Skip to main content
x

घरत, गणेश केशव

       णेश केशव घरत यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे वडील पुण्यातच सरकारी नोकरीत होते. त्यामुळे त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पुणे येथील नूतन मराठी विद्यालयात झाले. त्यांना वाङ्मयाची आवड असल्यामुळे त्यांनी सुरुवातीला सर परशुराम महाविद्यालयात प्रवेश घेतला, परंतु वडिलांच्या आग्रहामुळे त्यांनी शेती महाविद्यालयात प्रवेश घेतला. ते १९४२मध्ये बी.एस्सी.(कृषी) ही पदवी घेऊन बाहेर पडले आणि पुढच्याच वर्षी डेमॉन्स्ट्रेटर म्हणून कृषी अभियांत्रिकी विभागात दाखल झाले. ते अभ्यासू आणि कडक शिस्तीचे शिक्षक होते. त्यांना १९५८-१९५९मध्ये सरकारने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवले होते. त्यांनी १९६६मध्ये एम.एस्सी. (कृषी अभियांत्रिकी) ही पदवी मिळवली.

       महाराष्ट्रासाठी १९६८मध्ये महाराष्ट्र कृषी विद्यापीठ स्थापन झाले. १९६९मध्ये राहुरी येथे म.फु.कृ.वि. पश्‍चिम महाराष्ट्रासाठी सुरू झाले. तेथेच सरकारने संपादित केलेल्या ७००० एकर जमिनीवर कृषी विद्यापीठ अस्तित्वात आले. प्रा. घरत हे त्या वेळेस अधिष्ठाता (कृषी अभियांत्रिकी) होते. विद्यापीठाच्या विभागीय इमारती, प्रयोगशाळा, शैक्षणिक वर्ग, ग्रंथालय, विद्यार्थी निवासस्थाने, शिक्षक व इतर कर्मचार्‍यांची निवासस्थाने बांधावयाची होती. विद्यापीठाने कानविंदे राय या जगप्रसिद्ध स्थापत्य विशारदाची या कामासाठी नेमणूक केली. त्यांनी तयार केलेल्या इमारतीच्या नकाशावरून सबंध विद्यापीठ परिसराचे बांधकाम प्रा.घरत यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. तेव्हाच कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले. कृषी अभियांत्रिकी विभागाचे ते १९७१पासून निवृत्तीपर्यंत प्रकल्प प्रमुख होते. त्यांच्या काळातच कृषी अभियांत्रिकीचे पाच विभाग स्थापन झाले आणि सर्व विभागांत पदव्युत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध झाली.

       प्रा. घरत सप्टेंबर १९७८मध्ये निवृत्त झाले, परंतु निवृत्तीनंतर विद्यापीठातील कर्मचार्‍यांसाठी आपण काही तरी उपयुक्त काम करावे, अशी त्यांची जबरदस्त इच्छा होती. तेव्हा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शनर्स असोसिएशन होती, परंतु विद्यापीठातील कर्मचारी जरी सरकारकडून निवृत्ती वेतन घेत होता तरी त्याला अनेक अडचणी येत होत्या. म्हणून प्रा. घरत यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने म.फु.कृ.वि. पेन्शनर्स असोसिएशन मार्च १९८५मध्ये स्थापन केली. त्याचे ते पहिले अध्यक्ष झाले. त्यांनी हे काम २००५पर्यंत अखंडपणे केले आणि त्यांचे प्रश्‍न मार्गी लावले. 

- प्रा. शाम दत्तात्रय घाटपांडे

घरत, गणेश केशव