घोटगे, नित्या सांबामूर्ती
पुरुषप्रधान समजले जाणारे कोणते व्यावसायिक क्षेत्र स्वातंत्र्योत्तर काळात महिलांनी पादाक्रांत केले नाही? या प्रश्नाचे उत्तर निदान पंचवीस वर्षांपूर्वी ‘पशुवैद्यक क्षेत्र’ असेच होते. अपवादाने एखादी महिला या क्षेत्राकडे वळलीच, तर केवळ शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रापुरती तिची सेवा मर्यादित असायची. अशा वातावरणात तीस वर्षांपूर्वी एक तरुण मुलगी पशुवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेते, केवळ पदवी शिक्षणावरच न थांबता पशुशल्यचिकित्साशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवते, शहरातील श्रीमंत वस्तीत पाळल्या जाणाऱ्या लाडक्या प्राण्यांसाठी ‘पेट क्लिनिक’ उघडून सुखासीन आणि प्रतिष्ठित जीवन न जगता समविचारी महिला पशुवैद्यांना सोबत घेऊन रानोमाळ भटकणाऱ्या आणि पारंपरिक पद्धतीने शेळ्या-मेंढ्या-गायी पाळून उपजीविका करणाऱ्या धनगर-मेंढपाळ जमातीत मिसळते आणि पशुपालनाच्या पारंपरिकच, पण आधुनिक कसोट्यांवर सिद्ध झालेल्या पद्धती त्यांना आत्मसात करायला लावून आर्थिक उन्नत्तीचा मार्ग दाखवते, हे सारे काल्पनिक वाटले तरी ते प्रत्यक्षात उतरवणाऱ्या महिला पशुवैद्य डॉ. नित्या सांबामूर्ती घोटगे होत. उमा आणि मणियम कृष्णस्वामी सांबामूर्ती या दाम्पत्यापोटी जन्मलेल्या नित्या यांचे आरंभीचे शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूल, नवी दिल्ली येथे पार पडले. हिस्सार येथील हरियाना कृषी विद्यापीठातून १९८५मध्ये पशुवैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतर मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पशुशल्यक्रियाशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पार पाडले. पदवी शिक्षण काळात राष्ट्रीय प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती आणि पदव्युत्तर कार्यक्रमादरम्यान भा.कृ.अ.प.च्या कनिष्ठ शिष्यवृत्तीही त्यांना मिळाली.
मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राणी रुग्णालयात ‘रेसिडेंट हाऊस सर्जन’ म्हणून काम केल्यानंतर नवी दिल्लीस्थित डिफेन्स कॉलनीमध्ये, रोज किमान शंभर आजारी जनावरांवर उपचार करणाऱ्या पशुउपचार केंद्रात शल्यचिकित्सक म्हणून त्यांनी काम पाहिले. केवळ रुग्णालयात येणाऱ्या आजारी जनावरांवर उपचार करण्यापुरताच आपल्या ज्ञानाचा उपयोग करावा, हे त्यांना मान्य नव्हते. पशुपालन व्यवसायावरच उपजीविका करणारे आपल्या शेळ्या-मेंढ्या आणि गाई-गुरांचे तांडे घेऊन गावोगाव भटकणारे व जे भूमिहीन, अल्पभूधारक, शेतमजूर आहेत, त्यांना आर्थिक ओढाताणीमुळे पशुपालन व्यवसायात अधिक गुंतवणूक करू शकत नाहीत, अशा व्यावसायिकांना तांत्रिक शिक्षण देऊन योग्य दिशा दिली, तर त्यांचा व्यवसाय अधिक फलदायी होईल, ही डॉ. घोटगे यांची आपल्या सेवा व्यवसायाची संकल्पना होती.
अशा तऱ्हेने सेवा पुरवायची, तर त्यासाठी संघटित आणि सेवाभावी मनुष्यबळ पाहिजे या जाणिवेपोटी डॉ. घोटगे यांनी समविचारी महिला पशुवैद्यांना एकत्र केले आणि ‘अंतरा’ या पशुवैद्यकीय महिला पदवीधरांच्या संघटनेची १९९५मध्ये रीतसर स्थापना केली. पुरुष पशुवैद्यकीय पदवीधरांचीसुद्धा अशी कोणतीही सेवाभावी संस्था देशात कोठेही अस्तित्वात नसताना महिला पशुवैद्यांची संघटना उभारणे, ही कल्पनाच देशात एकमेवाद्वितीय ठरली. डॉ. नित्या यांनी ही संघटना केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित न ठेवता राष्ट्रीय स्तरावर वाढवली असून, भारतभर या संघटनेचे स्वयंसेवक कार्यरत आहेत.
