंभीर आविष्कार करून या वाद्याला कलासंगीताच्या रंगमंचावर मानाचे स्थान मिळवून देणे हे महत्त्वाचे योगदान होय.

केशव गिंडे

 

घोष, पन्नालाल अक्षयकुमार