डॉ. घोटगे यांना ज्या सामाजिक स्तरावरील पशुपालकांसाठी काम करावयाचे होते, त्यांना पशुहिताच्या आणि पशुउपचाराच्या आधुनिक; परंतु महागड्या पद्धती सांगून काहीच उपयोग होणार नव्हता. त्यांना परवडणाऱ्या स्वस्त आणि तरीही उपयुक्त अशा माहितीची गरज होती. भारतीय परंपरेतल्या अनेक पद्धती या दृष्टीने उपयुक्त आहेत, याची त्यांना जाणीव होती. पिढ्यानपिढ्या भारतात पशुधन पाळले आणि जोपासले जात आहे. एके काळी भारत पशुउत्पादन क्षेत्रात अग्रेसर होता, पण भारतीय परंपरा पारतंत्र्यात जशी इतर क्षेत्रांत हरवली; तशी ती पशुपालन-पशुउपचार क्षेत्रातही मागे पडली. मात्र आजही या पद्धती अत्यंत उपयुक्त ठरू शकतात, यावर विश्वास ठेवून त्या ‘अंतरा’मार्फत पुन्हा प्रचारात आणण्याचे त्यांनी निश्चित केले. जगभर ‘इथनो व्हेटरनरी प्रॅक्टिसेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पद्धतींचा पुनर्विचार हाच डॉ. घोटगे यांच्या कर्तृत्वाचा पाया आहे. प्रत्यक्ष तांड्यावर जाऊन, गावोगाव भटकणाऱ्या लोकांपर्यंत कसे पोहोचायचे याचे उत्तरही त्यांनी कल्पकतेने शोधले. पिढ्यानपिढ्या ‘वैदू’ म्हणून माणसांवर, तसेच जनावरांवरही उपचार करणारे स्त्री-पुरुष खेडोपाडी आढळतात. वनौषधींवर वा स्थानिकरीत्या मिळणाऱ्या पदार्थांवर मुख्यतः भर देणाऱ्या या वैदूंना ‘अंतरा’मार्फत संघटित करण्यात आले. त्यांच्या पारंपरिक औषधी पद्धतीत आणि उपचार पद्धतीला थोडीशी शास्त्रीय व आधुनिकतेची जोड देऊन त्यांना पशू उपचार पद्धतीत प्रशिक्षित केले आणि ‘पशुआरोग्य सेवक’ म्हणून कार्यरत केले. भारतातील निरनिराळ्या राज्यांत पशुआरोग्य सेवकांची फळी उभारण्यात ‘अंतरा’ यशस्वी झाली आहे. ‘अंतरा’ने विकसित केलेल्या पशुपालन आणि पशुउपचार पद्धतीचा लाभ या पशुआरोग्य सेवकामार्फत ग्रामीण भागातील पशुपालक घेत आहेत. मात्र या सेवा देताना आपल्या ज्ञानाच्या मर्यादा हे पशुसेवक ओलांडणार नाहीत, याबाबतही अंतराचे कार्यकर्ते दक्ष असतात. ‘वैदू’ या हेटाळणीजनक शब्दाला त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. स्थानिक पशुसेवकांना पशुपालन आणि पशुउपचार पद्धती शिकवण्यासाठी ‘अंतरा’ने आतापर्यंत भारतभर दीडशेच्या वर प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली आहेत. यांचा सर्व भर वनौषधी वा स्थानिक उपलब्ध पदार्थांच्या वापरावर, पारंपरिक पद्धतीवर असतो. वनौषधींची लागवड हाही त्या प्रशिक्षणाचा भाग असतो. यासाठी लागणारी बी-बियाणे, खते, लागवड पद्धतीची माहिती दिली जाते. ‘अंतरा’ने महाराष्ट्र व आंध्र प्रदेशात जनावरांच्या उपचारासाठी वनौषधींची लागवड केली आहे. त्यांचा वापर करून औषधे बनवण्याचे प्रशिक्षणही पशुसेवकांना दिले जाते. तसेच पशुपालन व आरोग्यासंबंधी पारंपरिक माहिती गोळा करून शास्त्रीय कसोट्यांवर ती तपासली जाते. पशुपालकांसाठी त्यांना समजणाऱ्या सोप्या आणि चित्रांकित भाषेत लिहिणे आवश्यक आहे, याचे भान ठेवून डॉ. घोटगे यांनी मराठी, इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांत पुस्तके लिहिली आहेत. ‘परसदारातील कोंबडीपालन’, ‘दख्खन पठारावरील मेंढीपालन’, ‘जनावरांसाठी वनस्पती औषधी व उपचार’ (भाग १ व २), ‘शेळ्या चला पाळू या’, ‘सह्याद्रीतील चारा पद्धती’ अशी उपयुक्त आणि पुरस्कारप्राप्त पुस्तके ‘अंतरा’तर्फे उपलब्ध आहेत.
पशुपालन सुधारणा समितीवर सल्लागार म्हणून नियुक्त्या, इथनोव्हेटरिनरी प्रॅक्टिसेस या विषयावर वेळोवेळी भरणाऱ्या जागतिक परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व, अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठे आणि तत्सम संस्थांमधून व्याख्याने, पदव्युत्तर शिक्षणक्रमाविषयी सल्लागार, जागतिक अन्न व कृषी संघटनांच्या अनेक प्रकल्पांमध्ये सहभाग ही त्यांच्या कामाला मिळालेली राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पावतीच आहे. त्यांच्या पशुसंवर्धन क्षेत्रातील आगळ्या व असाधारण कार्याची दखल घेऊन ज्येष्ठ पशुविज्ञान प्रतिष्ठान, पुणे या संस्थेने त्यांचा जागतिक पशुवैद्यक दिनाचे औचित्य साधून सत्कार केला.